Next
साहसी खेळांमधील सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शनासाठी ‘महा अॅडव्हेंचर कौन्सिल’
सहभागी व्यक्ती आणि पर्यावरण यांच्या सुरक्षिततेसाठी आयोजक संस्था, व्यक्तींना सर्वंकष मार्गदर्शन
BOI
Saturday, July 06, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:पुणे :
साहसी क्रीडाप्रकारांचे आयोजन ही आता केवळ मोठ्या शहरांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. या खेळांचा प्रसार हळूहळू सर्वदूर होतो आहे; मात्र त्यातील दुर्घटनांमुळे होणारे मृत्यू आणि या खेळांमुळे पर्यावरणाला होणारी हानी हा चिंतेचा विषय होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यावरण आणि सहभागी व्यक्तींच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन उत्कृष्ट आयोजन करण्याच्या दृष्टीने संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी महा अॅडव्हेंचर कौन्सिल या ‘ना नफा’ तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. साहसी खेळांशी संबंधित खेळाडू, तसेच संस्थांनी या संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १९७१पासून गिर्यारोहणासारख्या विविध साहसी खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले ‘आयआयटी’यन आणि लेखक वसंत वसंत लिमये हे या कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. रत्नेश नीलरत्न जवेरी (सीईओ), दिलीप माधव लागू (सचिव), राजेंद्र मधुसूदन फडके (खजिनदार) हे संस्थेचे पदाधिकारी असून, दिव्येश मुनी, शंतनू पंडित आणि अभय प्रफुल्ल घाणेकर यांचा तज्ज्ञ समितीत समावेश आहे. या सर्व जणांना कोणत्या ना कोणत्या साहसी खेळाचा उत्तम अनुभव असून, प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असले, तरी साहसी खेळांबद्दल त्यांना विशेष ज्ञान आणि आवड आहे. 

या संस्थेबद्दल अध्यक्ष वसंत वसंत लिमये यांनी सविस्तर माहिती दिली. ‘पर्यावरणावर कमीत कमी दुष्परिणाम होईल अशी काळजी घेऊन, जल, वायू आणि जमिनीवरील साहसी क्रीडाप्रकारांचे जबाबदार आयोजन करणे आणि सुरक्षित, साहसी वृत्तीस आणि उत्कृष्टता साध्य करणाऱ्या संस्कृतीस प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी मार्गदर्शक संस्था बनणे, हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे त्यांनी सांगितले.  

‘वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी डोंगर, नद्या आणि आकाशात साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या शेकडो संस्था आज कार्यरत आहेत. साहस म्हटले, की त्यात अंगभूत धोका आणि अनिश्चितता हे ओघानेच आले. किंबहुना त्यामुळेच असे उपक्रम आयोजित करताना सहभागी सदस्य आणि पर्यावरणाच्या सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घेणे हे आवश्यक ठरते,’ असे लिमये म्हणाले.

‘साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या अनेक संस्था सध्या कार्यरत असल्याने, घराबाहेर पडून साहसी क्रीडाप्रकारांचा आनंद लुटणे आता सर्वसामान्यांनाही सहज शक्य झाले आहे; पण अशा अनियंत्रित प्रसाराचे काही दुष्परिणामही भोगावे लागतात. तसेच पर्यावरण आणि काही प्रमाणात सांस्कृतिक हानीही होते आहे. हिमालयातील अति उंचीवर आयोजित केलेल्या अशाच एका पदभ्रमण मोहिमेत घडलेल्या दुर्दैवी घटनेत आपला मुलगा गमावल्यामुळे अत्यंत दु:खी झालेल्या पालकांनी अशा दुर्घटना टाळाव्यात किंवा कमीत कमी व्हाव्यात या हेतूने एक जनहितयाचिका न्यायालयात दाखल केली होती. सरकारने आजवर या संदर्भात जारी केलेले दोन वटहुकूम आणि या प्रक्रियेत साहसी उपक्रम आयोजकांचा वाढता सहभाग हा या याचिकेचा परिणाम. महा अॅडव्हेंचर कौन्सिलची (एमएसी) स्थापना ही याचीच पुढची पायरी आहे,’ असे लिमये यांनी सांगितले.  

‘सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या, त्यात प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या, तसेच विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या, अशा सर्वांनाच आवश्यक ते मार्गदर्शक उपलब्ध करणे आणि संबंधित सरकारी खात्यांशी संवाद साधणे अशा विविध पातळ्यांवर ‘एमएसी’ने काम सुरू केले आहे,’ असेही लिमये यांनी नमूद केले.विविध साहसी उपक्रमांत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती ‘एमएसी’च्या संस्थापक आणि हितचिंतक आहेत. मानके (स्टँडर्डस्) निर्माण करून ती राबवणे, संस्था चालवणे आणि प्रगतिपथावर नेणे या बाबतीतील अनुभवी व्यक्ती, तसेच धोकादायक परिस्थितीचे व्यवस्थापन आणि साहसी उपक्रमातील सुरक्षा यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य केलेल्या तज्ज्ञ व्यक्ती ‘एमएसी’शी निगडित असल्याचे लिमये यांनी सांगितले.‘साहसी वृत्तीची जोपासना करणे, अज्ञाताचा ठाव घेणे आणि हा आनंद वृद्धिंगत करतानाच आपल्या कार्यशैलीत सुरक्षितता बाणवणे ही ‘एमएसी’ची मुख्य उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे साध्य करत असताना ‘सुरक्षा ‘हे कार्यशैलीचे एक अविभाज्य अंग व्हावे, यासाठी ‘एमएसी’ कार्य करील,’ असे त्यांनी विशद केले. 

‘एमएसी’ या पद्धतीने कार्य करणार

- सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून, संशोधनावर आधारित नवीन सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे. 
- अशी मार्गदर्शक तत्त्वे प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी विविध संस्थांमध्ये ताळमेळ साधणे. 
- धोक्याच्या व्यवस्थापनात सुसंवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. 
- या क्षेत्रातील विविध घडामोडी सर्वांपर्यंत पोहोचवणे. 
- आयोजक संस्था, सहभागी, त्यांचे कुटुंबीय आणि सरकार अशा विविध भागधारकांमध्ये साहचर्य वाढविणे आणि त्यांचा पाठिंबा मिळवणे. 
- साहसी क्रीडाप्रकारातील सुरक्षितता या संदर्भात सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन करणे. 
- आयोजनातील सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या बाबींचे प्रशिक्षण देणे. 
- प्रसारमाध्यमे, चर्चा गट आणि सक्रिय सहभाग या माध्यमातून, सर्वसमावेशक पद्धतीने ‘एमएसी’ अधिकाधिक व्यक्त्ती आणि सदस्य संस्थांना या कार्यात सहभागी करून घेईल. 
- ना नफा संस्था आणि व्यावसायिक संस्था, तसेच कोणीही व्यक्ती ‘एमएसी’ची सदस्य बनू शकते. संस्थात्मक सदस्य ‘एमएसी’च्या कार्यप्रणालीत सहभागी होऊ शकतील. 

अधिक माहितीसाठी संपर्क :
ई-मेल : mahaadventurecouncil@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vasant vasant Limaye About 103 Days ago
धन्यवाद BOI !
0
0

Select Language
Share Link
 
Search