Next
यमे
BOI
Friday, September 01, 2017 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

‘यमे’ हा मनाला व्याकूळ करणाऱ्या आणि वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या आशयघन कवितांचा संग्रह आहे. कवयित्री अर्पणा साठे यांच्या या कवितासंग्रहाची अल्पावधीतच दुसरी आवृत्ती निघाली आहे. त्या कवितासंग्रहाविषयी...
......
कवयित्री अर्पणा साठे यांचा लिपी प्रकाशनाने सिद्ध केलेला ‘यमे’ या नावाचा कवितासंग्रह २२ जून २०१७ रोजी प्रकाशित झाला. या संग्रहाच्या बाबतीत  सांगण्यासारखे खूप महत्त्वाचे म्हणजे प्रकाशन समारंभात सादर केल्या गेलेल्या संग्रहातील कवितांच्या अभिवाचनाने प्रभावित झाल्यामुळेच की काय, या काव्यसंग्रहाची प्रकाशनाच्या दिवशीच विक्रमी विक्री झाली. ‘यमे’ची खूप चांगली दखल घेणारे परीक्षण महाराष्ट्र टाइम्समध्ये ३० जुलै रोजी प्रसिद्ध झाले. या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती आठ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेली असून तिलाही काव्यरसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे.

या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत ज्येष्ठ कवयित्री शिरीषताई पै म्हणतात, ‘हा कवितासंग्रह वाचताना आपल्याच मनातील सर्व कवाडे खुली होतात आणि मानवी मनाचे विश्वव्यापी दर्शन घडते. या कवयित्रीच्या कवितेतील प्रगल्भता, भव्यता आणि दिव्यता वाचकाला जिवंत आणि जागृत करते. आजच्या काळात निर्माण झालेल्या नव्या मराठी कवितेतलं तिचं स्थान आगळवेगळं आणि सर्वस्वी तिचंच आहे. तिच्या कवितेची रचना, आरंभ, शेवट आणि तिची संपूर्ण मांडणीच कवयित्रीच्या स्वतंत्र काव्यशैलीचं दर्शन घडवते. तिच्या कवितेच्या या सगळ्या वैशिष्ट्यांबद्दल मला तिचं कौतुक वाटते आणि आजच्या नव्या दमाच्या कवींमध्ये ती तिचं स्वतंत्र स्थान मिळवेल असा विश्वासही वाटतो.’


या काव्यसंग्रहाच्या महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात लिहिलेल्या परीक्षणात ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी म्हणतात, ‘अर्पणा साठे यांच्या ‘यमे’ हे वेगळेच शीर्षक असलेल्या कवितासंग्रहातील कवितांमधून जुने पारंपरिक संस्कार संदर्भ जपताना नव्या, आधुनिक काळाशीही जोडून घेणारे एक संवेदनशील कविमन व्यक्त झाले आहे. पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मेळ साधत, परंपरेचा रेशीमस्पर्श सांभाळत आणि आधुनिकतेतील ‘स्मार्टनेस’ स्वीकारत अर्पणा साठे यांची कविता फुलली आहे. आधुनिक जीवनात हरवून गेलेली मानवी मूल्ये शोधत ती चिंतनशील बनली आहे. या कवितासंग्रहातील कवितांमध्ये हेलावून टाकणाऱ्या शब्दांत जुन्या रम्य स्मृती आणि आजचे उदास उद्ध्वस्त दर्शन यातील विसंगती टिपली आहे. यमे, तथास्तु, हिशोब यांसारख्या कवितांमधून जुन्या अडगळीत पडलेल्या जगण्याचे तपशील जिवंत झाले आहेत. ‘विकास’सारख्या कवितेत नव्या संस्कृतीशी सांधा जुळवताना संवेदनांची होणारी तडफड अनुभवास येते. शोध, इतिहास यांसारख्या कवितांमधून कवयित्रीची  चिंतनशील वृत्ती प्रतिबिंबित होते, तर इतर काही कवितांमधून तिची समकालीन जाणीवही स्पष्ट होते. भाषा हा या कवितासंग्रहाचा गुणविशेष असून, कवयित्रीची भाषेवर प्रचंड हुकूमत आहे त्यामुळे आपण स्तिमित होतो. भाषा आणि शब्दसौंदर्य यामुळे या कवितांची खुमारी वाढलेली आहे.’

थोडक्यात म्हणजे वाचकांना आपल्याच जीवनाचे प्रतिबिंब या कवितासंग्रहात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी संग्रही नक्की ठेवावा असाच ‘यमे’ हा काव्यसंग्रह आहे.

कवितासंग्रह : यमे
प्रकाशिका : सानिका भावसार, लिपी प्रकाशन, १४, मानसनागरी को-ऑप सोसायटी, तळेगाव दाभाडे, पुणे ४१०५०७
पृष्ठे : १००
मूल्य : १६५ रु.
संपर्क : अर्पणा उदय साठे
फोन : ८६५५२ २०४१९, ९८१९० ६२१६३
..............
(‘यमे’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी झालेल्या काव्यवाचनाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
Most Popular
Most Commented

Select Language
Share Link
 
Search