Next
‘उत्कृष्ट पुस्तकासाठी अंतरंग आणि बहिरंग यांचा मिलाफ आवश्यक’
BOI
Thursday, April 18, 2019 | 04:03 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘आशय हा पुस्तकाचा खरा आत्मा असतो आणि उत्कृष्ट पुस्तकनिर्मितीसाठी आशयपूर्ण अंतरंग आणि त्याला साजेसे बहिरंग यांचा मनोहर मिलाफ आवश्यक असतो. अशी पुस्तके खऱ्या अर्थाने महत्त्वाची ठरतात’, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केले.
 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या ‘कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार’ प्रदान समारंभात ते बोलत होते. ‘ऐवजी’ या नंदा खरे लिखित ग्रंथाला उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीसाठीचा हा पुरस्कार, मनोविकास प्रकाशनचे आशिष पाटकर यांना बनहट्टी यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रकाशक आशिष पाटकर, ग्रंथनिवड समितीचे सदस्य योगेश नांदुरकर उपस्थित होते.

सन्मानाला उत्तर देताना आशिष पाटकर म्हणाले, ‘पुस्तक केवळ छापणं म्हणजे प्रकाशन नव्हे. विषय आणि लेखकाची निवड, लेखन, संपादन, छपाई, मुद्रितशोधन आणि सजावट या साऱ्या गोष्टींचा सुयोग्य संयोग प्रकाशक साधत असतो.’

‘कृतज्ञता हे मूल्य हद्दपार होत असलेल्या या काळात आपल्या प्रकाशन व्यवस्थापकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देणे हे विशेष आहे. पुस्तकनिर्मिती हा सामुहिक अविष्कार आहे. पुस्तक प्रकाशन-प्रक्रियेत लेखकाइतकेच मुद्रितशोधक, चित्रकार, बांधणीकार, छपाई करणारे यांचे योगदान महत्त्वाचे आहे’, असे मत प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

या समारंभात ग्रंथनिर्मिती व्यवस्थापिका कै. पुष्पा पुसाळकर यांच्याविषयी प्रीती बनहट्टी यांनी माहिती दिली. मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. समारंभाचे सूत्रसंचालन कार्यवाह बंडा जोशी यांनी केले. या समारंभाला चैतन्य बनहट्टी आणि परिवार, मसापचे पदाधिकारी उद्धव कानडे, दीपक करंदीकर, शिरीष चिटणीस, वि. दा. पिंगळे हे मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal gramopadhye About 119 Days ago
If sales are important , external appearance is Important
0
0

Select Language
Share Link
 
Search