Next
‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी
विवेक सबनीस
Monday, April 23, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘क्षणमात्र घडली माया, क्षणात विश्व बुडाले, जेथे पाहते तेथे, आता ग्रहण लागे’ हे शीर्षकगीत ऐकल्यावर रात्री साडेदहा वाजता ‘ग्रहण’ ही मालिका बघण्यासाठी व त्यातील थ्रिल अनुभवण्यासाठी अनेक प्रेक्षक टीव्हीसमोर येऊन बसतात. या मालिकेतील रमा, निरंजन, उषाताई, अपर्णा, मोनू आणि लक्ष्मी ही पात्रेही आता प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटावीत इतकी जवळची झाली आहेत! 

भयकथा व विज्ञानकथा लिहिणारे प्रसिद्ध लेखक दिवंगत नारायण धारप यांनी २००१मध्ये लिहिलेल्या ‘ग्रहण’ या कादंबरीवर आधारित ‘ग्रहण’ ही मालिका ‘झी मराठी’वर सध्या सुरू आहे. या मालिकेमुळे आता कादंबरीबाबतही कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. मालिका बघून मूळ ‘ग्रहण’ कादंबरी वाचायला मिळण्यासाठी अनेक वाचनप्रेमी रसिक सध्या या कादंबरीचा शोध घेत आहेत. या कादंबरीच्या निमित्ताने धारपांच्या इतर अनेक कादंबऱ्या व कथासंग्रहांची माहितीही रसिक घेत आहेत. धारपांच्या भयकथा आणि भयकादंबऱ्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता लवकरच त्यापैकी काही पुस्तकांचे अनुवादही कन्नड आणि बंगाली भाषेत होणार आहेत! 

२००१ व नंतर २००३मध्ये मुंबईच्या दिलीप प्रकाशनातर्फे ‘ग्रहण’च्या दोन आवृत्त्या निघून त्या संपल्याही. ‘ग्रहण’ मालिकेतील उत्सुकता व कादंबरीबद्दल वाटणारे वाढते औत्सुक्य लक्षात घेऊन पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे ‘ग्रहण’ची तिसरी आवृत्ती २३ एप्रिलच्या पुस्तक दिनानिमित्त काढली जाणार असून, ती दोन हजार पुस्तकांची असेल. ‘अक्षरधारा’चे संचालक रमेश राठिवडेकर यांनी ही घोषणा केली आहे. या पुस्तकांच्या वितरणाला या आठवड्याभरात सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नारायण धारप (फोटो सौजन्य : maitri2012.wordpress.com)एकीकडे वाचनसंस्कृती लयाला चालली असल्याची ओरड चालू असताना ‘ग्रहण’सारख्या कादंबरीमुळे पुन्हा एकदा साहित्य क्षेत्रात एक सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. १९५०च्या दशकापासून सातत्याने भयकथालेखन करणाऱ्या नारायण धारप यांनी त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे १८ ऑगस्ट २००८पर्यंत सुमारे १४० पुस्तके लिहिली. त्यांच्या निधनानंतर दहा वर्षांनी त्यांच्या अनेक पुस्तकांना मोठी मागणी असल्याचे दिसते. १९६२मध्ये त्यांनी लिहिलेल्या भयकथांचा पहिला संग्रह ‘अनोळखी दिशा’ या नावाने प्रसिद्ध झाला, तर १९६५मध्ये ‘चंद्राची सावली’ ही त्यांची पहिली कादंबरी बाजारात आली. भयकथा या कथाप्रकाराला तेव्हा प्रतिष्ठा नसतानाही हे कसे काय घडले, तसेच आजही त्यांच्या लोकप्रियतेचे नेमके गमक काय असावे, असे वाटल्याशिवाय राहत नाही. भयकथा या गूढप्रकारात लेखन करणारे धारप यांनी मुंबई विद्यापीठात बी. टेक. पदवी घेतली असून, विज्ञान, खगोल, गणित ते मानसशास्त्र अशा अनेक शास्त्रांच्या त्यांच्या व्यासंगातून त्यांच्या भयकथांनाही त्यांची स्वत:ची अशी सैद्धान्तिक मांडणी असते. आपले हे विचार पहिल्यापासूनच पटवून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. आपल्या लिखाणातूनच ते जे सांगायचे ते सांगत व प्रसिद्धीपासून कायम लांब राहत. 


ग्रहण ही कादंबरी मुंबईतील बोरीवली भागात राहणाऱ्या दिलीप काळे यांनी दिलीप प्रकाशनातर्फे २००१मध्ये प्रथम प्रकाशित केली. २०१३मध्ये काढलेली दुसरी आवृत्तीही आता संपली आहे, असे त्यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ला सांगितले. ‘धारपांची सर्वच पुस्तके सोन्यासारखी होती! धारप हे माझे आवडीचे लेखक असून, त्यांच्या प्रत्येक पुस्तकालाच रसिक वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असतो,’ असे त्यांनी सांगितले.

‘ग्रहण हे पुस्तक आम्ही दिलीप प्रकाशनतर्फे काढले असल्यामुळे सध्या या कादंबरीची मागणी करणारे असंख्य फोन मला येत आहेत,’ असे सांगून काळे म्हणाले, ‘त्यांच्या लिखाणात वेगळेपणा असल्यामुळेच ‘ग्रहण’सह त्यांची सारीच पुस्तके वाचनीय झाली आहेत. माणूस म्हणूनही धारप मोठे होते व ते माझ्यावर मनापासून प्रेम करणारे लेखक असल्यामुळे आमच्यात केवळ प्रकाशक व लेखक असा व्यावहारिक संबंध नव्हता.’

‘ग्रहण’प्रमाणेच धारपांची इतर सात ते आठ पुस्तकेही आम्ही काढली असून, त्यातील काही पुस्तकांच्या दोन-दोन आवृत्त्या काढल्याचे काळे यांनी सांगितले. ‘दिलीप प्रकाशनातर्फे सीमेपलीकडून, ४४०चंदनवाडी , समर्पण, देवाज्ञा, चेटकीण आणि अनोळखी दिशा या पुस्तकांचे तीन खंड आम्ही प्रकाशित केले. त्यापैकी देवाज्ञा व चेटकीण या दोन्ही पुस्तकांच्या दोन आवृत्या काढल्या असून, त्यांना वाचकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे,’ असेही काळे यांनी सांगितले.

नारायण धारपांची ५० पुस्तके पुनर्मुद्रित करणाऱ्या साकेत प्रकाशनाचे बाबा भांड म्हणाले, ‘धारपांचा एक मोठा वाचकवर्ग आहे. पूर्वी धारपांची अनेक पुस्तके वेगवेगळ्या प्रकाशकांनी काढली होती. आम्ही जास्तीत जास्त पुस्तके एका ठिकाणी मिळावीत या हेतूने ती पुनर्मुद्रित केली आहेत. या साऱ्याच पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळत असून, पुणे व औरंगाबाद येथील साकेत प्रकाशनाच्या बुकमॉलमध्येही धारपांच्या पुस्तकांनाही चांगली मागणी आहे.’ 

साकेत प्रकाशनाने काढलेल्या धारपांच्या ५० पुस्तकांपैकी २५ पुस्तकांची ई-बुक्स काढण्यात आली असून, त्यांनाही मागणी असल्याचे भांड यांचे पुत्र साकेत यांनी सांगितले. देशातून आणि परदेशातूनही या पुस्तकांना मागणी असून, ती ‘अॅमेझॉन’वरही उपलब्ध आहेत. 

कोल्हापूरच्या रिया पब्लिकेशन व ‘अजब डिस्ट्रिब्युटर’च्या शीतल मेहतांनी धारपांची आठ पुस्तके प्रकाशित केली आहेत व ती सर्व संपली आहेत. या पुस्तकांच्या आवृत्त्याही सातत्याने निघत असून, त्याही झपाट्याने संपत आहेत. या पुस्तकांमध्ये माटी कहे कुमारको, चेतन, फरिश्ता, आभास, दस्त, आनंद महाल आणि टोळधाड यांचा समावेश आहे. ‘एखाद्या लेखकाच्या भयकथा या साहित्यप्रकाराला कायम मागणी असण्याचा हा अनुभवही विलक्षण आहे,’ असे मेहता यांनी सांगितले. ‘विशेष म्हणजे धारपांची दोन पुस्तके लवकरच कन्नड आणि बंगाली भाषेत प्रकाशित करण्याचे काम चालू आहे. कन्नडमध्ये सरजू काटकर अनुवाद करत असून, बंगालीत भाषांतरकार शोधण्याचे काम चालू आहे. शेवटपर्यंत उत्कंठा निर्माण करणारे त्यांचे साहित्य चिरतरुण आहे. केवळ भयसाहित्य लिहिणारे धारप हे बहुधा एकमेव साहित्यिक असल्यामुळेच त्यांच्या साहित्यात हा भयरस अनेक अंगांनी उतरत असावा,’ असे मेहता यांनी सांगितले. 

धारपांचे मेव्हणे श्यामराव जोशी यांनी पुण्यातील सदाशिव पेठेत भारत वाचनालय अनेक वर्षे चालवले. त्यांच्याकडे धारपांची यच्चयावत पुस्तके होती. शिवाय त्यांनी प्रकाशन व्यवसाय सुरू करताना धारपांची सहा पुस्तके काढली. ही सर्व पुस्तके तेव्हाच संपली असल्याचे जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आजही अण्णांच्या (धारपांच्या) पुस्तकांना असणारी वाढती मागणी पाहिली की थक्क व्हायला होते. वाचक पुस्तक हातात घेतो व ते संपल्यावरच खाली ठेवतो अशी ताकद त्यांच्या लेखनात आहे. त्यामुळे आजच्या वाचक पिढ्याही त्यांच्याशी आपोआप जोडल्या गेल्या आहेत.’ 

बाजीराव रस्त्याजवळील शिल्पा वाचनालयाच्या शैलजा काळे म्हणाल्या, ‘धारपांच्या सर्वच पुस्तकांना वाचकांची नेहमीच मागणी असते. ‘ग्रहण’ कादंबरीवरील मालिकेमुळे या पुस्तकाला पुन्हा एकदा मोठी मागणी आहे. आमचे अनेक सभासद हे पुस्तक मागतात; पण एकच प्रत असल्यामुळे ती एका वेळी एका सभासदाकडे जाते. ती कादंबरी वाचल्यावर लगेच परत करावी, असेही आम्ही सभासदांना सांगत असतो.’ 

‘धारपांच्या निधनानंतर त्यांच्या सर्वच साहित्याला नव्याने मागणी येऊ लागली असून, त्यांची काही ई-बुक्स ‘बुकगंगा डॉट कॉम’ने प्रकाशित केली आहेत. त्यांनाही मोठी मागणी आहे,’ असे ‘बुकगंगा’चे संस्थापक मंदार जोगळेकर यांनी सांगितले. 

आपण भयकथा का लिहितो, यासंबंधी धारप म्हणाले होते, की ‘मराठी साहित्यात भयकथांची सातत्याने वानवा जाणवत असल्यामुळे माझ्याकडून काही तुरळक कथा लिहिल्या गेल्या असल्या, तरी त्यांना वाचकमान्यता लाभत नव्हती. हे चित्र बदलावे असा विचार मनात येई. त्यामुळे मराठी वाङ्मयतलाच भयकथा हा रसिकमान्य घटक व्हावा हाच हेतू मनात ठेवून सतत भयकथा लेखन करत आलो. उच्च अभिरुचीसाठी गाजलेल्या सत्यकथा, तसेच किर्लोस्कर, नवयुग, वाङ्मयशोभा, सह्याद्री, बागेश्री, अनुराधा, वसुधा, मनोहर, तरुण भारत अशा नियतकालिकांमधून माझ्या भयकथा प्रसिद्ध झाल्या. तसेच सर्वसामान्य मराठी कथांसाठी जेव्हा जेव्हा म्हणून स्पर्धा योजण्यात आल्या, तेथे तेथे भयकथा पाठवून निदान उल्लेखनीय स्थान तरी प्राप्त करून दिले. आता हा कथाप्रकार स्वयंपूर्ण झाला असून त्याची सतत वाढ होत राहणार.’ 

आपल्या भयकथांच्या वैशिष्ट्यांवर भाष्य करताना धारप म्हणाले होते, की ‘माझ्या पुस्तकांमधून विविधता व भयप्रदतेची चढती श्रेणी असा दृष्टिकोण जाणीवपूर्वक ठेवला आहे. काही कथांमध्ये अद्भुतता आहे. त्यात भयाचा अगदी ओझरता स्पर्श आहे. भयाची ही छटा गडद होत जात काही कथांमध्य त्याची परिसीमा गाठली जाते. भयकथा लिहिताना काहीतरी निर्माण केल्याचा आनंद मला झाला असून, वाचकांनाही त्याची थोडी अनुभूती यावी अशी आशा आहे.’

(नारायण धारप यांची पुस्तके, तसेच ई-बुक्स ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी https://goo.gl/67GLv4 येथे क्लिक करा. नारायण धारप यांच्याबद्दल स्फुट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search