Next
घरात नवीन मूल येताना...
BOI
Saturday, March 17, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


जबाबदारीचं दडपण, अपेक्षा आणि बाळाच्या आगमनानंतर आई-वडिलांचा विभागला गेलेला सहवास, त्यांचं लक्ष, प्रेम या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणूनच आरोहीच्या वर्तनात विचित्र बदल झाले होते. रुहीच्या येण्याने तिच्या आयुष्यात झालेला हा बदल तिच्या वयाला खूपच मोठा व त्रासदायक होता... ‘मनी मानसी’ या सदरात या वेळी पाहू या मुलांच्या मानसिकतेबद्दल... 
...............
आरोहीचे आई-वडील भेटायला आले. आल्यापासूनच दोघेही अस्वस्थ होते. त्यांच्याबरोबर त्यांची एक वर्षांची मुलगी होती. आल्यानंतर आरोहीच्या बाबांनी स्वतःची व त्यांच्या पत्नीची ओळख करून दिली. आरोहीचे वडील एका कंपनीत इंजिनिअर होते. कामानिमित्त त्यांना सतत बाहेर व अनेकदा बाहेर देशातंही जावं लागायचं. त्यामुळे घरातला त्यांचा सहभाग एकूणच तसा कमीच असायचा; पण ते जेव्हा घरी असतील, तेव्हा मात्र तो संपूर्ण वेळ ते फक्त घरच्यांसाठी द्यायचे. 

आरोहीची आईदेखील एका खाजगी कंपनीत नोकरी करायची. पण वर्षभरापूर्वी मुलीच्या जन्मानंतर त्यांनी नोकरी सोडून दिली. दोन्ही मुलींकडे नीट लक्ष देता यावं, त्यांना निदान आईचा तरी सहवास मिळावा, या उद्देशानेच त्यांनी हा निर्णय घेतला होता. सहा वर्षांची आरोही ही त्यांची मोठी मुलगी आणि एक वर्षाची रुही धाकटी. अशी सगळी माहिती आरोहीच्या बाबांनी बोलताना सांगितली. 

त्यानंतर तिच्या आईने बोलायला सुरवात केली, आरोही खूप शहाणी आणि हुशार मुलगी. सगळ्यांशी खूप छान वागणारी, हसरी, खेळकर. शाळेतसुद्धा शिक्षकांची लाडकी होती. घरातसुद्धा ती खूप शहाण्यासारखी वागायची. घरच्या कामात उत्साहाने सहभागी व्हायची. बाबा तर तिचे खूपच लाडके होते. बाबा गावाहून आले, की आरोही अगदी खूश असायची. कधी हट्टीपणा नाही, विनाकारण रडणं नाही, वेड्यासारखं वागणं नाही. एकदम गुणी मुलगी होती; पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक. आरोही अगदी बदलून गेली आहे. खूप तापट आणि हट्टी झालीये.  

छोट्या छोट्या कारणांवरून खूप चिडते. मोठमोठ्याने रडते. राग आला, की वस्तू फेकते. हात-पाय आपटते. सतत आईच्या मागेमागे असते. छोट्या बहिणीचं कोणतंच काम सांगितलेलं तिला मुळीच- आवडत नाही. छोट्या बाळाशी खेळायला सांगितलं, तिच्याजवळ बसायला सांगितलं, की धुसफूस करते. तीच्यावर ओरडते. स्वतःची कोणतीही वस्तू घेतली, तर ती धावत जावून हिसकावून घेते. मागच्या आठवड्यात आरोहीने तिची बाहुली घेतली आणि तिला जोरात ढकलून दिलं. बिचारं लेकरू डोक्यावर पडलं आणि कळवळून रडलं; पण आरोहीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. तिला आम्ही समजावून सांगितलं तेव्हा ‘रुही मला अजिबात आवडत नाही’, असं सांगून ती निघून गेली. 

आईने इतकं सांगितलं आणि केव्हाचं अडवून धरलेलं डोळ्यातलं पाणी बाहेर पडलं. आईला रडू आवरणं अवघड गेलं. वडिलांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यामुळे दोघांनाही थोडा वेळ शांत होऊ दिलं. आम्ही दुसरा चान्स घेऊन चूक केली का? आरोही आपल्या बहिणीचा स्वीकार करणारच नाही का? घरातले हे वाद वाढतच जातील का? आरोहीला रुहीचा एवढा राग का येत असावा, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले होते.

ते दोघेही शांत झाल्यानंतर आणखी काही माहिती घेऊन पुढील सत्राची वेळ निश्चित केली. त्यानुसार ती सत्रे घेण्यात आली. पुढील एक-दोन सत्रांत अधिक सविस्तर बोलताना असं लक्षात आलं, की नवीन येणाऱ्या बाळाची त्यांनी आरोहीला पूर्वकल्पना दिली असली, तरी त्या पूर्वकल्पनेत बाळाची मोठी ताई या भूमिकेला अतिरिक्त महत्त्व दिले होते. मोठ्या ताईने बाळाची घ्यायची काळजी, मोठी ताई म्हणून तिच्याकडून अपेक्षित असणारं वर्तन, घरात करावी लागणारी मदत इत्यादी. हेच तिच्या मनावर सतत बिंबवलं गेलं. जबाबदारीचं दडपण, अपेक्षा आणि बाळाच्या आगमनानंतर आई-वडिलांचा विभागला गेलेला सहवास, त्यांचं लक्ष, प्रेम या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणूनच आरोहीच्या वर्तनात हे सगळे बदल झाले होते. रुहीच्या येण्याने तिच्या आयुष्यात झालेला हा बदल तिच्या वयाला खूपच मोठा व त्रासदायक होता. आई-वडिलांनी मलाच वेळ द्यावा. माझ्याशी पुर्वीसारखं वागावं ही तिची अपेक्षा तिच्या वयाला रास्तच होती. छोट्या रुहीची ती ताई असली, तरी तिचं वयही जेमतेम सहा वर्षंच होतं, हे नकळतपणे का होईना, पण तिचे आई-वडील विसरले होते.

या सगळ्यांवर सत्रांमध्ये चर्चा केली. या चर्चेतून पालकांना जाणीव झाली. आपली चूक त्यांना आपोआपच लक्षात आली. त्यामुळे पुढील सत्रांमध्ये सुचवल्याप्रमाणे त्यांनी प्रयत्नपूर्वक बदल केले. झालेल्या चांगल्या बदलांवर मागोवा सत्रात वेळोवेळी चर्चा केली. त्यामुळे घरातलं वातावरण हळूहळू बदलत गेलं आणि हळूहळू आरोहीसुद्धा आपल्या बहिणीला म्हणजेच छोट्या रुहीला स्वीकारू लागली. ‘हे नातं आता इतकं घट्ट झालंय, की दोघी बहिणींना आता एकमेकींशिवाय  मुळीच करमत नाही,’ असं आई समाधानाने सांगून गेली. 

(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
मोबाइल : ८८८८३ ०४७५९ 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search