Next
सेनेने गड राखले; पण राज्यात कमळ फुलले
BOI
Thursday, February 23, 2017 | 12:00 AM
15 5 0
Share this article:

पुणे : मुंबई, तसेच ठाण्यातील मतदारांनी शिवसेनेलाच आपली पसंती दिल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीचा कल पाहता हे स्पष्ट झाले आहे; मात्र भारतीय जनता पक्षाने या दोन वगळता अन्य आठ महापालिकांमध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात लावलेला सभांचा धडाका कारणी लागल्याचे दिसून आले आहे. तसेच फडणवीस यांचे पक्षातील स्थान भक्कम होण्यास या निकालांचा उपयोग होणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या वेळीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना मतदारांनी साफ नाकारल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील खराब कामगिरीची जबाबदारी घेऊन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

मुंबईतील निवडणूक यंदा फारच प्रतिष्ठेची झाली होती. शिवसेनेने स्वाभिमानाची भाषा करून युती तोडल्याची स्वतःहून घोषणा केली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी परस्परांवर प्रचंड चिखलफेक केली होती. त्यामुळे या रणधुमाळीकडे सगळ्या राज्याचेच लक्ष लागून राहिले होते; मात्र ठाणे आणि मुंबईकरांच्या मनावर शिवसेनेचे अधिराज्य कायम असल्याचे या निकालांतून दिसून येत आहे. जवळच्याच उल्हासनगर महापालिकेत मात्र भाजपने आघाडी घेतली आहे. 

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, पुण्यात १६२ पैकी १४७ ठिकाणचे कल लक्षात आले असून, भाजप ७४ ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपची वाटचाल बहुमताच्या दिशेने होत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये किमान तीस जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसल्याचे चित्र आहे. पिंपरीच्या विद्यमान महापौर शकुंतला धराडे पराभूत झाल्या असून, पुण्याचे विद्यमान महापौर प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. 

ज्या नाशिक महापालिकेतील कामांचे सगळ्या ठिकाणी सादरीकरण करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व महापालिकांतील मतदारांना साद घातली होती, खुद्द त्याच नाशिक महापालिकेत मनसेचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. आश्चर्यकारकरीत्या नाशिकमध्ये चाळीस जागांवर आघाडी घेतली असून, शिवसेना २२ जगांवर आघाडीवर आहे. मनसे केवळ दोनच जागांवर आघाडीवर आहे. 

विदर्भातील अमरावती आणि अकोला या दोन्ही महापालिकाही भाजपच्याच खिशात जाणार असल्याचे दिसत आहे. अकोल्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता असून, अमरावतीत भाजप २८ जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच; पण या निवडणुकीत मात्र तिथे वेगळे चित्र दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तिथे २८ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असून, त्यांच्या खालोखाल शिवसेनेचे वीस नगरसेवक आघाडीवर आहेत. 

 
15 5 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search