Next
अडी-अडचणीला धावणारे राजरत्न प्रतिष्ठान!
कोमल कुळकर्णी-कळंबटे
Friday, June 01, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत रंगपंचमी साजरी करताना राजरत्न प्रतिष्ठानचे सदस्य
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून राजरत्न प्रतिष्ठान ही संस्था रत्नागिरीत गेली अडीच वर्षे कार्यरत आहे. कोणत्याही राजकीय पक्षापासून अलिप्त राहून सर्वसामान्य लोकांसाठी, गरजूंसाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हा त्यांचा हेतू आहे. तरुणांनी स्थापन केलेल्या राजरत्न प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती घेऊ या ‘लेणे समाजाचे’ या सदरात...
.........
रंगपंचमी साजरी केल्यानंतर रुग्णांना फळवाटप करतानासामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या कामकाजात राजकीय पक्षाचा हस्तक्षेप होऊ लागला किंवा त्यांचा अजेंडा डोकावू लागला की त्या समाजकारणाचे ‘राजकारण’ होते. ती संस्था, संस्थेतील सदस्य, संस्था जिथे, ज्यांच्यासाठी काम करते त्यांच्याकडे राजकीय पक्ष ‘व्होट बँक’ म्हणून बघतात. राजकीय हस्तक्षेप वाढला, की अनेकदा संस्थांचे अस्तित्व धोक्यात येते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन डिसेंबर २०१५मध्ये रत्नागिरीत राजरत्न प्रतिष्ठानची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. समाजकार्य करायचे, पण त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घ्यायची, हे संस्थेचे मुख्य तत्त्व ठरविण्यात आले.

सचिन शिंदे हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांत कार्यरत असलेल्या, मात्र सामाजिक कार्याची तळमळ असलेल्या लोकांची मोट शिंदे यांनी बांधली आणि राजरत्न प्रतिष्ठानच्या कार्याची सुरुवात झाली. यात सहभागी असलेल्या व्यक्ती विविध राजकीय पक्षांशी निगडित असल्या, तरी राजकारणविरहित समाजकारण करण्यावर या संस्थेचा भर आहे. रूपेश सावंत (उपाध्यक्ष), सतीश राणे (सचिव), संतोष सावंत (खजिनदार) आणि अनंत शिंदे (सहखजिनदार) ही कार्यकारिणी प्रतिष्ठानची धुरा सांभाळते आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरीतील महिला सफाई कामगारांना गौरविताना राजरत्न प्रतिष्ठानच्या सदस्या.

शिंदे हे सिव्हिल इंजिनीअर असून, बांधकाम व्यवसायात आहेत. समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती अशा आहेत, की ज्यांच्या किमान गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत, अनेकांना वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत, महिलाश्रम, वृद्धाश्रमात असलेल्यांना कोणी वाली नाही, या भयाण वस्तुस्थितीने शिंदे यांना अस्वस्थ केले. या सगळ्यांसाठी काही तरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच त्यांनी आपल्या समविचारी मित्रांना घेऊन राजरत्न प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या माध्यमातून हे सगळे जण सर्वसामान्यांच्या, पीडितांच्या, गरजूंच्या हाकेला धावून जाऊ लागले.

माघी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे फलक प्रतिष्ठानमार्फत लावले जातात.‘कमी तिथे आम्ही’ या उक्तीनुसार ‘राजरत्न’च्या सदस्यांनी रुग्णसेवा, तसेच वृद्धाश्रम आणि महिलाश्रमात असलेल्यांची यथाशक्ती सेवा करण्यास सुरुवात केली. सध्या या प्रतिष्ठानमध्ये एकूण ४५ सदस्य कार्यरत असून, कुठूनही कधीही फोन आला किंवा कोणी अडचणीत असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या सदस्यांना समजली, की हे सदस्य तातडीने घटनास्थळी हजर होऊन मदतकार्याला विनाविलंब सुरुवात करतात. त्यांच्या या प्रामाणिक सेवेमुळे अल्पावधीतच जनमानसात राजरत्न प्रतिष्ठानची प्रतिमा उंचावली.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, ‘सामाजिक उपक्रम करताना त्यात राजकारण येऊ नये, यासाठी पक्षविरहित सामाजिक उपक्रम करावेत आणि लोकांना चांगल्या सेवा द्याव्यात, सामान्य लोकांना जिथे अडचण असेल तिथे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम व्हावे या उद्देशाने या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.’

रत्नागिरीतील श्यामराव भिडे कार्यशाळा या मतीमंद मुलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीप्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्यसचिव सतीश राणे म्हणाले, ‘मनोरुग्णालयातील रुग्णांसाठी, अनाथ, निराधार, गरजू मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘माहेर’ संस्थेसाठी, ‘आविष्कार’ या विशेष मुलांच्या शाळेसाठी राजरत्न प्रतिष्ठानमार्फत काम केले जाते. महिलाश्रम आणि वृद्धाश्रम येथील रुग्णांसाठीदेखील प्रतिष्ठानतर्फे सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना जी सेवा लागेल, ती प्रतिष्ठानमार्फत देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या गरजू व्यक्ती प्रतिष्ठानशी संपर्क साधतात, त्यांना गरजेप्रमाणे वैद्यकीय अधिकारी किंवा तत्सम सेवा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. एखाद्या रुग्णाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला हलवायचे असल्यास, ती सुविधाही प्रतिष्ठानमार्फत उपलब्ध करून दिली जाते.’

या सर्व सामाजिक कार्याबरोबरच प्रतिष्ठानतर्फे सार्वजनिक माघी गणेशोत्सवाचे आयोजन गेली तीन वर्षे केले जात आहे. या उत्सवाच्या माध्यमातूनही विविध लोकोपयोगी उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात. या कालावधीत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. त्यात वाण म्हणून दर वर्षी सुमारे दीड हजार रोपांचे वाटप केले जाते. गणपती विसर्जन मिरवणुकीतही ‘कचरामुक्त शहर’, ‘मुलगी वाचवा’, ‘स्त्रीभ्रूणहत्या टाळा’ असे समाजोपयोगी संदेश दिले जातात.

प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीत प्रथमच मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मान्यवरांसोबत प्रतिष्ठानचे सदस्यकाही महिन्यांपूर्वी एका बेवारस मनोरुग्ण महिलेचे निधन झाले. काही केल्या तिच्या नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने या महिलेचे बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केले जाणार होते. या घटनेची माहिती प्रतिष्ठानच्या सदस्यांना मिळताच त्यांनी त्या मनोरुग्ण महिलेचे पालकत्व स्वीकारून तिच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले.

गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्याप्रति तळमळ असलेल्या समविचारी तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या प्रतिष्ठानमार्फत पदरमोड करून समाजसेवा केली जाते. त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे अथवा अन्य कोणाकडे मदतीची याचना केली जात नाही, हे विशेष. त्यांच्या कार्याला शुभेच्छा!

संपर्क :
सचिन शिंदे : ८००७८ ४११११
सतीश राणे : ९४२१२ ३२४९१ 

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(संस्थेचे सचिन शिंदे व सतीश राणे यांनी संस्थेबद्दल दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search