Next
सुयशचे स्वप्न टोकियो पदकाचे..
BOI
Friday, November 02, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुयश जाधवचे अभिनंदन करताना

आपल्या देशात क्रिकेट, टेनिस यांसारखे खेळ जास्त लोकप्रिय असले, तरी ऑलिंपिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या अनेक खेळांबद्दल सर्वांनाच कुतुहल असते. यापैकीच एक खेळ म्हणजे जलतरण. महाराष्ट्राचा दिव्यांग खेळाडू सुयश जाधव याने या खेळात अनेक पदके मिळवली असून आता त्याला टोकियो ऑलिंपिकचे वेध लागले आहेत.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या दिव्यांग जलतरणपटू ‘सुयश जाधव’बद्दल...
.......................................
‘आशियायी पॅरा खेळ स्पर्धां’मध्ये सुवर्णयश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या सुयश जाधवने ‘वर्ल्ड पॅरा जलतरण चॅम्पियनशिप’ आणि ‘टोकियो पॅरालिंपिक’मध्ये सुवर्ण पटकावण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. जकार्तामध्ये नुकत्याच झालेल्या आशियायी पॅरा गेम्समध्ये जलतरणपटू सुयशने एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके पटकावली. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच सुयशला गौरविण्यात आले.  

मुळचा सोलापूरचा असलेला सुयश सध्या पुण्यात राहतो.  त्याने ५०मीटर बटरफ्लायमध्ये ३२.७१ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण मिळवले. आता पुढील वर्षी मलेशियात वर्ल्ड पॅरा जलतरण चॅम्पियनशिप होणार आहे. त्यानंतर टोकियोमध्ये २०२० पॅरालिंपिक होणार आहे. या दोन स्पर्धांच्या दृष्टीने तो सराव करत आहे. या स्पर्धांत सुवर्ण मिळविण्याचे त्याचे ध्येय आहे. ५०मीटर बटरफ्लायमध्ये तो २९ सेकंद वेळ नोंदविण्याच्या दृष्टीने कसून सराव करत आहे.

केंद्र सरकारकडून बक्षीस जाहीर झाल्यानंतर ते लगेच दिले जाते, मात्र, राज्य सरकारकडून घोषणा झाल्यानंतर ते बक्षीस मिळण्यास खूप वाट पाहावी लागते, असा एकंदर अनुभव असल्याने राज्य सरकारने बक्षीस जाहीर केल्यावर ते लगेचच दिले पाहिजे, तसेच आशियायी खेळांतील पदक विजेत्यांना जेवढी बक्षीस रक्कम दिली जाते, तेवढीच बक्षीस रक्कम आशियायी पॅरा खेळातील पदक विजेत्यांनाही मिळावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सुयश हा भारताचा एकमेव ‘ए’ दर्जाप्राप्त दिव्यांग जलतरणपटू आहे. त्याला ‘गो स्पोर्टस् फाऊंडेशन’चे सहकार्य असून प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला ही संस्था सहकार्य करते.   ज्याप्रमाणे मुख्य खेळाडूंसाठी क्रीडा मंत्रालयाची टीओपी (टार्गेट ऑलिंपिक पोडियम) योजना आहे. त्याच स्वरूपाची एखादी योजना दिव्यांग खेळाडूंसाठीदेखील सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुख्य ऑलिंपिक स्पर्धेनंतर दिव्यांगांची ऑलिंपिक स्पर्धा होत असते. त्यातील पदक विजेत्या खेळाडूंची कामगिरीदेखील महत्त्वाचीच असते, त्यामुळे असा फरक अथवा भेदभाव तिथे होऊ नये असे वाटते.  

सोलापूरमध्ये जन्माला आल्यानंतर सहावीत असताना सुयशला वडिलांप्रमाणे जलतरणाची गोडी लागली. मात्र एका अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी होण्याच्या मार्गावर आले होते. एका इमारतीत सुरू असलेल्या बांधकामाच्या वेळी तिथे असलेल्या काही इलेक्ट्रिक वायरचा शॉक सुयशला बसला आणि त्याला शारीरिक व्यंगत्व आले. या घटनेनंतर त्याची कारकीर्द तिथेच थांबेल की काय, अशी भीती निर्माण झाली होती, मात्र वडिलांचे प्रोत्साहन, वैद्यकीय उपचार आणि अफाट जिद्द यांच्या जोरावर सुयशने पुन्हा एकदा पाण्यात सूर मारला आणि २०१५पासून आजतागायत विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवत असंख्य पदके जिंकली. 

२०१६मध्ये ‘रिओ पॅरालिंपिक’ स्पर्धेत त्याने प्रथमच ‘ए’ दर्जा प्राप्त केला. त्याचे वडिल स्वतः राष्ट्रीय जलतरणपटू होते. त्यामुळे सुयशला खेळातील कारकीर्दीसाठी आवश्यक असे महत्त्वाचे प्रोत्साहन घरातूनच मिळाले. ५०मीटर बटरफ्लाय, फ्री स्टाईल, १०० मीटर बेस्ट स्ट्रोक्स आणि २०० मीटर वैयक्तिक मिडले या प्रकारात सुयश सहभागी होतो. अर्थात५० मीटर बटरफ्लायमध्ये त्याची सर्वांत जास्त मक्तेदारी आहे. २०१५च्या जागतिक स्पर्धेत सुयशने एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवत रिओची पात्रता मिळवली होती. यंदाही आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्याने जागतिक विजेतेपद स्पर्धा आणि टोकियो पॅरालिंपिक स्पर्धा यांच्यासाठी आवश्यक पात्रता मिळवली आहे. पुढील काळात सुयशसारख्या खेळाडूंना प्रायोजक, प्रोत्साहन आणि आर्थिक पाठिंबा मिळाला, तर हे खेळाडूही पॅरालिंपिक स्पर्धा गाजवून देशासाठी गौरवशाली ठरेल, अशी कामगिरी करतील...

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Megha more About 141 Days ago
Excellent artical 👌👌👌👌👌
0
0

Select Language
Share Link