Next
उद्योगाच्या तारूचे समर्थ नेतृत्व करणाऱ्या सुमती मोरारजी
BOI
Thursday, October 11, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

सुमती मोरारजीवयाच्या विसाव्या वर्षी सिंदिया स्टीम नेव्हिगेशन या जहाज वाहतूक कंपनीचा कारभार पाहायला सुरुवात केलेल्या सुमती मोरारजी ४३व्या वर्षी कंपनीच्या सर्वेसर्वा बनल्या. उद्योगाकडे केवळ अर्थार्जनाचे साधन म्हणून न पाहता, विविध देश जोडण्याचे साधन म्हणून त्यांनी त्याकडे पाहिले. ‘नवरत्ने’ मालिकेत आज ओळख सुमती मोरारजी यांच्या कार्याची....
............
अफाट, अलौकिक, अमर्यादित आणि असे बरेच काही ज्यांच्या कर्तृत्वाच्या बाबतीत म्हणता येईल, त्यांचे सुमती मोरारजी. त्यांच्यासारखे कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलेचा आजच्या काळातही मोठा सन्मान केला जाईल. त्याचा विचार करता त्या काळी इतके बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणे, अफाट कर्तृत्व आणि तितकेच कणखर नेतृत्व, हे सुमती मोरारजी यांचे गुण आश्चर्यचकित करणारे आहेत. 

मथुरादास गोकुळदास आणि प्रेमाबाई यांच्या पोटी १३ मार्च १९०९ रोजी जमुना हिचा जन्म झाला. त्या काळच्या प्रथेनुसार कमी वयातच त्यांचे लग्न झाले. शांतिकुमार मोरारजी हे त्यांच्या पतीचे नाव. शांतिकुमार मोरारजी यांचे वडील नरोत्तम यांच्यासह वालचंद हिराचंद आणि अन्य काही गुजराती उद्योजकांनी एकत्र येऊन सिंदिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी या जहाज वाहतूक कंपनीची स्थापना १९१९ साली केली होती. पुढे भारतातील सर्वांत मोठी जहाज कंपनी म्हणून तिने नावलौकिक मिळवला. सुमती मोरारजी यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सिंदिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीचा कारभार बघण्यास सुरुवात केली. 

सुमती यांचे सासरे नरोत्तम मोरारजी यांनी आपल्या सुनेची चुणूक ओळखून आपल्या मृत्युपत्रातच स्वतःच्या कंपनीची मालकी काही प्रमाणात मुलाच्या बरोबरीने सुनेच्याही नावावर केली होती. सासऱ्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे १९२३ साली कामाला सुरुवात करून १९४६ सालापर्यंत त्या कंपनीच्या सर्वेसर्वा बनल्या. साधारण सहा हजार कर्मचारी असलेल्या या कंपनीचा कारभार त्या एकहाती पाहत होत्या. मध्यंतरीच्या काळात भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीशी जवळून संबंध आल्याने १९४२ ते १९४६ या कालावधीत त्या पूर्णवेळ भूमिगत कार्यकर्त्या म्हणूनही काम करत होत्या. 

आपल्या कंपनीची जहाजे वापरून स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात अडकलेल्या भारतीयांना जलमार्गे मायदेशी सुखरूप आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या आणि जपणाऱ्या सुमती मोरारजींनी ‘इस्कॉन’च्या उभारणीतही बराच हातभार लावला. आपले गुरू अथवा गुरुबंधू यांच्या परदेश प्रवासाची सर्व व्यवस्था त्या आपल्या कंपनीतर्फे मोफत करत असत. त्यांनी मुंबईला जुहू येथे सुमती विद्या केंद्र नावाने शाळाही सुरू केली होती. 

त्यांच्या कर्तृत्वामुळे १९५६मध्ये ‘इंडियन नॅशनल स्टीमशिप ओनर्स असोसिएशन’ या जहाजमालकांच्या संघटनेचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. जहाजमालकांच्या संघटनेचे अध्यक्षपद स्त्रीकडे असण्याची ही देशातीलच नव्हे, तर जगातील पहिलीच घटना होती. पुढे १९६५मध्येही त्या या संघटनेच्या पुन्हा अध्यक्षा बनल्या. १९७०मध्ये लंडनमधील वर्ल्ड शिपिंग फेडरेशनच्या उपाध्यक्षा म्हणून त्या निवडल्या गेल्या. पुढे भारत सरकारने त्यांना जहाज वाहतूक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मविभूषण’ हा उच्च सन्मान देऊन १९७१मध्ये गौरवले. भारतीय संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक बैठक याचा त्यांना पुरेपूर अभिमान होता. तसेच जगभर त्याचा प्रचार-प्रसार करावा, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा, तत्त्वज्ञानाचा जगभरातील लोकांना फायदा व्हावा, म्हणून त्या नेहमीच प्रयत्नशील असत.

सहा भावांच्या पाठची बहीण असलेल्या सुमती मोरारजी यांचे बालपण अत्यंत संपन्न स्थितीत गेले. मुंबईत एका पुढारलेल्या कुटुंबात वाढल्याने त्यांनी काळ जुना असूनही संपूर्ण स्वातंत्र्य उपभोगले होते. वयाच्या तेराव्या वर्षी लग्न होऊनही सुदैवाने चांगल्या आणि मोकळ्या विचारांचे सासर मिळाल्याने आयुष्यात त्या मोठी झेप घेऊ शकल्या. मिळालेल्या संधीचे तर त्यांनी सोने केलेच; पण अनेक नवीन संधी स्वतः शोधून काढल्या.

कुठलाही उद्योगधंदा उभा करणे, चालवणे, वाढवणे यामागे अर्थार्जन हा मुख्य हेतू असला, तरी तो हेतू साध्य करतानाच आपल्या वेगळ्या विचारामुळे सुमती मोराराजी हे संपूर्ण व्यक्तिमत्त्व वेगळे उठून दिसते. त्याबद्दलचे त्यांचे विचार त्यांच्याच शब्दांत -

‘It is not purely for business motives that we today concentrate on shipping. We want our people to travel abroad and the foreigners to see our ancient land. It has been the Indian tradition to export the best to foreign countries. We did business in merchandise for centuries, but our most precious cargo has been ideas of universal brotherhood and deep spirituality... Our tradition of such transcendent goodwill to all has continued throughout.’

याचा थोडक्यात आशय असा – ‘जहाज वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्याचा हेतू केवळ उद्योगापुरताच मर्यादित नाही. आपल्या लोकांनी जगभर फिरावे आणि परदेशी पर्यटकांनी आपली प्राचीन वारसा असलेली भूमी पाहावी, असे आम्हाला वाटते. विश्वबंधुत्व आणि अध्यात्माचा प्रसार जगभर व्हायला हवा.’

अशा या वेगळ्या विचारांच्या आणि वेगळे कर्तृत्व गाजवणाऱ्या सुमती मोरारजी यांचे २७ जून १९९८ रोजी निधन झाले. त्यांच्या कार्याला सलाम!

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search