Next
युरोपमधलं सुंदर गुपित – फॅरो बेटं
BOI
Friday, June 08, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:फॅरोची १८ बेटं नॉर्वे आणि आइसलंडच्या मधोमध नॉर्थ अॅटलँटिक ओशन आणि ‘नॉर्वेजियन-सी’च्या मध्यभागी वसलेली असून, ती समुद्रातल्या ज्वालामुखीच्या लाव्हामुळे तयार झाली आहेत. सुरेख हिरवीगार कुरणं, उंच डोंगरांचे सुळके, अधूनमधून छोटी घरं, त्यांची लाल, निळी, गुलाबी, हिरवी छपरं अशी रमणीय दृश्यं दिसणारं हे ठिकाण म्हणजे फोटोग्राफर्सची ‘ड्रीम प्लेस’च आहे. ‘युरोप्स बेस्ट केप्ट सिक्रेट’ असं म्हटलं जाणाऱ्या फॅरो बेटांची सफर... ‘विश्वगामिनी सरिता’ सदराच्या तिसऱ्या भागात...
..........
आम्ही काही वर्षांपूर्वी एडिंबराहून (Edinburgh, Scotland) आइसलंडला बोटीने गेलो होतो. ही क्रूझ करताना वाटेत नेहमीपेक्षा काही वेगळी बेटं पाहायला मिळणार होती, त्यांचं आकर्षण होतं. ती बेटं म्हणजे शेटलंड, ऑरर्क्नी आणि फॅरो. पूर्वीपासूनच या बेटांबद्दल मला खूप कुतूहल होतं. जेव्हा आइसलंडला गेलो, तेव्हा माझी ही इच्छा पुरी झाली. तर मग या अनोख्या फॅरोची (Faroe Islands) थोडी सफर तुम्हालाही घडवते. फॅरोची १८ बेटं नॉर्वे आणि आइसलंडच्या मधोमध नॉर्थ अॅटलँटिक ओशन आणि ‘नॉर्वेजियन-सी’च्या मध्यभागी वसलेली आहेत. ती आर्क्टिक सर्कलच्या जवळ आहेत. ही बेटं समुद्रातल्या ज्वालामुखीच्या लाव्हामुळे तयार झाली आहेत. बेटांच्या वर नॉर्थ अॅटलँटिक ओशनमधून आलेली उंच बसॉल्टची शिखरं आहेत. पूर्वी ही फॅरो बेटं डेन्मार्कची होती; पण आता त्यांना ‘सेल्फ गव्हर्नन्स’चा हक्क मिळाला आहे. त्यांचं संरक्षण आणि राजकीय निर्णय यांवर मात्र अजून डेन्मार्कचा हक्क आहे. इथली माणसं फॅरोइज भाषा बोलतात. त्यांची संस्कृती डेन्मार्कपेक्षा खूप वेगळी आहे. या लेखात मी या बेटांचा इतिहास देणार नाही. कारण ही माहिती हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध असते. आम्ही तिथे काय पाहिलं, याचं वर्णन इथं फोटोंसह करणार आहे.आमची बोट कोलाफजॉर्डर (Kollafjordur) नावाच्या छोट्या गावाच्या किनाऱ्यावर थांबली. बंदर सर्व बाजूंनी उंच उंच हिरव्यागार डोंगरांनी घेरलेलं होतं. गावात जेमतेम ७००-८०० माणसांची वस्ती होती. फॅरोची सगळी बेटं मिळून एकूण वस्ती फक्त ५० हजार; मात्र मेंढ्यांची संख्या ७० हजार! मेंढ्या पाळणं आणि त्या खाणं हे तिथं मोठ्या प्रमाणात आहे. डोंगराच्या कड्यांवर मेढ्यांचे कळप चरताना दिसत. इथे एक वाईट प्रकार होतो, तो म्हणजे व्हेल्सची मोठ्या प्रमाणात कत्तल. दर वर्षी चरबीसाठी त्यांच्या स्पायनल कॉर्डमधे हूक घालून शेकडो व्हेल अत्यंत क्रूरपणे मारले जातात. हा संहार होतो, तेव्हा त्या भागातला समुद्र रक्ताने लालभडक होतो. आता नशिबाने बरेच प्राणिप्रेमी ग्रुप्स याविरुद्ध निषेध करत आहेत. इथे ध्रुवीय हवा असल्यामुळे गारठणारी थंडी आणि वारा असतो. तिथल्या थंड हवेत शेती फारशी होत नाही. त्यामुळे मांसाहार हे त्यांचं मुख्य खाद्य आहे.इथे सुरेख हिरवीगार कुरणं आणि सगळीकडे उंच डोंगरांचे सुळके आहेत. अधूनमधून छोटी घरं, त्यांची लाल, निळी, गुलाबी, हिरवी छपरं त्या लँडस्केपमध्ये उठून दिसत होती. हे रम्य ठिकाण म्हणजे फोटोग्राफर्सची ‘ड्रीम प्लेस’च आहे.काही काही टेकड्यांच्या वर इतकी तुरळक घरं होती, की थंडीत ही बेटं बर्फानं आच्छादून गेल्यावर हे लोक एकमेकांशी संपर्क कसे साधत असतील, याचं आश्चर्यच वाटलं. किती एकाकी आयुष्य असेल तिथे! ती घर बघून त्यांच्यात कितपत इन्शुलेशन असेल, ऊब असेल, असा प्रश्नही पडला. इथलं आयुष्य कष्टाचं असतं. बरीच तरुण मंडळी शिक्षणासाठी डेन्मार्कला जातात आणि तिथेच स्थायिक होतात. त्यामुळे छोट्या गावांतून रिकामी घरंही दिसतात.आम्ही बोटीच्या धक्क्याहून बसने टॉर्शाव्न (Torshavn) या फॅरोच्या पिटुकल्या राजधानीत गेलो. डोंगरातून खूप वळणावळणांचा अरुंद रस्ता होता. खाली दऱ्या, समुद्र, घरं असं दृश्य होतं. सगळीकडे हिरवंगार असलं, तरी मोठी झाडं नव्हती. पाण्याचे धबधबे अधूनमधून दिसत होते. टॉर्शाव्न तासाभरात बघूनसुद्धा झालं! त्यांची छोटी पार्लमेंट खूपच जुनी आहे. गावात थोडे कॅफे, संगीताची दुकानं, आर्ट गॅलरीज, अरुंद बोळ आहेत. आम्ही जून महिन्यात गेलो होतो. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असल्याने तिथे दिवसाला २२ तास उजेड असतो. तिथली मंडळी सूर्यप्रकाशाचा आस्वाद घेत हिंडत होती. रस्त्यात संगीताचे कार्यक्रम चालले होते. तिथे केव्हाही ढगाळ हवा व पाऊस येऊ शकतो. त्यामुळे अशा निरभ्र दिवसाची त्यांना खूप अपूर्वाई असते. वर्षातले तीनशे दिवस इथे वर्षा असते!  १९०० साली या गावाची लोकसंख्या १०० होती. आता २० हजार आहे. वर्षाचे ३-४ महिने हवा सुसह्य असते. मग प्रचंड थंडी, बर्फ, पाऊस असतो. अशा वेळी मंडळी घरी बसून मेंढीचं आंबवलेलं (fermented) मांस किंवा वाळवलेले मासे खातात. थंडीमुळे सगळीकडे अगदी शुकशुकाट असतो. हे ठिकाण पर्यटकांना फारसं माहिती नसल्याने त्यांची गर्दी नव्हती. उन्हाळ्यात दिवसातून दोन-तीन विमानं येतात आणि थंडीत तर त्याहून कमी. त्यामुळे या बेटांना एक मोहकता आहे, ‘अनटच्ड फील’ आहे.टॉर्शाव्नच्या तिन्गनेज नावाच्या जुन्या ऐतिहासिक भागात काही घरांवर अनोखी छपरं दिसली. काही घरं १६७३च्या मोठ्या आगीतून वाचलेली आहेत. लालचुटुक टिंबरची आणि दगडाची घरं आणि त्यांच्यावर हिरवीगार छपरं मस्त दिसत होती. झाडं नसल्यामुळे इथे लाकूड खूप महाग आणि दुर्मीळ असतं. छप्परावर मुद्दाम गवत वाढवलेलं होतं. ही ‘टर्फ’वाली घरं बघून गंमत वाटली. गवतामुळे घराला ऊब येते; मात्र छपरावर जाऊन लॉनमोवरने गवत कापणं ही एक कसरतच असते. ज्या लोकांना निसर्गाची आवड आहे त्यांना ही बेटं खूप आवडतील. हायकिंग, सायकलिंग, बोटिंग, हॉर्स रायडिंग असं इथे खूप काही करण्यासारखं आहे. आम्ही लहान बोटीने वेस्टमना बेटाभोवती फिरून आलो. उंच हिरवेगार कडे, त्यात वाहणारे धबधबे, टोकदार शिखरांचे वेगवेगळे आकार, त्यावर पक्ष्यांची घरटी म्हणजे पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्गच! आम्ही गेलो तेव्हा तिथे पाऊस पडत होता, म्हणून मला कॅमेऱ्यात पक्षी टिपता आले नाहीत; पण हवा चांगली असताना फुल्मार्स, किटीवेक्स, रेझरबिल्स, पफिन्स वगैरे पक्षी दिसतात. इथे लोक पर्यटन करताना कसलीच शाश्वती देत नाहीत. सगळं काही हवेवर अवलंबून असतं. म्हणून या जागेला ‘लँड ऑफ मेबी’ असं नाव पडलंय. 

फॅरो बेटांना ‘युरोप्स बेस्ट केप्ट सिक्रेट’ म्हणतात. हे गुपित आम जनतेला कळायच्या आधी जमल्यास तिथे जरूर जाऊन या. 

सरिता नेने- सरिता नेने, कॅलिफोर्निया

(लेखिका हौशी आणि अभ्यासू पर्यटक असून, अमेरिकेतील पर्यटन क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमधील दीर्घ अनुभवानंतर अलीकडेच निवृत्त झाल्या आहेत. लेखातील फोटो त्यांनी स्वतः काढलेले आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘विश्वगामिनी सरिता’ या पाक्षिक सदरातील त्यांचे लेख  https://goo.gl/TjepRF या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
उदय महादेव तळवलकर About 337 Days ago
छान माहिती ज्ञानात भर घालणारी. धन्यवाद.
0
0
Swati mehendale About 345 Days ago
खुप छान सफ़र घडवलिस साधी सरळ शैली पण सगळ्याचा अढावा घेतलाय सुंदर फोटो शुभेच्छा
0
0
माधव विद्वंस About 346 Days ago
खूपच छान
0
0
Arvind Agashe About 347 Days ago
Nice discription of unknown islands in Europe. Very interesting to know life in isolated islands. Thanks.
1
0

Select Language
Share Link
 
Search