Next
रायगड किल्ल्याचा स्थापत्य-इतिहास : अभ्यासाचा एक महत्त्वाचा पैलू
BOI
Wednesday, June 05, 2019 | 09:45 PM
15 0 0
Share this article:

रायगड तटबंदी

‘पुरातन स्थापत्य इतिहास संशोधनात अनेक साधनांचा समावेश असतो. उपलब्ध साधने बारकाईने तपासण्याची गरज असते. म्हणून ऐतिहासिक सत्य वास्तुशास्त्र कसोटीवर तपासून मगच वाचक/दर्शकांसमोर यायला हवे.’ ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे आणि इतिहास अभ्यासक डॉ. सचिन पोवार यांनी रायगड किल्ल्याच्या स्थापत्य-इतिहास संकलनाबद्दल मांडलेले विचार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त (सहा जून) प्रसिद्ध करत आहोत.
.............
हिंदू शैलीतील अलंकृत स्तंभ कमानभारतातील हिंदू राजवटीत सामाजिक जाणिवेतून अनेक सुंदर मंदिरे उभी राहिली. तसेच, मध्ययुगीन कालखंडात, मुस्लिम राजवटीत बांधलेल्या अनेक वैविध्यपूर्ण इमारतींमुळे दक्षिण पठाराच्या स्थापत्य सौंदर्याला अलौकिकता मिळाली. गौरवशाली गड-किल्ले हाच महाराष्ट्रासाठी सर्वांत मोठा मध्ययुगीन स्थापत्यठेवा आहे. तत्कालीन स्थापत्याच्या इतिहासावर अनेक वास्तुविशारद आणि इतिहासकारांनी विस्ताराने लिहिले आहे. आजवर महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास केवळ इतिहासकारांच्या भूमिकेतून मांडला गेल्याने जिज्ञासू वर्ग किल्ल्याच्या स्थापत्यविषयक माहितीपासून अनभिज्ञ राहिला. ही उणीव भरून काढण्याची आवश्यकता ओळखून रायगडाच्या स्थापत्यविषयक इतिहासावर लिहायचे ठरवले. या कालखंडातील अनेक राजवटींमधील खरा स्थापत्य इतिहास पुढे आणण्यासाठी अव्वल दर्जाची ऐतिहासिक साधने माहिती असावी लागतात. 

बालेकिल्ला अंतर्रचना

किल्ला म्हणजे केवळ लढाऊ इमारत नव्हे, तर किल्ल्याच्या रचनेत स्थान, संरक्षक रचना, तसेच तंत्रकौशल्य अंतर्भूत असते. एका शतकाहून अधिक काळ पडझड झालेल्या रायगड किल्ल्याला अल्प साधनांच्या आधारावर पूर्वरूप मिळवून देणे जिकिरीचे आहे; पण अशक्य मुळीच नाही, यावर माझे व डॉ. पोवारांचे एकमत झाले. ऐतिहासिक साधनांच्या बाबतीत डॉ. पोवारांनी आश्वस्त केल्यावर गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या वडगावच्या शिवचरणस्पर्श ट्रस्टसोबत २५ मार्च २०१८ रोजी रायगडावर भेटण्याचे ठरवले. ऐतिहासिक अव्वल साधने आणि स्थापत्य दृष्टिकोन तपासून शिवकालीन परिदृश्य ‘जसे होते तसे’ उभे करता येईल, याची खात्री रायगड भेटीत आणखी बळकट झाली.

जगदीश्वर मंदिर व शिवसमाधी - हवाई दृश्य

या भेटीतील योगायोग असा, की त्याच दिवशी रायगड स्मारक प्राधिकरण समितीचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजेही जगदीश्वर मंदिर आवारात उपस्थित होते. हिंदवी स्वराज्य स्थापलेल्या महापुरुषाची आठवण पुढील पिढ्यांच्या सदैव स्मरणात राहावी, म्हणून प्रति वर्षी सहा जून रोजी शिवराज्याभिषेक साजरा केला जातो. राज्याभिषेकाला या वर्षी ३४५ वर्षे पूर्ण होतील. त्या निमित्ताने रायगड स्थापत्य इतिहास संकलनाच्या उपक्रमाबद्दलचा विचार आम्ही दोघे मिळून मांडत आहोत.

दख्खनचे पठार

अति-प्राचीन भारताचा दक्षिण मध्य भूभाग म्हणजे दख्खन म्हणजेच दक्षिण पठार (डेक्कन प्लॅटू) होय. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश (सध्याचे तेलंगण) ही राज्ये मोडतात. रायगड किल्लाही याच भूमीचा भाग आहे. साधारणतः १३ ते १७व्या शतकापर्यंत ही राज्ये मुस्लिम राजवटीखाली राहिल्यामुळे दक्षिण पठारावरील मराठा रयतेस ‘स्वतंत्र’ असणे व ‘स्वराज्य’ म्हणजे नेमके काय, याची कल्पना नव्हती. ‘स्वतंत्रता’ ही केवळ कल्पना आहे; आम्ही स्वतंत्रच आहोत, असा त्यांचा समज होता. सहजी न उमगणाऱ्या या कल्पनेस वास्तविकतेत बदलण्याचे बळ शिवछत्रपतींनी दिले. पिढ्यान् पिढ्या परछत्राखाली राहिलेल्या स्वकीय रयतेस अभिजात संरक्षण व स्वातंत्र्याची हमी देऊन स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातील एकमेवाद्वितीय पुरुष होते! अवघ्या काही वर्षांतच मराठी स्वराज्याची मुहूर्तमेढ व उत्कर्ष अनुभवण्याचे भाग्यही त्या पिढ्यांना लाभले. ही मध्ययुगीन ऐतिहासिक घटना, जनसामान्यांसाठी दिलेला लढा व योगदानामुळे त्यांचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच शिवछत्रपतींना युगप्रवर्तक म्हटले जाते.

रायगड - हवाई दृश्य

मराठेशाहीचा संयुक्त कालखंड शहाजीराजांच्या उत्कर्षापासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंत (इ. स. १६०० ते १८१८) मानला जातो. शिवछत्रपतींच्या निधनानंतर जवळपास १९ वर्षांनी सभासदाने पहिली बखर लिहिली. बखरीतील मराठ्यांचा इतिहास आख्यायिका, दंतकथा व ऐकीव माहिती, तसेच दुय्यम दर्जाच्या साधनांवर आधारित असल्यामुळे त्यात ऐतिहासिक सत्य फारसे दिसून येत नाही. तसेच, तत्कालीन लेखकांना ग्रंथलेखनाचे शास्त्रीय ज्ञान नसल्याने ती माहिती अशास्त्रीय वाटते. त्यात बखरकारांची भूमिका भाटाची असल्यामुळे सत्य बाजूला ठेवून ते राजाचे फक्त गुणवर्णन करत असत.

तटबंदीतून दिसणारा स्तंभ व निसर्गदृश्य

म्हणून बखर लेखनात स्थळ, काळ, व्यक्ती आणि प्रसंगांचा विपर्यास झालेला दिसून येतो. रायगडावरील चुकीची नामकरणे, शैलीतील विरोधाभास व उपयुक्ततेबाबत आजही एकवाक्यता दिसून येत नाही. अशा अनेकविध कारणांमुळे रायगडावरील स्थापत्यनिर्मितीचा निश्चित काळ सांगणे कठीण आहे. कालनिश्चितीसाठी शिवछत्रपतींची राज्याभिषेक तारीख ग्राह्य धरली, तरी जवळपास तीन शतकांहून अधिक काळ उलटला आहे. सलग अनेक वर्षे इमारतींची पडझड होत राहिल्यामुळे त्यातील स्पष्टता आणखी धूसर होते आहे. दिवसेंदिवस स्थापत्य पुरावे नष्ट होत आहेत व चुकीचा इतिहास पुढे रेटला जात आहे. ही बाब अधिक गंभीर आहे.

बाजारपेठ

जगदीश्वर मंदिर प्रवेशद्वार भिंतमराठ्यांच्या गडकोटांची जी गत, तीच गत इतिहासलेखन आणि गडकोटविषयक पुस्तकांची! शिवपूर्वकाळात मराठा पाळेगार, विजयनगर, बहामनी, निजामशाही, आदिलशाही अशा अनेक राजवटींत रायगडावर बांधकामे झाली. तसेच स्थित्यंतरेही होत गेली. त्यामुळे स्थापत्य शैलीत विविधता आढळते. सद्यस्थितीतील रायगड पाहिल्यानंतर अनेक प्रश्न मनात रुंजी घालतात. उदा. रायगड नेमका कसा होता? तो कोणी बांधला? राजसभेची अंतर्गत रचना कशी होती? नगारखाना नेमक्या कोणत्या शिवपूर्वकालीन राज्यकर्त्याच्या स्वागतासाठी बांधला गेला होता? दोन्ही द्वादशकोन स्तंभांची शैली, घटक व उपयुक्ततेत साम्य आढळते, तरीही तफावत का आहे? तत्कालीन बालेकिल्ल्यातील छत्रपतींचे निवासस्थान दुमजली होते का?

जगदीश्वर मंदिराचा घुमटदेवघर, मुदपाकखाना, भोजनगृह यांच्या जागा नेमक्या कुठे होत्या? ब्रिटिश तोफगोळ्यांमुळे रायगड पूर्णपणे भस्मसात झाला, हे कितपत खरे आहे? रायगडावर पूर्णतः शाबूत राहिलेल्या मोजक्या इमारती आजही टिकून आहेत; पण जोत्यापर्यंत शिल्लक राहिलेल्या अनेक इमारती का कोसळल्या? जगदीश्वर मंदिरावरील घुमट व मिनार मुस्लिम धाटणीचे का आहेत? नगारखाना, स्तंभ व जगदीश्वर मंदिरावरील मोजके घटक एकसारखे आहेत. परंतु त्या इमारती मिश्र शैलीत व वेगवेगळ्या कालावधीत बांधल्या आहेत का? पाचाड येथे बाजारपेठ होती. मग गडावर बाजारपेठ का बांधली? तसेच, स्तंभ, मजले, घोड्यावर बसून बाजारहाट, तसेच बाजारपेठेची मूळ उपयुक्ततादेखील आख्यायिकेच्या गराड्यात अडकवली गेली आहे. यांसारख्या अनेक निरर्थक गोष्टी लेखकांनी आपापल्या मनोविश्लेषणाद्वारे अधिकाधिक आलंकारिक केल्यामुळे वाचक/दर्शकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहेत. तसेच, टाकसाळ/पाणी तापवण्याची खोली व बालेकिल्ल्यातील स्वच्छतागृहाची ‘अडनिड’ मांडणी संभ्रमात पाडणारी आहे!

स्वच्छातागृह

एक शतकाहून अधिक काळ दुर्लक्षित राहिलेल्या रायगडाची स्थिती इ. स. १८८५मध्ये गोविंद बा. जोशी लिखित ‘रायगड किल्ल्याचे वर्णन’ या पुस्तकामुळे सर्वांना समजली. शिवछत्रपतींच्या समाधिस्थळाची अवस्थादेखील नीटनेटकी नसल्याचे समजल्यानंतर समाधीच्या दर्शनासाठी रायगडावर जाणाऱ्यांची संख्या वाढली. वर उल्लेखलेले पुस्तक व त्यानंतर प्रसिद्ध झालेली काही मोजकी पुस्तके वगळता इतर पुस्तकांतील पडझडीविषयीची माहिती जुजबी स्वरूपातील आहे. रायगडावरील प्रत्यक्ष दाखले व पुस्तकातील माहितीमध्ये खूपच तफावत आढळते. सर्वाधिक तफावत इमारतींच्या नामांकनात आढळते. नावे देताना ती नीट तपासून पाहायला हवी होती, असे केवळ आमचेच नव्हे, तर बहुतांश लेखक-अभ्यासकांचे मत आहे. मराठ्यांच्या इतिहास साधनांची संख्या तीनशेहून अधिक असल्याचे आढळून येते. मराठा स्थापत्य इतिहासावर मात्र मोजकीच पुस्तके आहेत. पुरातन स्थापत्य इतिहास संशोधनात अनेक साधनांचा समावेश असतो. उपलब्ध साधने बारकाईने तपासण्याची गरज असते. म्हणून ऐतिहासिक सत्य वास्तुशास्त्र कसोटीवर तपासून मगच वाचक/दर्शकांसमोर यायला हवे.

कमळ शिल्प

शरभ शिल्पस्थापत्य शैलीप्रमाणेच कोरीव शिल्पे व चित्रेदेखील स्थापत्याचाच भाग आहेत. शिल्पांचे स्थान मुख्यतः गड-किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर किंवा महत्त्वपूर्ण इमारतींच्या द्वारपट्टीवर असते. परिसर एकच; पण विविध शैली, दर्शनी भिंतीवर दोन विरुद्ध धार्मिक घटकांतील मिश्र बांधकाम, तर कुठे शिल्पे आढळतात. कोणत्याही स्थापत्य रचनेतील शिल्पांच्या अस्तित्वावरून राजवटीच्या कालनिश्चितीचे धागे जोडणे चुकीचे ठरू शकते. महाराष्ट्रात मुस्लिमपूर्व काळातील शिल्पे व चित्रे यांची परिस्थिती काय होती, याचा खरा अभ्यास अजून झालेला नाही. 

नगारखाना

आपल्याकडील बहुतांश इतिहासकारांनी स्थापत्य प्रमापकास धरून व्यक्त होण्याऐवजी केवळ एकाच आधारावर विचार सीमित ठेवल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. लिखित रूपातील पुरातन इतिहास साधनांविषयी इतिहासकारांत मतमतांतरे असणे साहजिक असते. असा इतिहास पुन्हा पुन्हा तपासून दुरुस्त करता येतो: पण दृश्य स्थापत्य दाखले हाच ठोस पुरावा असतो. इमारत शैली व शिल्पावरून एखाद्या इमारतीचा कालावधी ओळखता येतो, असे गृहीतक मांडता येत नाही.
पुरातन स्थापत्य इतिहासातील सत्य माहिती उपलब्ध होण्यासाठी देश-विदेशातील दस्तऐवज व सद्य स्थापत्य अवलोकनातून शोध घ्यायला हवा. किल्ल्यासंबंधी लिखित, चर्चित समज-अपसमज दूर करण्याच्या हेतूने कॉफी टेबल बुक लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजवर रायगडावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्या पुस्तकांत केवळ भर टाकण्याच्या उद्देशाने हे कार्य आम्ही हाती घेतले नसून, संभ्रम, दंतकथा, आख्यायिकांना पूर्णतः काटशह देऊन रायगड किल्ल्याची ‘ऑथेंटिक’ (विश्वासार्ह) स्थापत्यरचना केवळ तर्क, गृहीतकावर मांडण्यापेक्षा स्थापत्यनियोजन मापदंडावरच आधारित असावी, अशी आमची धारणा आहे. 

कलोसियम - हवाई दृश्य

विदेशात, पुरातन इमारती शहर परिसराचा अविभाज्य घटक समजून रीतसर जतन केल्याची अनेक उदाहरण आहेत. इटलीत रोममध्ये इसवी सनाच्या ७०-८०व्या शतकात शहराच्या मधोमध बांधलेले ‘कलोसियम अॅम्फिथिएटर’ व चौदाव्या शतकातील जर्मनी येथील प्राग शहर ही याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. तेव्हा अतिरंजित व अनैतिहासिक गोष्टींना काटशह देऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांच्या रायगडाचे संवर्धनही वर उल्लेखलेल्या धर्तीवर केले जावे. तसेच अन्य पुरातन इमारतींसाठी हे कार्य आदर्श ठरावे, अशी शासनाकडून अपेक्षा आहे. ब्रिटिश राजवटीत रायगडाची डागडुजी करणे शक्य नव्हते, हे मान्य केले, तरी ब्रिटिशांनी दुर्लक्ष केल्यामुळे जेवढे नुकसान झाले नसावे, त्याहीपेक्षा अधिक नुकसान संवर्धनाचे संपूर्ण अधिकार असलेल्या स्वतंत्र भारतातील केंद्र व राज्य शासनाच्या आधिपत्याखालील पुरातत्त्व खात्याने केलेल्या दुर्लक्षामुळे झाले आहे, हे कटू सत्य आहे. ब्रिटिश राजवटीतच पुरातन भारतीय इमारतींचे रीतसर जतन-संवर्धन व्हावे म्हणून पुरातत्त्व संस्थेची स्थापना करणारा लॉर्ड कर्झन हा ब्रिटिश होता, हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे. 

पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेतील जोती व तटबंदी कमानी

‘युनेस्को’सारख्या जागतिक संस्थेने पुढाकार घेतल्याने जगभरातील पुरातन वारसा टिकून राहिला आहे. आजवर ‘युनेस्को’ने जगभरातील १०९२ अतिमहत्त्वाच्या वारसा स्थळांची नोंद घेतली आहे. युनेस्कोने आखून दिलेल्या नियमांनुसार त्यांचे संवर्धन केले जाते. त्या यादीत भारतातील ३७ वारसास्थळांची नोंद आहे. युनेस्को प्रमाणित सर्वाधिक पुरातन स्थळांची नोंद असलेल्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. यावरून भारतातील पुरातन वारसास्थळांचे महत्त्व लक्षात येते.

हिंदू शैलीतील अप्रतिम शिल्पे, स्तंभ बाल्कनी व दगडी कमान

भारतीय पुरातत्त्व विभागाने रायगड किल्ला हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आहे. रायगड किल्ल्याचे जतन-संवर्धन जागतिक मापदंडांना अनुसरून व्हायला हवे. जेव्हा केव्हा, उद्याच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, त्यात ३८वे युनेस्को नामांकन रायगड किल्ल्याला दिल्याची नोंद व्हायला हवी. असे खरेच घडले, तर रायगड प्राधिकरण समितीने शिवछत्रपतींना दिलेली ती आगळीवेगळी भेट ठरेल. शिवराज्याभिषेकानिमित्ताने या लेखातून मांडलेल्या विचारांची दखल मुख्यमंत्री, तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली राज्यस्तरीय समिती आणि समितीतील सदस्य असलेले अर्थमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री, तसेच केंद्र आणि राज्याचा पुरातत्त्व विभाग, संबंधित विभागाचे सचिव, निमशासकीय सल्लागार, तांत्रिक सल्लागार आणि इतर अधिकारीवर्ग यांच्याकडून घेतली जाईल, असा विश्वास वाटतो.

मेघडंबरी

इमारतीची पडझड कायमस्वरूपी थांबवणे ही संवर्धनातील प्राथमिक बाब असते. परंतु, विकासकामावर अधिक भर असल्याचे दिसून येते. या बाबतीत शिवछत्रपतींच्याच जीवनातील उदाहरण देऊन सांगायचे झाले, तर कोंढाणा किल्ला मोहिमेचे देता येईल. शिवरायांनी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरेवर सोपवली होती. तानाजीने आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडून ‘आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे’ असे उद्गार काढले होते. रायगड जतन-संवर्धनासाठी ज्या अनेक मान्यवरांनी स्वयंप्रेरणेतून पुढाकार घेतला, त्यापैकी लोकमान्य टिळक हे एक होते. ते आज हयात असते, तर त्यांनीही ‘आधी रायगड संवर्धन, मग परिसर विकास’ याच शब्दांत ठणकावून सांगितले असते. ‘रायगड संवर्धन व विकास प्रक्रियेतील त्रुटींबद्दल आम्हाला कल्पना नव्हती किंवा कोणी त्यावर भाष्यही केले नाही,’ असे भविष्यात कोणी म्हणायला नको, म्हणून हा प्रयत्न!

संपर्क :
चंद्रशेखर बुरांडे - 
मोबाइल : ९८१९२ २५१०१
ई-मेल : fifthwall123@gmail.com
डॉ. सचिन पोवार -
मोबाइल : ९८५०६ २०२७३
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 48 Days ago
At least there is an attempt to be objective . We have no tradition of writing records-diaries . What was written was , mostly ,in In the form of glorification . That seems to be in fashion , even today . /
0
0
BDGramopadhye About 72 Days ago
Very important study . Fort at Panhala and that at Devagiri desrve such study . Probably , Ahamadanagar . Best wishes .
1
0

Select Language
Share Link
 
Search