Next
स्वर आणि सर्कस या दोन्हींवर हुकमत असलेले प्रो. विष्णुपंत छत्रे
BOI
Sunday, November 11 | 12:45 PM
15 0 0
Share this story

विष्णुपंत छत्रेशास्त्रीय संगीत क्षेत्रात नाव कमवायचं, हे विष्णुपंत छत्रेंचं ध्येय होतं. त्यांनी अतोनात कष्ट घेऊन ती विद्या चांगली आत्मसात केली. एका ब्रिटिश सर्कस मालकाच्या आव्हानामुळे त्यांनी स्वत:ची सर्कस उभी केली. देश-विदेशात तिचे प्रयोग करून ती अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी करून दाखवली. या विष्णुपंतांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
.........
एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पहिली भारतीय सर्कस सुरू झाली. तिचं नाव होतं ‘ग्रँड इंडियन सर्कस’ आणि तिचे संस्थापक होते विष्णुपंत मोरेश्वर छत्रे. मोठं विलक्षण व्यक्तिमत्त्व! शास्त्रीय संगीत क्षेत्रात नाव कमवायचं, हे विष्णुपंतांचं ध्येय होतं. त्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले आणि ती विद्या चांगली आत्मसात केली. एका ब्रिटिश सर्कस मालकाच्या आव्हानामुळे त्यांनी स्वत:ची सर्कस उभी केली. देश-विदेशात तिचे प्रयोग करून ती अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी करून दाखवली. या विष्णुपंतांचं चरित्र थोडक्यात पाहू या.

महाराष्ट्रातल्या सांगली प्रांतात अंकलखोप या छोट्या गावी सन १८४६मध्ये विष्णुपंतांचा जन्म झाला. शिक्षण घेत असताना त्यांना गायनाची आवड निर्माण झाली. अर्थात त्या वेळी कोणाकडून संगीताचे धडे घेतलेले नव्हते. एकदा काही मित्रांनी त्यांना गाणं म्हणायला भाग पाडलं. त्यांना ते काही नीट जमेना. मित्रांकडून अपमान झाला. अशा अपमानांमधूनच थोर व्यक्तिमत्त्वं आणि महान कार्यं उभी राहिलेली आपण बघतो. गाण्याबरोबरच त्यांना लहानपणापासून प्राण्यांची आवड होती. कुत्री-मांजरं, माकडं, कबुतरं आणि घोडे यांच्यात ते रमत; त्यांना शिकवून खेळ करून घेत. गाण्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेण्याचा निश्चय करून त्यांनी उत्तरेकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या काळी महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताची घराणी नव्हती. बनारस, आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर, किराणा ही विख्यात घराणी उत्तर हिंदुस्थानातच गायन-वादनाचं महान कार्य करत होती.

एव्हाना विष्णुपंतांचं लग्नही झालं होतं. गाणं शिकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी होती. रामदुर्ग संस्थानात त्यांना चाबुकस्वाराची नोकरी होती. जेवणखाणाची सोय होती आणि महिना तीन रुपये पगार मिळे. ती नोकरी सोडून, धोंडोपंत नावाच्या मित्राबरोबर ग्वाल्हेरला जाण्याचा निश्चय त्यांनी केला. जवळ पैसे नव्हतेच. २०-२५ रुपयांच्या आधारावर त्यांनी प्रथम मुंबई गाठली. पुढे मजल-दरमजल करत, काही वेळा पायपीट करून, लोकांना गाणी ऐकवत आणि प्रसंगी माधुकरी मागून दोघांनी अखेर ग्वाल्हेर गाठलं. तिथे सरदार बाबासाहेब आपटे हे अश्वूविद्येत प्रवीण म्हणून देशभरात प्रसिद्ध होते. विष्णुपंतांना घोड्यांबद्दल विलक्षण प्रेम होतंच. आपट्यांकडे अश्वसविद्या शिकून गायनाचं शिक्षण घ्यावं, असा त्यांचा विचार होता. बाबासाहेबांना महाराष्ट्रातून आलेला हा तरुण खूप आवडला. त्यांनी शिष्य म्हणून विष्णुपंतांचा स्वीकार केला. निरनिराळ्या प्रकारच्या घोड्यांचा अभ्यास आणि प्रशिक्षण तिथे सुरू झालं.

ग्वाल्हेर घराण्याच्या हद्दूखाँ यांचं गाणं ऐकल्यावर त्यांच्याकडूनच गायन शिकायचं असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी खानसाहेबांच्या घरी त्यांचं जाणं-येणं सुरू झालं. शिष्य म्हणून गुरुगृही प्रवेश मिळणं, ही गोष्ट सोपी नव्हती. केवळ दैव अनुकूल म्हणून ते भाग्य विष्णुपंतांना लाभलं. ग्वाल्हेर गायकी महाराष्ट्रात पोहोचावी, हा संकेतही त्यात असणार. हद्दूखाँ यांच्या गावोगाव मैफली सुरू असत. शिष्यपरिवार, घोडे, मेणा इत्यादी लवाजम्यासह प्रवास चाले. एकदा, पावसाळ्यात दुथडी भरलेली यमुना मोठ्या होडीतून ओलांडण्याचा प्रसंग आला. पाण्याला प्रचंड ओढ होती. त्यातून पलीकडचा काठ गाठणं मुश्कील झालं. सर्वांना जलसमाधी मिळणार, असं स्पष्ट दिसू लागलं. विष्णुपंत योगायोगानं सोबत होते. त्यांनी न डगमगता पुरामध्ये उडी मारली. होडीला बांधलेली दोरी दातांमध्ये घट्ट पकडून, दमछाक होत असताना पोहत पोहत त्यांनी जिवाच्या करारानं होडी किनाऱ्यापर्यंत नेली. सर्वांचे प्राण वाचवणाऱ्या विष्णुपंतांना ग्वाल्हेर घराण्याची विद्या प्रदान करण्याचं हद्दूखाँ यांनी तिथेच ठरवलं. विष्णुपंतांनी देखील त्यांच्याकडून कष्टपूर्वक, तळमळीनं शास्त्रोक्त गायन आत्मसात केलं. पुढे अनेक चीजांसहित ते महाराष्ट्रात परतले. त्यांची सिद्ध गायकी ऐकून, पूर्वी अपमान करणारा सारा मित्रपरिवार थक्क झाला. गायनाबरोबरच विष्णुपंत अश्वविद्येतही विशारद झाले होते.

एक ध्येय तर पूर्ण झालं. दुसरं एक लोकोत्तर कार्य त्यांच्या हातून घडायचं होतं. एकदा ते काही कामानिमित्त मुंबईला आले असताना सी. विल्सन नावाच्या ब्रिटिश गृहस्थांची सर्कस बघण्याचा योग आला. ‘भारतीयांना अशी सर्कस काढणं आणि खेळ करणं कदापि जमणार नाही,’ असे उद्गार साहेबानं काढले. त्यावर विष्णुपंतांनी शांतपणे सांगितलं, की ‘ही सर्कस तर काहीच नाही. मी याहून उत्तम सर्कस उभारून दाखवीन.’ आणि त्याच क्रॉस मैदानावर, चार घोड्यांसह त्यांनी खेळ सुरू केले. ही १८८२च्या दसऱ्याची गोष्ट. त्यांच्याकडे अश्वविद्येचं कौशल्य होतं. विल्सन सर्कशीकडून प्रेक्षकांची गर्दी विष्णुपंतांच्या तंबूकडे वळली. आश्चर्याची गोष्ट अशी, की विल्सन महाशयांची सर्कसच पंतांनी लिलावात विकत घेतली. अशा रीतीनं पहिली भारतीय ‘ग्रँड इंडियन सर्कस’ दिमाखात सुरू झाली. कुर्डुवाडीच्या राजांसमोर पहिला खेळ सादर झाला. सौभाग्यवती छत्रे यांनीदेखील आपली कला तिथे पेश केली. जंगली प्राण्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे चित्तवेधक प्रयोगही होतच होते. प्राचीन भारतीय युद्धकलांसहित विदेशी कसरतीही चालू झाल्या. त्यात उंच झोपाळ्यांवरचे (ट्रॅपीझ) खेळही होते.

भारतातल्या शहरा-शहरांत सर्कस फिरू लागली. ज्या गावात खेळ असेल, तिथल्या एका तरी शिक्षणसंस्थेला देणगी देण्याचा रिवाज पंतांनी सुरू केला. पुढे परदेशातही ही सर्कस गाजली. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांना त्यांच्याकडून गुप्तपणे मदत होत होती. भूमिगत कार्यकर्त्यांना ‘डोअर कीपर’ म्हणून काम दिले जाई. काही वेळा गुप्त खलबतेही तिथे चालत. सर्कसचा पसारा फार मोठा असतो. माणसांबरोबर प्राण्यांचीही काळजी घ्यावी लागते. खर्च अवाढव्य! ही कसरतसुद्धा विष्णुपंतांनी लीलया पेलली. केरळच्या कुशल कलाकारांचा समावेश त्यांनी सर्कसमध्ये केला.

रहिमतखाँहे सुरू असताना, संधी मिळेल त्याप्रमाणे त्यांची गायनसेवाही चालू होती. त्या क्षेत्रातही एक महान सेवाकार्य त्यांची वाट बघत होतं. १८९२मध्ये सर्कसचा मुक्काम उत्तर प्रदेशातील शिवभूमी काशीक्षेत्री होता. विष्णुपंतांच्या कानावर अशी एक गोष्ट आली, की शहरातल्या एका ब्राह्मणाच्या घरी एक अवलिया गायक राहतो. सुंदर गाणी म्हणून काही वेळा तो भीकदेखील मागतो. कुतुहलानं शोध घेत विष्णुपंत त्यांच्यापर्यंत जाऊन पोचले. समोरच्या व्यक्तीला पाहून ते थरारले. ज्या हद्दूखाँसाहेबांकडे त्यांनी ग्वाल्हेर गायकीचं शिक्षण घेतलं, त्यांचा पुत्र रहिमतखाँ साक्षात त्यांच्यासमोर गात होता. म्हणजे त्यांचा गुरुबंधूच! पंत कळवळले. त्यांनी पालक ब्राह्मण व्यक्तीला अभिवचन दिलं, की ‘यापुढे मी या माझ्या गुरुबंधूचं आयुष्यभर पालन करीन.’ आणि आपल्याबरोबर गुरुपुत्राला घेऊन ते निघाले. रहिमतखाँ यांना अफूचं व्यसन होतं. पंतांनी एका अलौकिक गायकाला महाराष्ट्रात आणून त्याचं दिव्य गायन रसिकांपर्यंत पोचवलं. लोकांनी या खाँसाहेबांना प्रेमानं आणि आदरानं ‘भूगंधर्व’ अशी पदवी देऊन गौरवलं.

सर्कसचा व्याप सांभाळून, विष्णुपंत श्रेष्ठी आणि संस्थानिकांकडे रहिमतखाँ यांच्या मैफली घडवत. तिकिटं लावूनही काही कार्यक्रम होत. विष्णुपंत स्वत: खाँसाहेबांसाठी तंबोरे जुळवून साथ देत. नंतर दिव्य स्वरांची बरसात सुरू होई आणि श्रोते त्यात न्हाऊन निघत. भूगंधर्व लहरी आणि विक्षिप्त होते. त्यांना फक्त विष्णुपंतच सांभाळू शकत. गाता गाता मध्येच उठून ते इकडेतिकडे फिरत. पंत त्यांना समाजवून सांगत आणि गाणं जिथे सोडलेलं असेल, तिथून पुढे जलसा सुरू होई. त्यांचं गाणं अतिशय गोड, सहजसुंदर आणि विनासायास चाले. कितीही वरच्या पट्टीत गायले, तरी चेहऱ्यावर त्याचा मागमूसही नसे. त्यांचं गाणं संपलं, की भारलेले, समाधी अवस्थेत गेलेले श्रोते स्वर्गातून खाली उतरत. काही मराठी नाट्यपदंही ते विष्णुपंतांकडून शिकले. विष्णुपंतांनी खाँसाहेबांना आयुष्यभर पूर्ण काळजी घेऊन सांभाळलं. २० फेब्रुवारी १९०५ रोजी विष्णुपंतांचं निधन झालं. भूगंधर्व पोरके झाले. परंतु पंतांचे धाकटे बंधू काशिनाथ यांनी गायक महाराजांची अखेरपर्यंत सेवा केली. त्याचबरोबर ‘ग्रँड सर्कस’चाही विस्तार करून नावलौकिक वाढवला.

अशा या विष्णुपंत छत्रे यांना विनम्र अभिवादन आणि दंडवत!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
चारूदत्त निमकर About 34 Days ago
फारच उपयुक्त व सुंदर माहीती
0
0

Select Language
Share Link