Next
न जाने कहाँ तुम थे...
BOI
Sunday, February 03, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

देशभक्तिपर गीतांसाठी ओळखले जाणारे, मात्र वैविध्यपूर्ण गीतरचना करणारे कवी प्रदीप यांचा सहा फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या प्रदीप यांनी लिहिलेल्या एका सुखद प्रेमगीताचा...
.............
नुकताच २६ जानेवारी होऊन गेला. आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण! आणि दर वर्षीप्रमाणेच याही प्रजासत्ताक दिनाला कुठून ना कुठून, रेडिओवरून, टीव्ही. वरून, सीडीवरून आणि आता मोबाइलवरूनही ‘ए मेरे वतन के लोगों...’ या गीताच्या ओळी ऐकू आल्या! तबला तरंगवरून आणि शीळ वाजवून हे गीत सादर करणारे अवलिया कलावंतही व्हॉट्सअॅपवरून अनुभवले! २६ जानेवारी असो किंवा १५ ऑगस्ट असो; या राष्ट्रीय सणांच्या दिवशी जवळजवळ संपूर्ण भारतात हे गीत ऐकवले जाते, ऐकले जाते. त्या गीताचे श्रेय जसे लता मंगेशकर आणि संगीतकार सी. रामचंद्र यांचे आहे, तसेच ते कवी प्रदीप यांचेही आहे. कवी प्रदीप यांनी लिहिलेले हे गीत खरोखर अजरामर आहे. 

त्याच कवी प्रदीप यांच्या जन्माचा हा फेब्रुवारी महिना! कवी प्रदीप हे काही या कवीचे मूळ नाव नव्हे! सहा फेब्रुवारी १९१५ रोजी मध्य प्रदेशातील बडनगर गावी जन्मलेल्या रामचंद्र द्विवेदी या तरुणाने हिंदी भाषेतील काव्य प्रांतात चांगले नांव मिळवले होते. बालपणापासूनच त्याला काव्यलेखनाची आवड होती. ‘बीए’ची पदवी आणि शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण घेऊनसुद्धा त्या तरुणाने शिक्षक म्हणून नोकरी न करता, हिंदी भाषेतून उत्कृष्ट कविता करून हिंदी क्षेत्रातील नामवंत कवींचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. वयाच्या २३व्या वर्षी हा तरुण कवी मुंबईत आला. तेथेही काव्यवाचनाच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागला. अशाच एका कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक एन. आर. आचार्य उपस्थित होते. ते या तरुणाच्या काव्यामुळे प्रभावित झाले आणि ते त्याला ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रसंस्थेत घेऊन गेले. तेथे हिमांशू रॉय यांनी या तरुणाच्या कविता ऐकल्या व त्याला दरमहा २०० रुपये पगारावर काव्यलेखनासाठी आपल्या चित्रसंस्थेत नोकरीस ठेवले. ते वर्ष होते १९३८! आणि तेथेच त्या तरुणाचे आपले नाव ‘कवी प्रदीप’ असे लावण्यास सुरुवात केली. 

१९३९मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉम्बे टॉकीजच्या ‘कंगन’ चित्रपटात कवी प्रदीप यांची गाणी होती. त्यातील तीन गाणी त्यांनी गायलीही होती. त्या चित्रपटाने रजत जयंती साजरी केली. कवी प्रदीप यांची चित्रपटसृष्टीतील सुरुवातच अशी धमाकेदार पद्धतीने झाली. त्यानंतर बंधन, पुनर्मीलन नया संसार, झूला, किस्मत या चित्रपटांनी १९४३पर्यंत प्रदीप यांना प्रचंड लोकप्रियता दिली. ‘बंधन’ या १९४०मधील चित्रपटात कवी प्रदीप यांनी लिहिलेले ‘चल चल रे नौजवान...’ हे गीत तर एवढे लोकप्रिय झाले, की त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतील तरुणांनी ते मुखोद्गत केले. अहमदाबाद येथील काँग्रेसच्या एका अधिवेशनाची सुरुवात हे गीत म्हणून झाली! ते ऐकून महादेवभाई देसाईंनी त्या गीताची तुलना उपनिषदांमधील मंत्रांशी केली. त्या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला. त्या काळात लंडनमधील ‘बीबीसी’च्या रेडिओ स्टेशनवर बलराज सहानी निवेदक म्हणून काम करत होते. त्यांनी हे गीत ‘बीबीसी’वरून प्रसारित केले. 

पुढील दोन वर्षांनंतर आलेल्या ‘किस्मत’मधील ‘आज हिमालय की चोटी से हम ने फिर ललकारा है...’ या कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या गीताने प्रचंड लोकप्रियता मिळवलीच; पण त्या वेळच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे हे गीत कवी प्रदीप यांनी मुद्दाम इंग्रज सरकारच्या विरोधात लिहिले आहे, असे त्यांचे म्हणणे होते. वास्तव तेच होते; पण इंग्रज अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारी ‘हम किसी से डरते नहीं, चिनी हो या जापानी’ अशी एक ओळ कवी प्रदीपनी त्या गीतात लिहिली होती. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्याचा आधार घेऊन हे गीत जपानी लोकांच्या विरुद्ध आहे असा युक्तिवाद करून कवी प्रदीप इंग्रजांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले; पण इंग्रजांचा त्यांच्यावर डोळा राहिलाच होता. 

कवी प्रदीप म्हणजे फक्त देशभक्तीपर गीत लिहिणारे कवी नव्हते. ‘अब तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया...’ (किस्मत) यांसारखी भक्तिगीतेही त्यांनी लिहिली होती. ‘मैं तो दिल्ली से दुल्हन लाया रे... ’ (झूला) यासारखे हलकेफुलके गीतही त्यांनी लिहिले होते. ‘मेरे जीवन में किरन बिखरनेवाले...’ (तलाक), ‘ओ दिलदार बोलो इक बार...’ (स्कूल मास्टर) यांसारखी प्रेमगीतेही त्यांनी लिहिली होती. नास्तिक (१९५४) या चित्रपटातील ‘कान्हा बजाए बांसुरी... ’ या गीताद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटात पहिले गरबा गीत आणले होते. 

कवी प्रदीप गायकही होते. ‘नास्तिक’ चित्रपटातील त्यांनी गायलेले ‘देख तेरे संसार की हालत...’ हे गीत प्रचंड प्रभावी ठरले होते आणि सद्यस्थितीतही ते लागू पडते. चित्रपटसृष्टीतील आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अंदाजे ७५ चित्रपटांसाठी ५५० गाणी लिहिली. त्यापैकी ४० गीते स्वतः गाऊन गायक म्हणूनही लोकप्रियता मिळवली. माधुर्य, शब्दलालित्य यांचा समावेश असलेली गीते लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांना १९६१मध्ये त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रीय गीतरचनेबद्दल सन्मानित केले होते. १९७५मध्ये पश्चिम बंगालच्या फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनने ‘जय संतोषी माँ’ चित्रपटातील गीताबद्दल त्यांना सर्वश्रेष्ठ गायकाचा पुरस्कार दिला होता, तर १९९५-९६मध्ये मध्य प्रदेश सरकारनेही त्यांचा सन्मान केला होता. १९९७मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला होता. 

अशा कवी प्रदीप यांनी लिहिलेले एक सुखद प्रेमगीत १९६१च्या ‘जिंदगी और ख्वाब’ चित्रपटाकरिता संगीतकार दत्ताराम यांनी संगीतबद्ध केले होते. ते मन्ना डे आणि सुमन कल्याणपूर यांनी गायले होते. त्या चित्रपटाचा नायक राजेंद्रकुमार आणि नायिका मीनाकुमारी यांच्यावर ते चित्रित करण्यात आले होते. 

‘तो’... 
जादू ये देखो, हम तुम मिले है

कोणास ठाऊक तुम्ही कोठे होतात आणि मी कोठे होतो ? (पण ही अशी काय) जादू झाली. पाहा ना, की आपणा दोघांचे मीलन झाले. 

‘त्याने’ असे म्हटल्यावर एका ओळीचाच बदल करून ‘ती’ही गाते....

‘ती’
न जाने कहाँ हम थे, न जाने कहाँ तुम थे 
अब तो मिलन के सपने खिले है

(खरंच की हो) कोणास ठाऊक मी कोठे होते व तुम्ही कोठे होतात? (पण आता आपण दोघे एकत्र आल्यामुळे आपल्या दोघांच्या) मीलनाची स्वप्ने साकार झाली आहेत. 

कितनी दिनोंपर मिली है निगाहे 
अब तुम न जाना छुडाकर ये बाहे 
तुम्हारा ये साथ प्यारा, हम क्यूँ न चाहे?

(प्रतीक्षेची दीर्घ वाट चालल्यानंतर) कितीतरी दिवसांनी नजरभेट झाली आहे. (ज्या नयनात माझ्याबद्दल प्रीती आहे, असे नेत्र मला दिसले आहेत.) आता तू माझे हात सोडवून घेऊन (कोठेही) जाऊ नकोस. तुझी ही प्रिय साथ मिळावी (म्हणून मी) ही अपेक्षा का करू नये? मला तुझी साथ आवडत नाही, असे कसे घडेल?

किसे था पता यूँ हम तुम मिलेंगे 
उजडे हुए दिल फिरसे बसेंगे 
मोहब्बत के बंधन में हम तुम बंधेंगे

कोणास ठाऊक होते, की या पद्धतीने आपले मीलन होणार आहे? उद्ध्वस्त झालेली मने/हृदय (या प्रकारे) पुन्हा (प्रेम दुनियेत) रत होणार आहेत. आणि (ओघानेच) प्रेमाच्या धाग्यात आपण दोघे बांधले जाणार आहोत?

साधे, सोपे शब्द आणि मुळात कल्पनाही साधी. बघा ना आपण आपल्या पत्नीसमवेत/पतीसमवेत राहत असतो. ती/तो एका गावचा, आपण एका गावचे; पण एकत्र येतात, ३०-३५ वर्षे संसार करतात. ओघानेच एकमेकांचे जीवनसाथी बनतात. ही वाटचाल बघितल्यावर एखाद्या क्षणी हा प्रश्न पडतोच ना? आपली ‘ही’  किंवा ‘हा’ यापूर्वी कोठे होती/होता. वेगळे गाव, शाळा, कॉलेज व आता मात्र जीवनसाथी बनून गेली/गेला आहे. हा साधा विचार कवी प्रदीप काव्यात उतरवतात ‘न जाने कहाँ तुम थे...!’ आणि ते दत्ताराम छानपणे संगीतात बांधतात! मन्ना डे, सुमन कल्याणपूर मधुर स्वरांचे लेणे देतात. पडद्यावर देखणा राजेंद्रकुमार असतो, सुंदर मीनाकुमारी असते आणि मग हे सारेच गीताला ‘सुनहरे’ बनवून जाते. 

(कवी प्रदीप यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या ‘चल अकेला, चल अकेला...’ या गीताबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search