Next
डॉ. सुरेश भोसले यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर
प्रेस रिलीज
Tuesday, July 25, 2017 | 05:41 PM
15 0 0
Share this article:

कराड (सातारा) : साखर उद्योग क्षेत्रात दिलेल्या अभूतपूर्व योगदानाची दखल घेऊन रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि धावरवाडी येथील ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांना यंदाचा साखर उद्योगातील राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली येथे मुख्य कार्यालय असलेली ‘शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ ही संस्था साखर उद्योग क्षेत्रात गेल्या ७५ वर्षांपासून कार्यरत आहे. साखर उद्योग क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चालना देणाऱ्या तंत्रज्ञांची शिखर संस्था म्हणून मान्यता असलेल्या या संस्थेचे दर वर्षी अधिवेशन आयोजित केले जाते. यंदाचे ७५वे राष्ट्रीय अधिवेशन, तसेच आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शन तीन ते पाच ऑगस्टदरम्यान केरळ येथील कोची येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात केरळचे राज्यपाल निवृत्त न्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या हस्ते आणि असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय अवस्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुरेश भोसले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सहकारी व खासगी साखर उद्योगात डॉ. सुरेश भोसले यांचे योगदान अभूतपूर्व राहिले आहे. कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या बोजामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याला डॉ. सुरेश भोसले यांनी ऊर्जितावस्था मिळवून दिली आहे. कृष्णा कारखान्याच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. भोसले यांनी उत्तम नियोजन आणि आर्थिक काटकसरीचा मूलमंत्र जपत अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत कारखाना कर्जमुक्त करून सुस्थितीत आणला आहे. तसेच मोफत अनुदानाच्या साखरेसह सर्वाधिक दर देणारा सहकारी साखर कारखाना म्हणून कृष्णा कारखान्याची राज्यात ओळख निर्माण केली आहे.

सभासदांना मोफत साखर, आधुनिक स्मार्ट कार्ड देणारा पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच कारखाना, अँड्रॉइड अॅपद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावरून ऊस लागवडीची थेट नोंद, संगणकीकृत व नोटराइज्ड पद्धतीने तोडणी, वाहतूक करार, पारदर्शक कामकाजासाठी ई-टेंडरिंग प्रणाली, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारा कारखाना, संचलित कृषी महाविद्यालय, जीवाणू खत निर्मिती प्रकल्प व प्रयोगशाळा, तसेच एकरी शंभर टन उत्पादनासाठी जयवंत ऊस विकास योजना असे अनेकविध उपक्रम राबवून कृष्णा कारखान्याने डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीतच साखर उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.
तसेच डॉ. सुरेश भोसले यांनी धावरवाडी येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जयवंत शुगर्स साखर कारखान्याची स्थापना करून अल्पावधीतच तो नावारूपाला आणला. जयवंत शुगर्सच्या वाटचालीची दखल घेऊन ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ने या कारखान्याला नुकताच उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार प्रदान केला आहे. या सर्व योगदानाची दखल घेत डॉ. भोसले यांची या राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योग क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पुरस्कार सोहळा :
दिवस : गुरुवार, तीन ऑगस्ट २०१७
स्थळ : कोची, केरळ
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search