Next
मालक नको.. पालक व्हा...
BOI
Saturday, July 21, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्याशी संवादी राहणं अत्यंत आवश्यक आहे. या काळात शारीरिक विकासाबरोबरच त्यांचा मानसिक विकासही होत असतो.  त्यांच्या सर्वांगीण विकासात त्यांचे भक्कम साथीदार होणं महत्त्वाचं. या काळात त्यांचे मालक होण्यापेक्षा शब्दशः पालक झालं पाहिजे.. तरच तुमचं मूल यशाच्या पायऱ्या चढू शकेल... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या मानसिक वाढीबद्दल...
.....................................
आजच्या या अति गतिमान जगात आपल्या पाल्याने ऑलराउंडर असावं, असं प्रत्येकच पालकाला सतत वाटत असतं आणि आपली ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ते सतत धडपडत असतात. पर्यायानं मुलंही या साऱ्यात आपोआपच ओढली जात असतात. त्यांना वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये इतकं अडकवलं जातं, की त्यांचं अवघं विश्व असणारे त्यांचे आई-बाबा त्यांच्या वाट्याला फारसे येतच नाहीत. 

मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ हा त्यांच्या आयुष्यभराच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या विकासातला बहुतेक मोठा भाग हा कौटुंबिक वातावरण व पालक - बालक नातेसंबंध यांवर अवलंबून असतो. त्यामुळे हा काळ म्हणजे पालकांसाठी अगदी तारेवरची कसरत असते. या काळात मुलांना पालकांचा समाधानकारक सहवास मिळणं खूप आवश्यक असतं. म्हणजे यात तुम्ही किती वेळ देता, हे महत्त्वाचं नसून तो कसा देता? तुम्ही या काळात मुलांमधला विश्वास, आत्मविश्वास, प्रेमाची भावना, योग्य-अयोग्याची शिकवण या साऱ्याची कशी ओळख करून देता, त्यासाठीचे अनुभव कसे सांगता, समजावता, ते जास्त महत्त्वाचं असतं. 

आयुष्याच्या सुरुवातीच्या या काळात तुम्ही मुलांना हे सगळं देऊ शकलात, तर त्यांच्या पुढच्या आयुष्यात या अनुषंगाने निर्माण होण्याऱ्या समस्यांची शक्यता बऱ्याच टक्क्यांनी कमी होते. या सगळ्या अनुभवांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया अगदी भक्कम होतो. परंतु या काळात पालकांकडून या गोष्टी पुरेशा प्रमाणात मुलांना मिळाल्या नाहीत किंवा अयोग्य पद्धतीने मिळत गेल्या, तर त्यांच्या विकासाचा पाया आयुष्यभरासाठी कमकुवतच राहतो आणि मग लहान वयापासूनच मुलांमध्ये समस्या वर्तनाची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसू लागतं.

मुलं लहान असताना त्यांना चुकीच्या किंवा पूर्ण दुर्लक्षित पद्धतीने वाढवले गेले, त्यांच्याशी वागण्यात-बोलण्यात हुकुमशाहीचा अतिरेकी वापर केला गेला, तर त्याचे परिणाम मुलांवर होतात. शिवाय त्यांना वाढवण्याच्या प्रत्येक पालकाच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या, शिक्षा तंत्राचा समतोल नसल्यास त्याचा कायमस्वरूपी व सखोल परिणाम मुलांवर होणारच हे पालक म्हणून आपण ध्यानात घ्यायला हवे. आपल्याकडून कळत-नकळत पोहोचणाऱ्या अयोग्य संदेशातून मुलं चुकीच्या गोष्टींचं अनुकरण करतात आणि त्यातूनच पुढील आयुष्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत जाते.

आपल्या मुलाने जगाच्या स्पर्धेत आत्मविश्वासाने, निर्भयपणे उतरावे व जिंकावे, असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी काही तत्त्वे पालक म्हणून पाळणे अतिशय आवश्यक आहे. त्यातील सगळ्यांत महत्त्वाचे तत्त्व म्हणजे तुमच्या मुलांना तुमचा गुणवत्तापूर्ण सहवास लाभू द्या. या काळात मुलांमध्ये स्वतःबद्दल, जगाबद्दल प्रेम, आदर, विश्वास कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करा. कोणती गोष्ट योग्य व कोणती गोष्ट अयोग्य आणि ती का, याची त्यांना ओळख होईल असे वातावरण निर्माण करा. त्याचे विचार, भावनांना योग्य दिशा द्या. यातूनच त्यांची स्वत:बद्दलची जाणीव उत्तम होणार आहे. हे ध्यानात ठेवून स्वतःला ओळखण्याची, व्यक्त करण्याची जास्तीत जास्त संधी त्यांना कशी उपलब्ध होईल, त्यात जास्तीत जास्त एकवाक्यता कशी ठेवता येईल, शिस्तीचा, बक्षीस व शिक्षा दोन्हींचा निकोप वापर कसा करता येईल यांसाठी आपापसांत संवाद साधा. आवश्यकता वाटल्यास किंवा काही अडचणी आल्यास समुपदेशकांची मदत घ्या आणि आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासात त्यांचे भक्कम साथीदार व्हा. त्यांचे मालक होण्यापेक्षा शब्दशः पालक व्हा.. मग बघा, तुमचं मूल यशाच्या पायऱ्या आपोआपच चढत जाईल...

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search