Next
क्रिकेट सामन्यात दृष्टिहीन महिलांचा डोळस महिलांवर विजय
सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी पिंपरीत रंगला सामना
BOI
Thursday, April 25, 2019 | 04:30 PM
15 0 0
Share this article:


पुणे : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पिंपरी-चिंचवडमध्ये दृष्टिहीन महिला विरुद्ध डोळस महिला असा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या सामन्यात दृष्टिहीन महिलांनी डोळस महिलांवर दहा धावांनी विजय मिळवला.

‘प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड’ आणि ‘जितो चिंचवड पिंपरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. दृष्टिहीन महिलांच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चौफेर फटकेबाजी करत डोळस महिला संघासमोर सहा षटकांत ४६ धावांचे लक्ष्य ठेवले. 

अंध महिला संघातील फलंदाजांच्या उत्तम कामगिरीनंतर गोलंदाजांनीही चमक दाखवत डोळस संघाला ३६ धावांत रोखले. या सामन्यात खरे तर दृष्टिहीन महिला संघासमोर डोळस महिला संघाचे आव्हान असेल, असे वाटत असताना डोळस महिलांची पीछेहाट झाली. मुळातच अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव नसल्याने डोळस महिलांवर ही वेळ आली. पहिल्यांदाच या फॉरमॅटमध्ये खेळल्याने डोळस खेळाडूंना एक नवा अनुभव आणि प्रेरणा मिळाली. 

या अनोख्या सामन्याबाबत बोलताना सामन्याचे आयोजक आणि प्रेरणा असोसिएशनचे सतीश नवले म्हणाले, ‘अंध मित्रांच्या वेदना आणि गरजा समाजाला समजण्यासाठी या विशेष दिनाचे औचित्य साधून हा सामना आयोजित केला होता. शिवाय सचिन तेंडुलकर हा सर्व क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंसाठी आयकॉन आहे, त्यामुळे त्याच्या वाढदिवसाचेही निमित्त होतेच. भारतीय संघ आता विश्वचषक २०१९ खेळणार आहे, तेव्हा या माध्यमातून त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो. अंध खेळाडू आणि डोळस खेळाडू यांच्यातील मैत्री वृद्धिंगत व्हावी हा नेहमीच आमचा उद्देश राहिला आहे. त्यादृष्टीने या सामन्यातदेखील तो प्रयत्न केला गेला आहे.’

दृष्टिहीन संघाची कर्णधार ज्योती सुळे हिनेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आम्ही सामन्याचा आनंद घेतला. खरे तर आम्हांला दिसत नसल्यामुळे प्रत्यक्ष पाहून बॉल पकडणे आणि आवाजाच्या दिशेने, हालचालींवर लक्ष ठेवून खेळ करणे तसे आव्हानात्मक वाटत होते. परंतु डोळस संघातील खेळाडूंनी आम्हांला खेळताना खूप सहकार्य केले, त्यामुळे खेळणे सोपे झाले. सामना आम्ही जिंकला याचा खरोखर आनंद वाटत आहे’, असे ती म्हणाली. डोळस संघाची कर्णधार प्रेक्षा लुंकड म्हणाली, ‘खरे तर हा सामना खेळणे त्यांना कठीण जाईल, असे वाटले होते. परंतु तो आम्हांला जास्त अवघड होता. अंडरआर्म क्रिकेट खेळण्याचा आम्हाला अनुभव नव्हता. त्यामुळे प्रॅक्टिसही केली होती; मात्र तरीही ते अवघड गेले. खेळाडू म्हणून आम्ही आनंद घेतला आणि त्यांच्याकडून प्रेरणाही मिळाली.’ 

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देवच. याच देवाच्या वाढदिवसानिमित्त दृष्टिहीन आणि डोळस खेळाडू यांच्यातील फरक, दरी दूर करण्याचा आयोजकांचा हा प्रयत्न होता. तसेच या वेळी पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाला शुभेच्छाही देण्यात आल्या.

(सामन्याची क्षणचित्रे टिपलेला व्हिडिओ सोबत देत आहोत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search