Next
डॉ. दीक्षित उवाच : निरोगी आयुष्यासाठी तोंडावर नियंत्रणाला पर्याय नाही
रत्नागिरीत एकाच दिवशी झालेल्या दोन कार्यक्रमांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
अनिकेत कोनकर
Monday, December 24, 2018 | 06:22 PM
15 0 0
Share this article:

डॉ. जगन्नाथ दीक्षित

रत्नागिरी :
‘निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर खाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि व्यायामाला पर्याय नाही. स्वतःचे वजन कमी करण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित विकार असल्याने त्यावरील उपायही जीवनशैलीतच दडलेला आहे. या दोन्हींवर नियंत्रणासाठी दिवसातून दोनच वेळा जेवणे आणि किमान ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम हा कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेला अत्यंत उत्तम असा आणि प्रयोगांतून सिद्ध झालेला ‘प्लॅन’ आहे. मधुमेह उपचारांच्या आंतरराष्ट्रीय निकषांत या मुद्द्यांचा समावेश होणे आणि विश्व स्थूलतामुक्त होणे, हे या अभियानाचे ध्येय आहे,’ असे प्रतिपादन राज्याच्या स्थूलता निवारण मोहिमेचे ब्रँड अँबेसेडर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी २३ डिसेंबर २०१८ रोजी रत्नागिरीतील व्याख्यानात केले. रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, आगाशे फूड्स, भास्कर गाडगीळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान रविवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळीही त्याच ठिकाणी लायन्स क्लब आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल कंपनीने त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. शहरात एकाच दिवशी झालेल्या या दोन्ही कार्यक्रमांना रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

लठ्ठपणा का येतो, तो कसा ओळखावा, आहारपद्धती कशी असावी, रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित राखणे कसे आवश्यक आहे, अशा अनेक गोष्टींवर व्याख्यानात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाष्य केले आणि अवघड विषयामागचे शास्त्र सोप्या शब्दांत उलगडून दाखविले. ‘महाराष्ट्रातील निम्म्या महिला अन्न ‘वाया कसे घालवायचे’ या एकाच विचारामुळे लठ्ठ झाल्या आहेत. तुम्ही घरातील कचरापेटीचा विचार करता; पण त्यासाठी स्वतःच्या शरीराची कचरापेटी होऊ देता. तसे करून उपयोगी नाही. आपल्याला हवे तेवढेच आणि भूक लागेल त्या दोन वेळांनाच खाल्ले पाहिजे,’ असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. 

‘स्वतःचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी दिवसातून दोनच वेळा जेवणे आवश्यक आहे. अध्ये-मध्ये काही खाणे शरीराला आवश्यक नसते. जगात उपासमारीने मरणाऱ्यांपेक्षा जास्त खाऊन मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ‘स्मॉल फ्रिक्वेंट मील्स’ म्हणजे थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे खात राहण्याचा सल्ला अनेक जण देतात; मात्र तो आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला गरज नसताना खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतोच आणि अॅसिडिटीसह अनेक रोगही होतात. त्यामुळेच केवळ दोन वेळा जेवण आणि ४५ मिनिटे व्यायाम या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. हा प्लॅन कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही आणि स्वतःला अत्यंत आनंदाने कायमस्वरूपी करता येण्यासारखा आहे,’ असे डॉ. दीक्षित म्हणाले. आयुर्वेदापासून जैन समाजाच्या ग्रंथापर्यंत आणि आधुनिक शास्त्रातील शोधनिबंधांपर्यंत विविध ठिकाणचे दाखले देऊन डॉ. दीक्षित यांनी हा विषय पटवून दिला. त्यासाठी केलेल्या प्रयोगांचीही माहिती त्यांनी दिली.

‘मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित विकार आहे. त्यामुळे जीवनशैली बदलण्यातच त्याचा उपाय दडलेला आहे. त्यासाठी हा डाएट प्लॅन अत्यंत योग्य आहे. मधुमेह बरा होत नाही, असे म्हटले जाते; मात्र हा डाएट प्लॅन केलेल्या अनेकांचा मधुमेह बरा झाल्याचे रिपोर्टवरून सिद्ध झाले आहे,’ असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले. 

स्थूलता निवारण आणि मधुमेह प्रतिबंध अभियान
दीक्षित डाएट प्लॅन सोशल मीडियावर ‘हिट’ झाला असून, २०९ व्हॉट्सअॅप ग्रुप, तसेच अन्य माध्यमातून ३२ देशांतील ४५ हजार जण स्थूलता निवारण अभियानाशी जोडले गेले असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. या अभियानासाठी काम करणारे लोक एकही पैसा न घेता काम करतात, असेही त्यांनी सांगितले आणि कोणीही यात सहभागी होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टरांनीही या पद्धतीचे महत्त्व ओळखून आपल्या पेशंट्सना या पद्धतीचा अवलंब करण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. मधुमेहावरील उपचारांच्या आंतरराष्ट्रीय निकषांमध्ये या प्लॅनचा समावेश होण्याचे ध्येय ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठीही स्थूलता निवारण कार्यक्रम राबविणार असल्याचे ते म्हणाले. 

रत्नागिरीतही मधुमेहमुक्ती केंद्र
रत्नागिरी शहरातही लवकरच मधुमेहमुक्ती केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. तसेच, मधुमेहाची पातळी ओळखण्यासाठीच्या Hb1Ac आणि फास्टिंग इन्सुलिन या आवश्यक चाचण्या रत्नागिरीतही सहाशे रुपयांत उपलब्ध झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा सत्कार करताना भास्कर गाडगीळ. शेजारी राजेंद्र पटवर्धन, अनंत आगाशे, डॉ. संतोष बेडेकर, डॉ. अंजली दीक्षित, स्मिता परांजपे आणि राधिका वैद्य.

प्रास्ताविक करताना श्रीनिवास जोशी

डॉ. दीक्षित दाम्पत्याचा सत्कार
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान परशुराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भास्कर गाडगीळ यांनी डॉ. दीक्षित यांचा सत्कार केला. डॉ. अंजली दीक्षित यांचा सत्कार उपाध्यक्ष स्मिता परांजपे यांनी केला. ‘आगाशे फूड्स’चे अनंत आगाशे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. चित्पावन ज्ञातीतील डॉ. दीक्षित यांचा ज्ञातीला सार्थ अभिमान असून, आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव आहोत, असे आगाशे म्हणाले. मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र पटवर्धन, संचालक अनंत आगाशे, उपकार्याध्यक्ष नारायण शेवडे, कार्यवाह श्रीनिवास जोशी, कोषाध्यक्ष राधिका वैद्य, डॉ. संतोष बेडेकर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. श्रीनिवास जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले, तर डॉ. संतोष बेडेकर यांनी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा परिचय करून दिला. 

मंडळाची माहिती देताना अनंत आगाशे

डॉ. दीक्षित डाएट प्लॅन – महत्त्वाचे मुद्दे
- स्वतःच्या भुकेच्या नेमक्या वेळा ओळखून त्या दोन ठरलेल्या वेळांनाच जेवणे.
- जेवण जास्तीत जास्त ५५ मिनिटांत आटोपणे.
- अध्ये-मध्ये पाणी किंवा पातळ ताकाशिवाय काहीही खाऊ-पिऊ नये.
- मधुमेह असणाऱ्यांनी गोड अजिबात खाऊ नये आणि मधुमेह नसणाऱ्यांनीही गोड कमी खावे
- दिवसातून आपल्या सोयीच्या वेळी सलग ४५ मिनिटे चालणे किंवा पोहण्यासारखा व्यायाम.

(डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉम या वेबसाइटवरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search