Next
अंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर
BOI
Tuesday, January 08, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


‘निओ नुआँ’ जॉनरचा बादशहा असलेल्या श्रीराम राघवनचा ‘अंधाधुन’ हा सिनेमा २०१८मध्ये आलेल्या सिनेमांपैकी सर्वांत लक्षवेधी आणि महत्त्वपूर्ण प्रयोग करणारा सिनेमा ठरला. ब्लॅक कॉमेडीच्या वळणाने जाणारा हा क्राइम थ्रिलर, मुक्त पद्धतीचा शेवट (ओपन एंड) असूनही प्रेक्षकांनी उचलून धरला. प्रचंड वेगानं घडणाऱ्या असंख्य घडामोडी, त्यातून निर्माण होणारे गुंते, ग्रे शेडेड पात्रं, त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याकरिता केलेले प्रयत्न इत्यादी गोष्टी राघवनच्या जवळपास प्रत्येक सिनेमात पहायला मिळतात... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाबद्दल...
..........................................
दिग्दर्शक श्रीराम राघवनएक हसीना थी, जॉनी गद्दार, एजंट विनोद, बदलापूर आणि गत वर्षी आलेला अंधाधुन असे मोजके पाचच सिनेमे दिग्दर्शित करणाऱ्या श्रीराम राघवनला, सिनेमा या माध्यमाची असलेली जाण त्याच्या कामातून लख्खपणे दिसून येते. ‘एजंट विनोद’ हा एकमेव हलकाफुलका चित्रपट सोडला, तर त्याचे बाकी सिनेमे ‘निओ नुऑं’ तथा ‘न्यू ब्लॅक’ या जॉनरमध्ये मोडणारे आहेत. परफेक्ट रिव्हेंज स्टोरी असणाऱ्या ‘एक हसीना थी’ला एक निश्चित स्वरूपाचा शेवट होता. ‘जॉनी गद्दार’लाही असाच निश्चित शेवट असला, तरी त्यातल्या घटना अतिशय गुंतागुंतीच्या आणि वेगवान होत्या. पाहून काही काळ लोटला, की त्यातल्या काही घटना आणि त्यांचा क्रम विसरला जातो. त्यामुळे काही काळाने हा सिनेमा परत पाहिला, तर जवळपास पहिल्यांदाच बघतोय इतका आनंद देतो. 

‘एजंट विनोद’ हा सिनेमा जेम्स बॉंडचा देशी अवतार आहे. ज्यांना बॉंडपट आवडतात त्यांना तो हमखास आवडेल. २०१५मध्ये आलेल्या ‘बदलापूर’ सिनेमाने मात्र राघवनच्या चाहत्यांना अतिशय आश्चर्यचकित केलं. गुंतागुंतीच्या घटना असणारा, अतिशय डार्क वातावरण असणारा आणि रोल रिवर्सलची संकल्पना अतिशय खुबीने सादर केलेला हा क्राइम थ्रिलर अनेकांना धक्के देणारा ठरला. बदलापूरचा शेवटही ‘अंधाधुन’सारखाच ओपन एंडेड आहे. ओपन एंडमुळे प्रेक्षक त्याच्या आकलनक्षमतेनुसार विविध प्रकारे अर्थ लावू शकतो. असा शेवट प्रत्येकच प्रेक्षकाला आवडेल असं नसतं. चित्रपट या माध्यमाकडे केवळ करमणूक म्हणून न पाहता, गांभीर्यानं पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला मात्र असे शेवट आवडतात. ते बुद्धीला चालना देतात. शिवाय प्रत्येक वेगळ्या दिशेने चित्रपटाच्या शेवटाबाबत विचार करत असताना, त्या चित्रपटात दाखवलेल्या घटनांचा संदर्भ आपल्या विचार करण्याच्या दिशेनुसार बदलत जातो, हे पाहणं अतिशय रंजक ठरतं. 

मागील वर्षी आलेला हा ‘अंधाधुन’ सिनेमाही असाच होता. वेगवेगळे शेवट असलेला, बुद्धीला खाद्य पुरवणारा आणि ‘सिनेमा’ या माध्यमाच्या ताकदीचे वेगवेगळे आयाम लक्षात आणून देणारा. चित्रपटाच्या सुरुवातीलाच श्रीराम राघवन एक रंजक रूपक कथा प्रेक्षकांसमोर मांडतो. जंगली ससा, त्या सशाचा लगेचच लक्षात येईल असा दृष्टिदोष, त्या सशाचा बंदूक घेऊन पाठलाग करणारा शिकारी, अशी दोनच पात्रं आणि मोजकेच घटक असणारी ही रूपक कथा, सिनेमाच्या सुरुवातीलाच नेमकी कशासाठी येते, असा प्रश्न प्रेक्षकाला पडतो; पण जसजशी सिनेमाची कथा पुढे सरकत जाते, तसतसा या रूपक कथेचा आणि सिनेमाच्या कथेचा परस्परसंबंध लक्षात येऊ लागतो. रूपके नेमकी कुठल्या पात्राकरिता वापरली आहेत हे कळू लागतं. रूपक कथेतल्या पात्रांची चित्रपटातल्या पात्रांशी शेवटाकडे पडणारी गाठही एकदमच अनपेक्षित प्रकारे घडते आणि प्रेक्षकांना शेवटाबद्दल अधिकाधिक विचार करायला भाग पाडते. एखादं शारीरिक वैगुण्य असलं, की आपली कला बहरून येईल अशी समजूत असणारा एक पियानोवादक ‘अंधाधुन’च्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. तो इतर माणसांसारखाच पूर्णपणे नॉर्मल आहे; पण पियानोवादनाची कला बहरून येण्याकरिता तो अंध असल्याचं सोंग घेतो. पियानो वादनाकरिता तो एके ठिकाणी जातो, तिथे खून झालेला असतो. तो अंध आहे असं समजून तिथली पात्रं बिनधास्त वावर करत असतात. पियानोवादक नायकाची मात्र समोरच्या घडामोडी व्यवस्थित दिसत असल्यानं पंचाईत झालेली असते. सहन करता येत नाही आणि कुठे सांगताही येत नाही, अशी अवस्था झालेला नायक खुनाच्या भानगडीत अडकतो. त्याचे ग्रह अचानकच फिरतात आणि दुर्दैव हात धुऊन त्याच्या पाठीमागे लागतं. मग पुढे काय होतं, खून नेमका कोणी केलेला असतो, या अन्यायाला नायक वाचा फोडतो का, एकमेकांत विचित्रपणे गुंतलेल्या या घटनांचा शेवट नेमका कसा आणि काय होतो, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहणे उचित ठरेल. 

कमीत कमी पात्रं, आपल्या भोवतालच्या जगाशी मिळतंजुळतं असणारं शहरी जग, वस्तूंचा केलेला प्रभावी वापर, उत्कृष्ट पार्श्वसंगीत, छायांकन, दिग्दर्शन आणि अभिनय यांच्या जोरावर ‘अंधाधुन’ प्रेक्षकाला जागीच खिळवून ठेवतो. याची पटकथा अतिशय डोकेबाजपणे लिहिलेली आहे. आजच्या डिजिटल सर्व्हिलिअन्सच्या जमान्यात गुन्हा घडणं जवळपास अशक्य असताना, तो घडणं आणि घडलेला गुन्हा लपविण्यासाठी गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या रचणं आणि त्या क्लृप्त्या बघत असताना प्रेक्षकाला जवळपास एकही त्रुटी न सापडणं, यांसारख्या अशक्यप्राय गोष्टी अंधाधुन शक्य करून दाखवतो. आजकालचा प्रेक्षक पुरेसा चाणाक्ष आहे. त्याला बुचकळ्यात पाडणं, विचार करायला लावणं, त्याला पटेल अशा पद्धतीनं क्राइम थ्रिलर पडद्यावर प्रेझेंट करणं आणि हे करत असतानाच त्याला पुढे अथवा सिनेमाच्या शेवटी काय होणार, याचा अजिबात थांगपत्ता लागू न देणं, ही अक्षरशः तारेवरची कसरत आहे. ती श्रीराम राघवन नावाचा अतिशय हुशार दिग्दर्शक साध्य करतो. 

‘ल अकोर्देर’ (द पियानो टयूनर) नावाच्या २०१०मधील फ्रेंच लघुपटावरून प्रेरित होऊन राघवनने ‘अंधाधुन’ बनवला आहे. ‘अंधाधुन’ला संथपणे सुरुवात होते, खुनाची घटना घडते आणि नंतरच्या घटना अतिशय वेगानं घडू लागतात. प्रेक्षक त्या पाहताना चक्रावतो, दचकतो, विचारात पडतो. पटकथेवर अतिशय बारकाईनं विचार करून, शक्यतो एकही लूपहोल न-सोडता बनणारे क्राइम थ्रिलर सिनेमे बोटावर मोजण्याइतकेच असतात. अंधाधुन त्यापैकी एक आहे. असं असूनही, त्याला स्वतःचं असं क्रिएटिव्ह सिनेमॅटिक लिबर्टी घेणारं, लॉजिक असं नाही. तो आपल्या रोजच्याच जगात घडतो, चारचौघांसारख्या नॉर्मल लॉजिकनुसार चालतो; पण आपल्या सभोवती असणाऱ्या वस्तूंचा योग्य वापर करतो, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या घटनांमधली भयानकता नजरेस आणून देतो. ‘अंधाधुन’मध्ये घडणाऱ्या घटना अतिशय डार्क आणि भयावह स्वरूपाच्या आहेत. त्याला दिलेली ट्रीटमेंट तितकीच सीरियस आणि डार्क टेक्श्चर असणारी असती, तर हा सिनेमा बदलापूरसारखाच मेंदू बधीर करणारा बनू शकला असता. परंतु या वेळी प्रयोग म्हणून राघवन ब्लॅक कॉमेडीच्या मार्गाचा अवलंब करतो आणि सिनेमाची संपूर्ण ट्रीटमेंट अधिकच रंजक होते. गंभीर घटना घडत असतानाही पात्रांचे चेहरे, हालचाली, पार्श्वसंगीत इत्यादींमुळे प्रसंगातल्या गांभीर्याबरोबरच त्यातली रंजकता आणि उत्सुकता टिकून राहते. घटना गंभीर असली, तरी ती अंगावर येत नाही. उलट ती घडत असताना देण्यात आलेली विनोदी डूब ती घटना अधिक उठावदार, चमकदार बनवते. 

राघवनच्या सिनेमांमधलं यथायोग्य कास्टिंग हा एक महत्त्वाचा भाग. अंधाधुनचं कास्टिंग अनकन्व्हेन्शनल असूनही अतिशय सुयोग्य स्वरूपाचं आहे. आयुष्मान खुराणा, राधिका आपटे आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत. मानव विज, अनिल धवन, छाया कदम सहकलाकारांच्या भूमिकेत आहेत. राघवनच्या सिनेमात नेहमीच चमकणाऱ्या झाकीर हुसैन, अश्विनी काळसेकर, गोपाल सिंग ही सहायक अभिनेत्यांची फौज इथेही आहेच. या सर्वच अभिनेत्यांनी चमकदार भूमिका वठवून अंधाधुनला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. पात्रं अधिक असूनही प्रत्येकाची भूमिका सविस्तर लिहिलेली आहे, प्रत्येकाला मिळणारा पडद्यावरील वेळ सुयोग्य आहे. प्रत्येक पात्राचा एक ठराविक स्वरूपाचा स्वभाव आहे, वैशिष्ट्यं आहेत. श्रीरामसारखा हुशार दिग्दर्शक यातल्या प्रत्येक गुणी कलाकाराकडून त्याला हवं तसं काम काढून घेतो आणि मूळच्या उत्तम कथेला अधिकच रंगतदार बनवतो. सिमी (तब्बू) आकाशच्या (आयुषमान) घरात असतानाच्या प्रसंगात, काळ्या-पांढऱ्या वृत्तींचा संघर्ष सुरू असताना, खिडकीमधून अचानक काळा आणि पांढरा स्पष्ट रंग असणारं मांजर येणं, ती पियानोच्या पट्ट्यांवर उतरणं, या पट्ट्यांचा रंगही काळा-पांढरा असणं, तणावपूर्ण प्रसंगात भर घालणारी धून मांजरामुळे अचानक वाजून एक प्रकारचा क्रॅक निर्माण होणं, खुनाच्या प्रसंगात केलेला रेड वाइनचा वापर, तब्बूच्या पात्राचा वियर्डपणा हायलाइट करण्याकरिता तिच्या हातांना लागलेलं सॉस, क्रॅब कुकिंगचा आणि हँडिकॅम शूटचा सीन, ससा आणि आकाशचा संबंध, मावशीच्या हातांवर गोंदवलेला शंकर, यांसारखी अनेक मेटॅफर्स राघवन खुबीने वापरतो.

तणावपूर्ण प्रसंगात होणारा म्युझिकचा वापरही अतिशय आकर्षक आहे. अंधाधुन चित्रपटामध्ये ऐकू येणारं पार्श्वसंगीत विशेष महत्त्वाचं. यात वापरलेल्या पार्श्वसंगीताला आणि साउंडला विशेष अर्थ आहे. ‘पार्श्वसंगीत हे एक प्रकारचं पात्रच आहे अंधाधुनमध्ये’, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये. सेकंड हाफमधे असणारा हॉस्पिटलच्या जवळचा रेल्वे साउंडचा वापर, खुनाची घटना घडल्यानंतर मृतदेह शिफ्ट करत असतानाचा खूप वेळाकरता चालणारा पियानो पीस, आकाश कॉफी करत असताना मागे सिम्मीचं विशिष्ट प्रकारे बसलेलं असताना अचानक सुरू होणारं पार्श्वसंगीत, अपार्टमेंट किंवा रेस्टॉरंटच्या प्रसंगात असणारा रूम टोन, नोस्टाल्जिया जागृत करणारी चित्रहार आणि छायागीत यांमधली गाणी, शेवटच्या प्रसंगामधला पियानो पीस आणि नंतर परिस्थितीला वेगळीच कलाटणी देणारा पत्र्याच्या कॅनचा आवाज, हे सगळं मिळून अंधाधुनचा माहोल अजूनच झकास बनतो.

आयुषमान खुराणाइंटरव्हल पॉइंटनंतर येणारी असंख्य अनप्रेडिक्टेबल आणि गुंतागुंतीची वळणं प्रेक्षकाला गुंगारा देत देत शेवटाकडे नेतात. शेवटी नेमकं काय होणार याचा अंदाज बांधत बांधत प्रेक्षक ‘एज ऑफ द सीट’ बसून राहतो. मग एका वळणावर शेवट येतो. प्रेक्षक तो शेवट पाहून सुटकेचा निश्वास सोडतो न सोडतो, तोवर त्या शेवटाचे वेगळे आयाम असू शकतात हे दाखवणारा दुसरा शेवट होतो, जो आधी पाहिलेल्या प्रसंगाच्या लॉजिकला छेदणारा असतो. चित्रपट संपतो आणि प्रेक्षक मात्र कथेच्या गुंत्यात अडकलेलाच राहतो. २०१८मध्ये आलेल्या सिनेमांपैकी श्रीराम राघवन नावाच्या मास्टरमाइंडचा अंधाधुन नावाचा निओ न्वा थ्रिलर सर्वांत लक्षवेधी आणि महत्त्वपूर्ण प्रयोग करणारा ठरतो, यात शंकाच नाही... 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search