Next
स्वित्झर्लंडच्या मराठी शाळेची गोष्ट
BOI
Sunday, March 04 | 12:30 PM
15 1 0
Share this storyमहाराष्ट्रात मराठी कुटुंबांतील मुले इंग्रजी शाळांमध्ये घातले जाण्याचे प्रमाण वाढीला लागले आहे. परदेशातील मराठी मंडळी मात्र आपल्या पुढच्या पिढीला मराठी यायला हवे, यासाठी तिकडे मराठी शाळा सुरू करत आहेत. स्वित्झर्लंडमध्येही इंडो-स्विस सेंटर या संस्थेअंतर्गत अलीकडेच मराठी शाळा सुरू करण्यात आली आहे. आरती आवटी यांच्या पुढाकाराने ही शाळा सुरू झाली असून, त्याच मुलांना शिकवतात. स्वित्झर्लंडमधील या मराठी शाळेची त्यांनी सांगितलेली ही गोष्ट...
........
मी मूळची श्रीरामपूरची. सध्या स्वित्झर्लंडला असते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात १४ वर्षे नोकरी केल्यानंतर सध्या गृहिणी म्हणून आयुष्याची मजा घेते आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथपेटी या उपक्रमाचे स्वित्झर्लंडचे काम बघते. हे करता करताच गेल्या सप्टेंबर महिन्यापासून इथे मराठी शाळेचा उपक्रम सुरू केला आहे. खरे म्हणजे जिच्याबद्दल लिहावे, इतकी ही शाळा अजून मोठी झालेली नाही. बाल्यावस्थेतही नाही म्हणता येणार. शिशु अवस्थेत आहे असे म्हणू या. आम्ही सध्या महिन्यातून दोन वेळा ही शाळा भरवतो. स्वित्झर्लंडच्या शैक्षणिक नियमावलीनुसार बुधवारी दुपारी सर्व वयाच्या मुलांना शाळेला सुट्टी असते. आमच्या शाळेला वयाची अट नसल्याने सगळ्यांच्या सोयीचा हा दिवस आम्हाला योग्य वाटला आणि आम्ही बुधवार दुपारची वेळ शाळेसाठी नक्की केली. 

२० सप्टेंबर २०१७ रोजी आम्ही शाळा सुरू केली; पण शाळा सुरू करावी, असे त्याआधी साधारण एका वर्षापासून मनात होते. त्याची कारणे दोन. एक म्हणजे आजूबाजूला दिसणारे इतर भारतीय प्रादेशिक भाषांचे वर्ग आणि दुसरे म्हणजे माझ्या मुलीला उत्तम मराठी लिहिता-वाचता यावे, ही इच्छा. मी तिला घरी शिकवत होतेच; पण त्यात सातत्य नव्हते आणि तिलाही एकटीला कंटाळा यायचा. बरे, भाषा शिकवायची म्हणजे ‘घरचा अभ्यास’ घेण्याइतके सुटसुटीत आणि सोप्पे काम नक्कीच नाही. वेळ तर द्यायलाच हवा आणि सात्यतही हवेच हवे. आसपास दिसणाऱ्या आणि मराठी शिकवायचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रीय आयांची कथाही माझ्यापेक्षा फारशी वेगळी नव्हती. असंख्य जणी तर या वाटेलाच गेलेल्या नव्हत्या. हे सगळे बघता वर्ग सुरू करायचे ठरवले. 

आमच्या इंडो-स्विस सेंटर या संस्थेअंतर्गत आठवड्यातून एकदा एक तास घेण्यात येणाऱ्या या वर्गाला आम्ही सुरुवातीलाच ‘मराठी शाळा’ असे नाव दिले आहे. कारण तिथे शिकवला जाणारा अभ्यासक्रम आणि घ्यावी लागणारी मेहनत, या दोन्ही गोष्टी शाळेच्या बरोबरीच्याच असणार आहेत. आणि आजचा हा छोटासा वर्ग एकदिवस व्यावसायिक शाळेचे रूप घेणार अशी खात्रीही आहे. सध्याचे शाळेचे स्वरूप थोडेसे घरगुती असल्याने सध्या ही शाळा आम्ही विनाशुल्क चालवतो. अभ्यासक्रम माझ्या मुलीसाठी जो ठरवला होता, तोच थोड्याफार फरकाने वापरत आहोत. प्रत्यक्ष वर्गाच्या वेळी एक सहकारी मैत्रीण मदतीला असते. वर्गाची घोषणा केल्यावर पालकांचा प्रतिसाद खूप छान होता. नोकरीच्या वेळा आणि अंतर यामुळे इच्छा असूनही अनेकांना येता आले नाही; पण तरीही पहिल्याच वर्गाला १० मुले उपस्थित होती. पुढे त्यातील काही कमी झाली; पण जसजशी बातमी पसरत गेली, तशी नवी मुलेही येत गेली. आता अगदी आवर्जून येणाऱ्यांची संख्या १० पर्यंत आहे आणि वय वर्षे अडीच ते नऊ असा वयोगट आहे. वयोमानाप्रमाणे प्रगतीचा वेग किंवा आलेख वेगवेगळा असला, तरी उत्साह मात्र सगळ्यांचा अगदी एकसारखा आहे. 

अडीच वर्षांच्या छोट्याशा आर्याला अक्षरे गिरवताना बघण्यातील आनंद खरेच अवर्णनीय आहे. आपली ताई म्हणते तसेच, पण बोबड्या बोलांनी ‘सोमवार, मंगळवार,...’ म्हणायची कोण घाई असलेला शुभम, आपल्याच मागे सगळ्यांनी ‘एक, दोन ...’ म्हणण्याचा आग्रह धरणारा ओजस, असे सगळेच बालगोपाळ मजेशीर आहेत. प्रत्येकाचीच आपली आपली एक तऱ्हा आहे, असे म्हणा ना. पहिल्यांदाच जेव्हा चार वर्षांपुढील मुलांना कागद-पेन्सिल घेऊन अक्षरे गिरवायला दिली होती, तेव्हा लगेच या लहानग्यांनासुद्धा त्यांची प्लास्टिकची गिरवायची पाटी नकोशी वाटू लागली आणि ऐटीत पेपर-पेन्सिल घेऊन सगळे लिहिण्यात रमू लागले. 

अजून तरी आम्ही ‘अक्षर ओळख’ आणि ‘अंक ओळख’ या दोन गोष्टींवर भर देत आहोत. त्याच्या बरोबरीनेच मराठी वार, महिने, रंग, आकार, अवयव, प्राणी, पक्षी अशा विविध शब्दांची माहिती करून देत आहोत, जेणेकरून मुलांना शुद्ध-स्वच्छ मराठीत बोलता यावे. मराठी सणांची माहिती, गोष्टी-बालगीते यांचाही समावेश अर्थातच आहे. कधी मुलांकडून गोष्टी-गाणी म्हणून घेतो, तर कधी आम्ही त्यांना ऐकवतो. वर्गाची सुरुवात आणि समारोप छोट्याशा प्रार्थनेने केला जातो. 

मुलांच्या वापरासाठी लागणारी सगळी पुस्तके सध्या तरी आम्हीच देत आहोत. बहुतेक सगळी पुस्तके नवनीत प्रकाशनाची आहेत. त्याबरोबरच इकडच्या एका स्थानिक इंग्रजी वर्गात बघितलेली एक पद्धत आम्ही वापरत आहोत. ज्या दिवशी जे शिकवायचे असेल, त्याचा छापील कागद मुलांना दिला जातो. त्यावर त्यांचे नाव, दिनांक घालायची सोय असते. उदा. आज ‘अ’ शिकायचा असेल तर, ‘अ’ गिरवण्याचा सराव करण्यापुरताच छापील कागद प्रत्येक मुलाला दिला जातो. पुरेसा सराव झाला, की पुस्तके वापरायला देण्याचा विचार आहे. शिवाय मुळाक्षरांचे एक ‘पझल’ आणले आहे. ते सुटे सुटे करून पुन्हा अनुक्रमे लावणे हा उद्योग मुलांना फारच आवडला आहे, असे जाणवले. 

अनुभव असा, की बहुतेक सगळ्याच मुलांना एक तरी गोष्ट मराठीतून सांगता आली आणि मराठी बालगीतही म्हणता आले; पण शब्दसंग्रह म्हणाल तर अगदीच तोकडा. इंग्रजी-मराठी मिश्र वाक्यांचे प्रमाण खूपच जास्त. मुळाक्षरांचा तक्ता वाचताना खरी पंचाईत झाली. ‘र रे रथाचा’ असे तोंडाने म्हणत तर होते, पण रथ म्हणजे काय तेच माहिती नाही. वजन, खटारा, भटजी, यज्ञ, धनुष्य, क्षत्रिय असे अनेक शब्द एक तर माहिती नाहीत किंवा कानावर पडले आहेत, पण चित्राशी त्याची सांगड घालता येत नाही. अशी बहुतेक सगळ्याच मुलांची परिस्थिती आढळली. सगळ्यात जास्त आश्चर्य तेव्हा वाटले, जेव्हा मी म्हटले की ‘मी भारतात जाणार आहे’ आणि मुलांमधून प्रश्न आला, ‘भारत म्हणजे काय?’ त्या दिवशी खूणगाठ बांधली, मराठी शाळा आवश्यक नाही, अत्यावश्यक आहे. 

माझाच नाही, तर तुमच्यापैकी बहुतेकांचा अनुभवही असाच असेल, याची खात्री आहे. आपण इतर प्रादेशिक भाषकांशी तुलना केली, तर मराठी भाषक आपल्या मातृभाषेबद्दल थोडे अधिक उदासीन असलेले दिसतात. शिवाय मराठी भाषकांमध्ये ‘मला नाही येत मराठी वाचता’ किंवा ‘आमची मुलं फक्त इंग्रजीच वाचतात’ असं अभिमानाने सांगणारे पालक बरेच दिसतात. अनेकांच्या घरात संपूर्ण संवाद इंग्रजीतून होतो. त्याचे परिणाम चांगले की वाईट, हा निर्णय योग्य की अयोग्य, याबद्दलची मते जरी संपूर्णपणे वैयक्तिक असली, तरीही सांगावेसे वाटते, की ज्या हौसेने तुम्ही परदेशी भाषा आपल्या मुलांना शिकवता, त्याच हौसेने आपापल्या मातृभाषाही मुलांना जरूर शिकवा. नुसता घरातला संवाद जरी मातृभाषेतून असेल, तरी बोलणे आणि पर्यायाने आकलन या दोन्ही गोष्टी साधल्या जातील.

आम्ही स्वित्झर्लंडला राहायला आलो, तेव्हा आमची मुलगी दोन वर्षांची होती आणि तिला संवाद साधण्याइतपत इंग्रजी आणि घरात बोलली जाणारी मराठी, तिच्या वयाला अनुसरून जेवढी यायला हवी, तेवढी येत होती. परदेशी माणसे किंवा मुले समोर आली, की ती इंग्रजीत बोलायची आणि बाकी सगळ्यांशी मराठीतच बोलायची. परंतु चार वर्षांची होईपर्यंत ती स्विस-जर्मन भाषा उत्तम प्रकारे बोलू लागली. आम्ही तिला शिकवायचा किंवा सरावासाठी घरात स्विस-जर्मन बोलायचा प्रश्नच नव्हता. कारण आम्हाला त्या भाषेचा गंधही नव्हता. आम्ही नेहमीप्रमाणे तिच्याशी पूर्णपणे मराठीतूनच संवाद साधत होतो. तर सांगायचे हे, की बाहेर पडली की रोजच्या वावरानेच मुले त्या त्या देशातील/शहरातील व्यवहाराची भाषा आत्मसात करतात. त्यासाठी आपल्या मातृभाषेला अजिबात डावलू नका.

आपापल्या मुलांना आपली मातृभाषा यावी म्हणून वाकडी वाट करून मराठीच्या वर्गाला घेऊन येणाऱ्या सगळ्याच पालकांचे कौतुक आहे आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. त्यांच्या सहकार्याशिवाय आमचे  प्रयत्न व्यर्थ ठरले असते; पण तरीही येणाऱ्या १० मुलांमध्ये नियमित येणाऱ्या दोन विद्यार्थिनींच्या ‘आया’ नोकरी करणाऱ्या आहेत, ज्या माझ्या घरापासून पुष्कळ लांब राहतात आणि तरीही न चुकता वर्गाला हजेरी लावतात. तसेच नियमित येणाऱ्यांमध्ये दोन ‘बाबा’ही आहेत (जो माझ्यासाठी सुखद धक्काच होता), जे ऑफिसमधून वेळेत घरी येऊन आपापल्या मुलांना वर्गाला घेऊन येतात. त्या चौघांचेही विशेष कौतुक.

आमच्या मराठी शाळेमुळे मुलांच्या ज्ञानात, त्यांच्या शब्दसंग्रहात फरक पडला आहे, असे आत्ताच म्हणणे खूपच घाईचे ठरेल; पण भविष्यात त्यांना मराठीतून व्यक्त होण्यासाठी या मराठी शाळेची नक्कीच मदत होईल, असे मात्र मी ठामपणे म्हणू शकते. 

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anant Zende About 298 Days ago
उत्तम कार्य आहे परदेशी राहून..मराठी भाषा विष यी प्रेम आपण ठेवले
0
0
Ravindra singh modi About 312 Days ago
Very Good effort and step for future generation. Sarvana Marathi Alich pahije.
0
0
Vikas kisanrao chaudhari Dhule Maharashtra state About 316 Days ago
Farch Sundar godupkram ! Jai Dnyaneshwar, Tukaram....
0
0
Vandana pawar About 316 Days ago
Arti mala pan Avdel mulana ani taincha palakana Marathi bhasha ani Bharatia kala kusar shikavayala.
0
0
Umesh Ganoo About 321 Days ago
उत्तम !!!
1
0

Select Language
Share Link