Next
लक्ष्मण श्रेष्ठांची श्रेष्ठ ‘एलॅबोरेशन्स’
BOI
Thursday, September 06, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:लक्ष्मण श्रेष्ठां
चा चित्र काढण्याचा आवाका मोठा आहे, चित्र काढण्यासाठी कागदाच्या शब्दशः थप्प्याच्या थप्प्या ते वापरतात. कागदाचे नुसते असलेले ढीग हळूहळू एकेका चित्रात रूपांतरित होतात. हा प्रवास चित्रांसाठी आणि चित्रकारांसाठी महत्त्वाचा असतो. त्यात प्रगटन महत्त्वाचे, त्यातील साधेसुधे प्रयोग आनंददायी असतात. श्रेष्ठांचे ‘एलॅबोरेशन्स’ हे प्रदर्शन पूर्णपणे एकरंगी होते. चित्रातील घटक जास्त मोकळे झालेले आणि जोडीला काही करकरीत भरीव भौमितिक आकार अधिक आलेले, असे हे प्रदर्शन होते. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज त्या प्रदर्शनाबद्दल...
..........
मुंबईच्या फोर्ट भागातील फ्लोरा फाउंटनजवळचे एक ठिकाण समकालीन किंवा आधुनिक भारताच्या कला प्रवासाला एका अर्थाने चालना देणारे ठरले आहे. या प्रवासात या गॅलरीची महत्त्वाची, सहयोगाची भूमिका राहिली आहे. दोन पिढ्या या गॅलरीने उत्तम कलावंतांना संधी देऊन नामवंत चित्रकार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अत्यंत निवडक चित्रकारांनाच येथे प्रदर्शनाला स्थान देण्यात येई. अत्यंत लहान जागेत ही गॅलरी कार्य करीत असे. दादीबा आणि काली पंडोल हे त्यांचे वडील येथे ‘पंडोल आर्ट गॅलरी’ चालवत असत. तळमजल्यावर बाहेरील भिंतीवर चित्रकार हुसेन यांनी रंगवलेले काळ्या रंगातील घोड्याचे चित्र आणि आत शक्य तितक्या प्रायोगिक कलांच्या निवडक प्रदर्शनांना जागा असे. ही निवडण्याची दृष्टी किंवा सजगतेमुळे या खासगी कलादालनात कायमच उत्तमोत्तम प्रदर्शने पाहता आली. त्यापैकी ‘एलॅबोरेशन्स’ हे लक्ष्मण श्रेष्ठा यांचे एक प्रदर्शन होय. त्यापूर्वीही श्रेष्ठांची प्रदर्शने पाहिली होती. ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट’ वगैरे ठिकाणी मूळ चित्रे पाहावयास मिळाली होती. त्याआधीच्या त्यांच्या चित्रांमध्ये मला तरी सातत्याने डोंगर, दऱ्या आणि रम्य निसर्गाची रूपांतरे दिसलेली आहेत. श्रेष्ठा मजा करतात चित्राच्या मांडणीत आणि रंग लावण्याच्या पद्धतीत. या दोन्ही बाबतीत ते कमालीचे स्वातंत्र्य आपल्या चित्रात सातत्याने घेत असलेले जाणवत राहते. मग रंग लावण्यासाठी सुरीचा वापर असो, ब्रशचा वापर असो किंवा रोलरच्या दांड्याचा वापर असो. श्रेष्ठांच्या चित्रात सातत्याने मोकळीक घेऊन रंग लावलेले दिसतात. वेळ घेऊन, एकमेकांवर सावकाश रंग लावल्याने त्यातील प्रत्येक स्तरातील रंगाचे अस्तित्व स्पष्ट दिसते. हे चित्रे जवळून पाहताना होत असते. लांबून मात्र आभासी निसर्ग दुरून पाहतो आहोत, असा अनुभव येत राहतो; तो मात्र अनुभवता यायला हवा. त्याला अवकाश आणि वेळ हवा.

लक्ष्मण श्रेष्ठालक्ष्मण श्रेष्ठांचा चित्र काढण्याचा आवाका मोठा आहे, चित्र काढण्यासाठी कागदाच्या शब्दशः थप्प्याच्या थप्प्या ते वापरतात. कागदाचे नुसते असलेले ढीग हळूहळू एकेका चित्रात रूपांतरित होतात. हा प्रवास चित्रांसाठी आणि चित्रकारांसाठी महत्त्वाचा असतो. त्यात प्रगटन महत्त्वाचे, त्यातील साधेसुधे प्रयोग आनंददायी असतात. श्रेष्ठांचे ‘एलॅबोरेशन’... आपण विस्तार म्हणू या. हे प्रदर्शन पूर्णपणे एकरंगी होते. निसर्गाच्या चित्रापासूनचीही फारकत किंवा विस्तार होय. चित्रातील घटक जास्त मोकळे झालेले आणि जोडीला काही करकरीत भरीव भौमितिक आकार अधिक आलेले, असे हे प्रदर्शन होते.
कुठे रंग लावलेले, कुठे पेन्सिलच्या रेघोट्या, कुठे रंग लावून पुन्हा काढून घेतल्याने राहिलेले डाग, कागदाचा एखादा कपटा चिकटवलेला; तर कुठे परिचित पानाचा आकार रेखाटलेला. हे सगळ सहज वाटत असले, तरी एकूण चित्रावकाशावर श्रेष्ठांची उत्तम पकड आहे, हे प्रत्येक चित्र सांगत होते. तणावरहित मोकळेपणातून झालेली ही चित्रे बराच वेळ पाहिली, की त्यातील खाचाखोचा दाखवून देतात.


श्रेष्ठा आपल्या चित्रांना ‘अनटायटल्ड’ हेच ‘अनाम’ नाव देत असतात बऱ्याचदा. एक भले मोठे चित्र प्रदर्शनात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. तीन भागांतील हे चित्र, ज्याला इंग्रजीत ‘ट्रिप्टीच’ म्हणतात, ते आठ फूट उंच व १२ फूट लांब अशा भव्य आकारातील होते, २००६ साली काढलेले. लांबवर काही आभासी डोंगर, दऱ्या किंवा वस्ती... किंवा यापैकी काहीच नाही. गडद वातावरण. अनेक टप्प्यांतून अवकाश विभागलेले. पुढचे, मागचे असे अवकाशाचे अनेक भाग झालेले. आकार, त्यामागील अंतराळ, पुन्हा आकार, अवकाश, अंतराळ यांचा खेळ चाललेला. सगळे साध्या भाषेत अस्पष्ट दिसेल असे आणि चित्रकारांच्या भाषेत स्पष्ट आणि योग्य स्वरूपात. अशा चित्रांना स्वीकारायला एक प्रकारचा सराव लागतो. तो प्रदर्शने पाहून पाहूनच येतो. यासाठी पाहणे महत्त्वाचे. मग तो चित्रकार असो, रसिक असो, संग्राहक असो किंवा चित्रविक्रेता असो... पाहण्याचा रियाज महत्त्वाचा ठरतो. श्रेष्ठांच्या या चित्रात आयत किंवा तत्सम काटेकोर भौमितिक आकार नव्याने येताना मला दिसले. मूळ घटकांमध्येच प्रयोग करण्याची त्यांची हातोटी अनन्यसाधारण आहे. कुठे समांतर रेषा, कुठे त्रिकोण, कुठे आयत वरील बाजूस डोंगरासारखा केलेला. प्रत्येक दृश्य निराळे... पोताचा भरपूर वापर... निसर्गाला अनुरूप स्वरूप.... कुठे मोठाले स्ट्रोक्स आकाशातून खाली येणारे. काही परिचित, तर काही अपरिचित आकार. हे भव्य चित्र आणि इतरही चित्रे... पंडोल गॅलरीच्या लहानशा खोलीमध्ये चित्रावकाश जास्तच भव्य वाटत होता. रणजित होस्कोटे या प्रदर्शनाच्या निमित्ताने लिहिताना म्हणतात, ‘एखाद्या संगीतकाराप्रमाणे ही चित्रे श्रेष्ठांनी रचली आहेत.’ जशा उत्तम संगीतकाराच्या रचना शब्दप्रधान नसतात, तशा श्रेष्ठांच्या चित्ररचना परिचित आकारांवर बेतलेल्या नसतात. संगीतातील विविध घटकांना जसे बांधले जाते तसे आणि एक आकृतिबंध तयार होतो, तसा दृश्य घटकांच्या रचनांचा हा आकृतिबंध होय.श्रेष्ठा मूळचे नेपाळचे. त्यांचे चित्रकलेचे शिक्षण ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’मध्ये झाले. शंकर पळशीकर यांच्यासारखे प्राध्यापक त्यांना कला महाविद्यालयात लाभले. श्रेष्ठांना गायतोंडेंसारख्या चित्रकारांचा आणि जहांगीर निकोलसनसारख्या रसिक संग्राहकाचाही सहवास लाभला. कृष्णम्माचारी बोस, रीयाज कोनो यांच्यासारख्या पुढे नावाजलेल्या, नव्या दमाच्या चित्रकारांच्या विचारांच्या पाठीमागे श्रेष्ठा खंबीरपणे उभे राहिले. इतकेच काय, अगदी अलीकडच्या राजाराम होलेसारख्या कलाकारांनाही ते प्रोत्साहित करत असतात.

श्रेष्ठा एखाद्या सिनेकलावंताप्रमाणे आकर्षक वेशभूषा करतात. त्यात एक साधेपणाही असतो आणि ‘ट्रेंडी’ गुणही जाणवतो. श्रेष्ठांनी चित्रातही आपला म्हणून दृश्य रूपात ‘ट्रेंड’ रसिकांसमोर सेट केला आहे. असा काही दृश्य प्रकार सेट करणे, हे जवळजवळ संपूर्ण जीवनभराचे काम. श्रेष्ठांनी हा ट्रेंड सातत्याने विस्तारत ठेवला आहे... या प्रदर्शनाच्या ‘एलॅबोरेशन्स’ या शीर्षकाप्रमाणे. 

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search