Next
कोईमतूरची सैर
BOI
Wednesday, July 04, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

पट्टीश्वर मंदिर
तमिळनाडूतील कोईमतूर म्हणजे एक सर्वगुणसंपन्न ठिकाण म्हणायला हरकत नाही. मोठ्या कापडउद्योगामुळे उद्योगनगरी आणि तमिळनाडूतील ‘मँचेस्टर’ अशी त्याची ओळख आहे. शिवाय ते ऐतिहासिक ठिकाण आहे. शिक्षणासाठीही ते नावाजलेले असून, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे कृषी विद्यापीठ तेथे आहे. त्याव्यतिरिक्त मंदिरे, अभयारण्य, धबधबे अशी पर्यटकांच्या आवडीची विविध ठिकाणेही तेथे आहेत. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात करू या कोईमतूरची सहल...
.......... 
मलय पर्वततमिळनाडूतील मँचेस्टर अशी ओळख असलेले कोईमतूर उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटातील दक्षिणेला केरळ व तमिळनाडूच्या सीमेवर उत्तर-दक्षिण पसरलेला निसर्गरम्य पर्वत म्हणजेच मलयाचल (मलय पर्वत) व त्याच्या पूर्वेस पायथ्याशी असलेला कोईमतूर जिल्हा हे कापडउद्योगाचे माहेरघरच.

मलये भिल्लपुरंध्री चन्दनतरुकाष्ठमिंधनं कुरुते॥ (म्हणजे या भागात चंदनाच्या लाकडांचा इंधन म्हणून वापर केला जायचा, असा याचा भावार्थ)

मलयाचल (मलय पर्वत)श्री महाप्रभूजी बैठकजी यांच्यासंदर्भात कोईमतूरमार्गे मलय पर्वतावर गेल्याचा उल्लेख नाथद्वाराच्या ब्लॉगमध्ये आहे. ह्युएनत्संग या चिनी प्रवाशानेही मलय पर्वताचे वर्णन केले आहे. हिमालयाहून मलय पर्वत श्रेष्ठ असल्याचे भर्तृहरी या संस्कृत पंडिताने त्याच्या श्लोकात सांगितल्याचा संदर्भ ग्वाल्हेरमधील दीपक भारतदीप यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये दिला आहे. तो श्लोक पुढीलप्रमाणे -

किं तेन हेमगिरिणा रजताद्रिणा वा यत्राश्रिताश्च तरवस्तरवस्त एव।
मन्यामहे मलयमेव यदाश्रयेण कंकोलनिम्बकुटजा अपि चंन्दनाः स्युः।।


‘मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला’ या बाळ कोल्हटकरांच्या भूपाळीतसुद्धा मलयगिरीचा उल्लेख आहे.

कोईमतूरकोईमतूर (कोयंबतूर/कोयंबटूर) हे तमिळनाडूतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. सर्वसाधारण पहिल्या ते चौथ्या शतकापर्यंत हा भाग संगम काळात चेरास राजवटीखाली होता. कोईमतूर-पलक्कडमार्गे पश्चिम किनारपट्टीवर जाण्याचा हा महत्त्वाचा मार्ग रोमपर्यंत व्यापारासाठी वापरला जात असे. दुसऱ्या शतकातील कवी सिलापथिकरम व इतर तमिळ कवी आणि संगम साहित्यामध्ये या भागाचा उल्लेख दिसून येतो. दहाव्या शतकात हा भाग चोला राजांच्या ताब्यात गेला. त्यांच्यानंतर या भागावर विजयनगर व मदुराईची नायक राजवट होती. नंतर म्हैसूर राजवट आणि टिपूच्या पाडावानंतर इंग्रज अशी सत्तांतरे येथे घडून आली. १८०४मध्ये कोईमतूर हे या भागातील प्रशासकीय ठिकाण म्हणून अस्तित्वात आले. १८७६ ते १८७८ या दोन वर्षांत या भागात प्रचंड दुष्काळ पडला होता. १९२०च्या सुमारास येथे कापड उद्योगास सुरुवात झाली. तो उद्योग आजही येथे टिकून आहे.

स्वातंत्र्यानंतर इतर उद्योगही वाढीस लागले. सध्या विद्युत मोटर्स, पंपनिर्मिती असे अनेक उद्योग येथे आहेत. तसेच मांसाहाराची (चिकन) कोल्ड स्टोरेज आहेत. येथील सुती व रेशमी साड्या प्रसिद्ध आहेत. हे माहिती-तंत्रज्ञानातील एक नावाजलेले ठिकाण असून, येथे आयटी पार्कही आहे. हे शैक्षणिक ठिकाणही म्हणून नावाजलेले आहे. कोईमतूरमध्ये पाच मेडिकल कॉलेज, अभियांत्रिकी विद्यालये, वायुदल प्रशिक्षण केंद्र असून, संपूर्ण जिल्ह्यात ७८ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कापूस व ऊस संशोधन केंद्र अश्या अनेक शैक्षणिक संस्था येथे आहेत.

व्हीओसी पार्कव्हीओसी पार्क : हे आबालवृद्धांचे कोईमतूरमधील आकर्षण आहे. हे झुऑलोजिकल पार्क शहरात मध्यवस्तीत नेहरू स्टेडियमजवळ आहे. स्वातंत्र्यसैनिक दिवंगत व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे नाव उद्यानाला दिले आहे. येथे ८९० प्राणी आहेत. त्यात १०६ सस्तन प्राणी, ३३५ पक्षी आणि सरपटणारे ५४ प्राणी आहेत. चंदनासह २०० प्रकारच्या वनस्पती आहेत. जवळच लहान मुलांच्या करमणुकीसाठी छान उद्यान आहे. तेथे जुरासिक पार्क, छोटी रेल्वे, मत्स्यालय आहे.

तमिळनाडू कृषी विद्यापीठतमिळनाडू कृषी विद्यापीठ : कोईमतूर येथील कृषी विद्यापीठ हे आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ समजले जाते. ७५० एकर जमिनीवर विस्तारलेले हे विद्यापीठ कृषीविषयक अभ्यासाचे आदर्श ठिकाण आहे. नानाविध वृक्षांच्या प्रजातींचा मोठा संग्रह येथे आहे. हे विद्यापीठ कोईमतूर रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.

पट्टीश्वर मंदिरपेरूर : हे गाव पट्टीश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. संगम काळात चोला राजा कारिकाला याने हे मंदिर उभारले. अर्थमहाल, महामहाल यांची उभारणी या काळात झाली असावी. याची पुनर्बांधणी १७व्या शतकात मदुराईच्या नायक राजाने केली. यातील कनक सभा नायक राजांनी बांधली. कनक सभेतील सुवर्ण नटराज हे एक प्रमुख आकर्षण आहे. छतावरील पाषाणशृंखला बघण्यासारख्या आहेत. गोपुरे, तसेच स्तंभ कलाकुसरीने भरलेले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी मुघल वेशातील सैनिकाची एक प्रतिमा (शिल्प) सापडली आहे. दर वर्षीच्या उत्सवात येथे भरतनाट्यम सादर करण्यासाठी अनेक गावांतून मंडळे येत असतात. हे ठिकाण कोईमतूरपासून सहा किलोमीटरवर आहे.

मरुधमलाई मंदिरमरुधमलाई मंदिर : भगवान सुब्रह्मण्यम स्वामींचे हे मंदिर कोईमतूरपासून १२ किलोमीटरवर आहे. पश्चिम घाटातील हे अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण असून, ते ६०० फूट उंचीवर ग्रॅनाइटच्या डोंगरात आहे. आसपास अनेक झरे असून, मुरुड तीर्थम् व नागतीर्थ या झऱ्यांचे पाणी औषधी असल्याचे समजले जाते. 

अन्नामलाई वन्यजीव अभयारण्यअन्नामलाई वन्यजीव अभयारण्य (इंदिरा गांधी अभयारण्य) : १४०० मीटर उंचीवरील एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे अभयारण्य हत्तींचे घर समजले जाते. हत्तींचे कळप येथे नजरेस पडतात. अनेक प्रकारचे पक्षी, वाघ, रानडुकरे, कोल्हे, बिबटे येथे आहेत. अमरावती सरोवरात मगरीही आहेत. पोलचीपासून टॉप स्लिपपर्यंत हे जंगल विस्तारले आहे. इथे जाताना पोलची येथूनच वन विभागाचा पास घ्यावा लागतो. टॉप स्लिपमध्ये राहण्याची व्यवस्था आहे.

सिरुवनी वॉटरफॉल व धरणसिरुवनी वॉटरफॉल व धरण : कोईमतूरपासून ३७ किलोमीटरवर हा धबधबा असून, तेथूनच १० किलोमीटरवर धरणही आहे. हे अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. येथील पाणी चवीला चांगले असते.

तिरुमूर्ती मंदिर व अमरावती धरणतिरुमूर्ती मंदिर व अमरावती धरण : तिरुमूर्ती मंदिर उधमपेठपासून २० किलोमीटरवर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले श्री अमरलिंगेश्वर मंदिर पाहण्यासाठी हजारो लोक येत असतात. स्थानिक कथेनुसार अत्री ऋषी व अनुसया येथे राहत होते. अनुसयेच्या पातिव्रत्याची कथा सर्वांना माहीतच आहे.

कोईमतूर हे विमानाने, रेल्वेने व रस्त्याने देशाशी जोडलेले आहे. येथून जवळच कन्नूर व उटी ही लोकांची आवडती ठिकाणे आहेत. उटी कोइमतूरपासून ८५ किलोमीटरवर आहे. मेट्टूपलायम ते उटी या मार्गावर (नेरळ, माथेरानसारखी) छोटी ट्रेन आहे. त्यातून निलगिरीचा प्रवास अतिशय आनंददायी असतो. मुंबई, कोलकाता, दिल्ली ही सर्व ठिकाणे रेल्वेने व विमानाने या शहराशी जोडलेली आहेत. येथे जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मे. पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठीही लोक गर्दी करतात. राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल्सपासून मध्यम प्रतीची हॉटेल्सही येथे उपलब्ध आहेत.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

अन्नामलाई वन्यजीव अभयारण्य

(कोईमतूरची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
MAk About
इतकी व्यवस्थित माहिती की जणू काही आपण तिथे गेलो आहोत असं वाटतं
1
0
Anand G Mayekar About
Sachitra Ani savistar mahiti. Vachtana pratyaksha Koimbturchi Safar kelyasarkhe vatate.
1
0
MILIND LAD About
Nice Information Madhavji. Great efforts.
1
0

Select Language
Share Link
 
Search