Next
तिवरेवासीयांच्या मदतीसाठी रत्नागिरीत ‘संगमेश्वरी बाज’चा प्रयोग
BOI
Saturday, July 06, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे सर्वस्व वाहून गेले आहे. त्यांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे आले आहेत. मदतनिधी उभारण्यासाठी ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकप्रिय लोकनाट्याचा विशेष प्रयोग १३ जुलैला रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे.

समर्थकृपा प्रॉडक्शनचे हे नाटक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शनिवारी, १३ जुलैला सायंकाळी सात वाजता सादर केले जाणार आहे. तिकिटाचे मूल्य १०० रुपये ठेवण्यात आले आहे. या प्रयोगातून मिळणारे सगळे उत्पन्न तिवरेवासीयांना दिले जाणार असल्याचे कळवण्यात आले आहे. ‘धरण फुटल्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. स्वकीयांनाही डोळ्यांदेखत गमवावे लागले. यातून जे वाचले आहेत, त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी लोकांच्या मदतीने आम्ही या प्रयोगाद्वारे खारीचा वाटा उचलत आहोत,’ अशी भूमिका नाटकाच्या टीमकडून मांडण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष, आमदार उदय सामंत यांनी केले आहे.

‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हा संगमेश्वरी बोलीत लोकनाट्याच्या स्वरूपात सादर केला जाणारा प्रयोग आहे. गावाला आलेल्या मुंबईकर चाकरमान्याला कोकणातल्या विविध सांस्कृतिक गोष्टी, इकडची माणसे यांचे दर्शन घडविणे, कोकणातल्या वैभवाची आठवण करून देणे आणि त्यातून शेवटी काही संदेश देणे, असे त्याचे स्वरूप आहे. या नाटकाने दोन वर्षांत १५० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. कोकणाच्या समृद्ध वारशाची जाणीव करून देणारा हा नाट्यप्रयोग सादर करणारी मंडळी कोकणवासीयांवर कोसळलेल्या संकटात त्यांना धीर देण्यासाठी पुढे आली आहेत.

तिकिटांसाठी संपर्क :
सुनील बेंडखळे : ९०२८४ ७८३४४
मंगेश मोरे : ९०११९ १८२८२

(‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या नाटकाविषयी सविस्तर वाचण्यासाठी आणि झलक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search