Next
‘समाज परिवर्तनासाठी बंधुता अत्यंत आवश्यक’
राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात डॉ. सबनीस यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, January 03, 2019 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

अध्यक्षपदाची सूत्रे बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्याकडून स्वीकारताना डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : ‘संत किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती,धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती,धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवले. बंधुतेचे मारेकरी सर्व जाती,धर्माचे लोकच आहेत. यामुळे माणसामाणसातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले जात आहे. समाजात परिवर्तन घडवायचे असेल, तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे’, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व २०व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे आणि भगवान महावीर शिक्षण संस्था, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात आयोजित विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे उद्घाटन अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, हाजी अफझलभाई शेख, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, डॉ. अश्विनी धोंगडे, महेंद्र भारती, कवी चंद्रकांत वानखेडे, मधूश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके, शिवाजीराव शिर्के, हरिश्चंद्र गडसिंग आदी मान्यवर उपस्थित होते. 


तत्पूर्वी, राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. यामध्ये साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या हस्ते डॉ. श्रीपाल सबनीस यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली. 

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘भारतीय लोकशाहीच्या गाभ्याचे अधिष्ठान स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या सुत्रावर आधारीत आहे. मात्र, या मूल्यात्मक सूत्रांना आपण समान पातळीवर स्वीकारले आहे का ? हा प्रश्नणच आहे. स्वातंत्र्य व समता या दोन तत्वांना अति महत्त्व देऊन राज्यकारभार केला. बंधुता नसेल तर या दोन तत्वांना अर्थ नाही. बंधुता तिसऱ्या स्थानी आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे, की बंधुताच शोषणमुक्त भारत निर्माण करू शकते. मुळात बंधुता ही संकल्पनाच भावना व विचार यांची एकात्मता सिद्ध करणारे मूल्य आहे. त्यामुळे बंधुतेच्या संकल्पनेत मानवता, करुणा, प्रेम, वात्सल्य, दया या मूल्यांचा अंतर्भाव आढळतो. समाजात परिवर्तन घडवायचे असेल, तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे.’ 


डॉ. सबनीस पुढे म्हणाले, ‘गुन्हेगारालाही माणूस म्हणून समजून घेण्याच्या भूमिकेत बंधुताच निर्णायक दिसते. सुडभावनेपेक्षा बंधुता श्रेष्ठ ठरते. जागतिक पेच सोडवतानाही राष्ट्रा-राष्ट्रातील संवाद महत्त्वाचा ठरतो. माणसाच्या जगातील सर्व प्रकारच्या भेदांना नाहीसे करण्यासाठी बंधुता उपयोगी ठरते. त्यामुळे श्रीमंत-गरीबात बंधुता आणण्याची गरज आहे. बंधुतेशिवाय समता पेरली जाऊच शकत नाही. बंधुतेची उपेक्षा जगाला परवडणारी नाही. तिसऱ्या महायुद्धालाही बंधुताच तारु शकते.’ 

अॅड. आव्हाड म्हणाले, ‘आज राष्ट्रपुरुष जातीजातीत विभागले गेले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय ही तत्वे समृद्ध केली पाहिजेत.’  

प्रकाश जवळकर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनीही आपले मनोगत मांडले. 


या वेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषण पुस्तकाचे,तसेच मूल्याविष्कार या संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या बंधुताचार्याची प्रकाशगाथा ग्रंथाचे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे संपादित अग्निकुंड समीक्षा ग्रंथाचे आणि पवनेचा प्रवाह साप्ताहिक विशेषांकाचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. हाजी अफझलभाई शेख यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search