Next
बाळशास्त्री जांभेकर, रमेश मंत्री
BOI
Saturday, January 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘दर्पण’ हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र १८३२ साली सुरू करणारे मराठी भाषेचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि ‘महानगर’सारख्या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आणि एकाच वर्षात ज्यांची ३४ पुस्तकं प्रकाशित झाली असे विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा सहा जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी.....
........
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर

सहा जानेवारी १८१२ रोजी जन्मलेले बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेचे आद्य पत्रकार म्हणून ओळखले जातात. वयाच्या विसाव्या वर्षी, सहा जानेवारी १८३२ रोजी त्यांनी ‘दर्पण’ हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं. ते कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते आणि त्यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक अशा दहा भाषांचं ज्ञान होतं. 

समाजातल्या अनिष्ट प्रथा, चुकीच्या रूढी, चालीरीती, अज्ञान, दूर करण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी त्यांनी आपले आपले सहकारी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने ‘दर्पण’ सुरू केलं. त्याचं स्वरूप मराठी आणि इंग्लिश अशा जोड भाषेत होतं. त्याच्याच जोडीने त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे मराठीतलं पहिलं मासिक सुरू केलं. त्यामधून त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित, इतिहास आणि भूगोल अशा विषयांवर लेख छापले. 

नीतिकथा, इंग्लंडची बखर, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धी गणित, शिक्षारीती, बालव्याकरण अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१८ मे १८४६ रोजी त्यांचं निधन झालं.
..................

रमेश राजाराम मंत्री

सहा जानेवारी १९२५ रोजी झारापमध्ये जन्मलेले रमेश शंकर कुळकर हे दत्तक गेल्याने रमेश राजाराम मंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले आणि पुढे विनोदी लेखक, कथाकार आणि प्रवासवर्णनकार म्हणून वाचकप्रिय झाले.

त्यांनी जगभर भरपूर भ्रमंती केली होती आणि त्यातून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. ते प्रचंड गतीने लेखन करत असत. १९७९ या एकाच वर्षात तर त्यांची तब्बल ३४ पुस्तकं प्रकाशित झाली होती. त्यांचीं ‘महानगर’ ही काहीशी स्वानुभवांवर बेतलेली कादंबरी प्रचंड लोकप्रिय झाली होती.

थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग, सह्याद्रीची चोरी, अती झालं नि हसू आलं, मुलखावेगळी माणसं, साप्ताहिक, गुजगोष्टी, महानगर, जनू बांडे अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१९ जून १९९८ रोजी त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link