Next
‘स्टार्टअप्सच्या यशात प्रतिभा, अभिनव कल्पना महत्त्वाची’
‘टायकॉन २०१९’ परिषदेत तज्ज्ञांचे मत
प्रेस रिलीज
Saturday, April 13, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this article:पुणे : स्टार्टअप्स यशस्वी होण्यासाठी प्रतिभा आणि अभिनव कल्पना यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मत तज्ज्ञांनी येथे व्यक्त केले. ‘दी इंडस आंत्रप्रेन्युअर्स’तर्फे येथील हॉटेल वेस्टीन येथे आयोजित ‘टायकॉन २०१९’ या स्टार्टअप्ससाठी असलेल्या दोन दिवसीय अभिनव परिषदेत भारतभरातून ५००हून अधिक नवउद्योजकांनी सहभाग नोंदविला.

या प्रसंगी ‘दी इंडस आंत्रप्रेन्युअर्स’चे अध्यक्ष किरण देशपांडे, ‘टायकॉन २०१९’चे अध्यक्ष विनीत पटनी उपस्थित होते. या दोन दिवसीय परिषदेत केशव मुरूगेश, गणेश नटराजन, आर गोपाल कृष्णन, आर नारायणन, आनंद देशपांडे, हरिश मेहता, विश्‍वास महाजन, बीव्ही जगदीश आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या परिषदेची संकल्पना ‘दी सेकंड वेव्ह’ ही होती.

या वेळी स्टार्टअप्स आणि ग्रोन अप्स व्यावसायिकांमध्ये एक खास जुगलबंदी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘टायकॉन २०१९’चे अध्यक्ष विनीत पटनी यांनी या चर्चासत्राचे समन्वयन केले. प्रख्यात सल्लागार आर गोपाल कृष्णन आणि एंजेल इनव्हेस्टर व मेंटॉर आर नारायणन यांनी ‘स्टार्टअप्स ते ग्रोनअप्स’ या प्रक्रियेतील आपले अनुभव सर्वांबरोबर मांडले.

या वेळी नारायणन म्हणाले, ‘स्टार्टअप्स यशस्वी होण्याचा दर अद्याप कमी असला आणि स्टार्टअप्स व्यावसायिकांनी दैदीप्यमान यश मिळविल्याची उदाहरणे कमी असली, तरीही आपण त्याबद्दल इतक्यात कोणतेही मत बनविता कामा नये. ज्याप्रमाणे एखादे लहान मुल चालायला शिकताना अनेकदा पडते व परत उठून चालण्याचा प्रयत्न करते आणि त्यामध्येच शिकते अशाच प्रकारे स्टार्टअप्सना काय करू नये हे सांगण्यापेक्षा त्यांना संपूर्ण मोकळीक देणे आवश्यक आहे.’

गोपाल कृष्णन म्हणाले, ‘ज्याप्रमाणे एक लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याची देखभाल करतो. त्याचप्रमाणे स्टार्टअप्सचीदेखील देखभाल करणे आवश्यक आहे. जमेची बाजू म्हणजे स्टार्टअप व्यावसायिक हे तरुण असतात आणि त्यांना कुठल्याही परिसीमा किंवा भीती नसते. त्यामुळे एका मोकळ्या वातावरणात ते शिकू शकतात.’

‘नॅसकॉम’चे अध्यक्ष केशव मुरूगेश म्हणाले, ‘कुठल्याही स्टार्टअप्ससाठी नवसंकल्पना ही महत्त्वाची असली, तरी ती फक्त एक सुरुवात असते. त्याच्या पुढच्या प्रवासात या संकल्पना प्रत्यक्षात कशा आणल्या जातात व ते योग्य वेळ साधू शकतात का याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘एअरबीएनबी’ या संकल्पनेला बहुतेकजणांनी आधी नाकारले; मात्र मंदी आल्यावर हीच संकल्पना एक यशस्वी व्यावसायिक धोरण म्हणून पुढे आली. त्यामुळे योग्य वेळ साधणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.’

तंत्रज्ञानामध्ये आपल्या दृष्टीकोन आणि महत्त्वाकांक्षेमध्ये परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य असते. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा प्रभाव हा उद्योगातील सर्व क्षेत्रांवर पडत असल्याचे गणेश नटराजन म्हणाले.

नवसंकल्पनांबाबत बोलताना पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ म्हणाले, ‘सत्यमेव जयते मालिका सुरू असताना आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे भारतात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यावर उपाय शोधला गेला नाही आहे; मात्र हे उपाय फक्त एका विशिष्ट क्षेत्र किंवा गावापुरते मर्यादित राहिले व त्याचे रूपांतर सामूहिक चळवळीत झालेले नाही. त्यामुळे आपल्याकडे ज्ञान आणि तंत्र आहे मात्र त्याचा आवाका आपल्याला वाढविता आला नाही. या उपाययोजना आणि सामूहिक चळवळीमधील अंतर दूर करण्यासाठी संवाद व संपर्क अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही वॉटर कप ही संकल्पना सुरू केली. जी एक स्पर्धेच्या रूपात असून, त्यात मनोरंजन, आधुनिकता आणि सर्वांचा सहभाग आहे. ती सर्व सहभागी घटकांना माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी मिळवून देते. आम्ही महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या पाणी या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले.’किरण राव म्हणाल्या, ‘मी शहरी वातावरणातून आलेली एक स्त्री असून ग्रामीण भागाबद्दलची माझी कल्पना अनेक चित्रे, चित्रपटातील ग्रामीण भागाचे चित्रण अशा मर्यादित गोष्टीवर अवलंबून होती. मला त्याविषयी माहिती नव्हती; परंतु प्रत्यक्ष ग्रामीण भागात गेल्यानंतर माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन संपूर्णपणे बदलला. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांशी जोडले गेल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. हा अनुभव माझ्यासाठी परिवर्तनशील आणि परिपूर्ण असा होता. मी निसर्गाशी केवळ जोडले गेले नाही, तर आपण निसर्गाचा कसा नाश करत आहोत याची जाणीव झाली आणि वॉटरकपच्या माध्यमातून निसर्गाचे जतन करण्याची संधी मला मिळाली आहे.’

‘टायकॉन’मध्ये ५०हून अधिक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले, जे नवउद्योजकांसाठी प्रेरणादायक असल्याचे ‘टायकॉन २०१९’चे अध्यक्ष पटनी यांनी सांगितले.

‘दी इंडस आंत्रप्रेन्युअर्स’चे अध्यक्ष व मोजो नेटवर्क्सचे सहसंस्थापक देशपांडे म्हणाले, ‘स्टार्टअप्समध्ये नवसंकल्पना आणि गती हे गुण बघायला मिळतात, जे बरेचदा प्रस्थापित व्यवसायांमध्ये दिसत नाहीत. पुणे हे स्टार्टअप्सचे प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येत असून, नवउद्योजकतेला चालना देणे महत्त्वाचे आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search