Next
लाँग लिव्ह इन माय हार्ट
BOI
Wednesday, February 14, 2018 | 08:30 AM
15 0 0
Share this story


‘जान जाती है जब उठ के जाते हो तुम...’ खाली मान घालूनच तू माझा हात धरून म्हणालास. तुझ्या डोळ्यांत पाणी होतं. माझा हात धरलेला तुझा हात कापत होता. तुझं हृदय बाहेर येऊन धडधडत असल्याप्रमाणे त्याचा वेग मला जाणवत होता. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं, की ‘आय लव्ह यू’ वगैरे तकलादू आहेत रे.., तुझ्या देहबोलीतून व्यक्त होणाऱ्या प्रेमापुढे. मग मी माझ्याही नकळत तुझ्याशेजारी बसून गेले, ती तुझ्या कायमच्या सोबतीच्या अभिलाषेनं.... व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त विशेष...
.....................
‘आज जाने की जिद ना करो..’ डेस्कवरच्या माझ्या हातावर हात ठेवत तू किती विनंतीपूर्वक म्हणत होतास आणि मला भस्सकन हसायला आलं. तुझा चेहरा एकदम पडला आणि मला अजूनच हसायला आलं. ‘आज काय विशेष?  गझल वगैरे.. आज ना माझा वाढदिवस, ना तुझा, ना कंपनीचा. मग? मध्येच कसलीही खुळं येतात ना..?’ ‘हो, पण फेब्रुवारीची २९ तारीख तर आहे ना..’. ‘व्हॉट सो स्पेशल अबाउट २९ फेब..?’, मी जरा उखडूनच म्हणाले. अख्खा व्हॅलेंटाइन्स डे असाच फुकट घालवल्यानंतर या २९ फेब्रुवारीचं काय लोणचं घालणार होते मी. ‘कमाल आहे तुझी. २९ फेब्रुवारी म्हणजे लीप इयर. चार वर्षांनी एकदा येणारी तारीख...’

‘पुरे.. आता त्याची कारणमीमांसा करत बसू नकोस. नाहीच आठवलं तर मी गुगल करेन. तुझा मुद्दा काय ते सांग. आठ वाजून गेलेत, मला खरंच उशीर होतोय रे...’ ‘तुला कुठं खिंड लढवायची आहे, उशीर व्हायला. घरी जाऊन गिळून झोपणारच आहेस ना..’  तोही चिडला पण क्षणभरच. ‘अगं, म्हणजे मी इतकं म्हणतोय ना! बरं फक्त दहा मिनिटं..’

नाखुशीनेच मी हो म्हणाले. मला तुझं माहितीये. काही तरी फालतू कामं असतात. कुठली तरी जुनी पुराणी गोष्ट, नाही तर दिवसभरातली एखादी घटना सांगायची असते. जरा बरा मूड असेल, तर पिक्चरमधला आठवलेला एखादा किस्सा तुला सांगायचा असतो आणि जरा सेंटी-बिंटी असशील, तर तुला माझा अबोल सहवास हवा असतो. बाकी काही नाही. प्रेम, रोमान्स हे शब्द तर तुझ्या डिक्शनरीतच नाहीत. मला वाटतं या शब्दांनी आणि छटांनी भरलेली एखादी डिक्शनरी तुला गिफ्ट करावी. ती तशी नसेल, तर खास तुझ्यासाठी बनवून घ्यावी. मनातल्या मनात असं वैतागतच आपण चालू लागलो. संभाजी बागेच्या समोरच्या कठड्यावर बसलो, पंधरा मिनिटं झाली तरी तू निवांत. पाय लांब करून इकडं तिकडं पाहत बसलास. थोडीशी चुळबूळ जाणवत होती. थोडा रेस्टलेससुद्धा वाटलास.

‘काय झालंय..? का थांब म्हणालास.’ ‘सहज,’ तू बिचकत म्हणालास. ‘मग बस तू एकटा..’  माझा तर रागराग होत होता. हा कधी सुधारणार आहे. मी किती तोडून बोलते, दुर्लक्ष करते. म्हटलं यामुळे तरी जवळ येईल. मनातलं बोलेल; पण नाहीच. बरं मी बोलायला जावं, तर बोलूही देत नाही. टाळून पुढं जाण्यात तर याचा हात कोणी धरूच शकत नाही. तसं मलाही जावंसं वाटत नाहीच आहे. एक तर कधी नव्हे ते आमच्या महाभागानं गझलेनं रोखलंय. यार.! कितना पेचिदा है सबकुछ.. पण मी तरीही नाखुशीने उठले. तू हात खेचून खाली बसवलंस आणि मग डोळ्यांत डोळे घालून म्हणालास, 

‘वक्त की कैद में जिंदगी है मगर, चंद घडियाँ यही है जो आझाद है.. 
इनको खोकर मेरी जान ए जाँ, उम्रभर ना तरसते रहो...’

माझ्या तर हृदयाची धडधड वाढली होती. हुरहूर की काय ती एकदम वाटू लागली. तुझा हा बदललेला नूर मला झेपतच नव्हता. मला वाटलं, याला भूक-बीक लागली असणार. मी तसं विचारलंही.. ‘भूक लागलीय का.?’ ‘कहे तो आप के प्यार की..’ मी बसल्या जागीच हवेत होते. ‘मला ताप आलाय का बघ. तुला नाही ना आला ताप.? मी बरी आहे ना?  दोघांपैकी एक कुणीतरी आजारी असणार बहुधा..’ मी तुझ्या बडबडीवर आय मीन प्रेममयी बडबडीवर विश्वास ठेवू शकत नव्हते.

‘हम तो आपके मरज है....’ इतकं म्हणालास अन् दिलखेचक स्मित केलंस. मी खल्लास, पण पुढे काही बोलेचनास तू. मी डोळ्यांनीच खुणावलं, तसा म्हणालास, ‘आता प्लीज भाव खाऊ नकोस हां! तुला कळलंय मला काय म्हणायचंय, राइट.? मलाही माहितीये तुझ्या मनात काय आहे. मागची दोन वर्षं पाहतोय ना.. फेब्रुवारी महिना आला, की तू हवेत असायचीस. एक एक करून रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे करत व्हॅलेंटाइन्स डेसुद्धा निसटायचा तेव्हा तुझी होणारी चीडचीड कळायची; पण तुला कसं, सारं काही हटके लागतं. त्यात गंमत लागते. अनरोमँटिक गोष्टीही रोमँटिक लागतात. मला काय डोंबल कळत नाही बघ त्यातलं; पण मला आवडतो फेब्रुवारीतला हा एक जास्तीचा दिवस. म्हणून मग ठरवलं होतं, की याच दिवशी...’ पुन्हा तुझी गाडी अडकली. कान जो सुनने तरसे रहे थे.. फिर तुमने ब्रेक लगा दिया. दीर्घ श्वास घेऊन बोलू लागलास, ‘जे डोळ्यांत दिसतंय तेच हृदयात आहे. तेच ओठांवरही आहे. बोलताना थोडंसं अडखळायला होतंय एवढंच.’

‘ढम्पू... ‘आय लव्ह यू..’ असं म्हणायचंय का.. मग म्हण ना..’ मी किती अधीर झाले होते ते ऐकायला. ‘येस... सेम फीलिंग..,’ तू पटकन म्हणालास. मला जाम हसू आलं होतं. तुझं काहीही खरं नाही. आत्तासुद्धा तू जे म्हणतोयस ते कितपत खरं हे माझं मलाच कळत नव्हतं, म्हणून मी शेवटी उठलेच.

‘जान जाती है जब उठ के जाते हो तुम...’ खाली असलेल्या मानेनंच तू माझा हात धरून हे म्हणालास. तुझ्या डोळ्यांत पाणी होतं. माझा हात धरलेला तुझा हात कापत होता. तुझं हृदय बाहेर येऊन धडधडत असल्याप्रमाणे त्याचा वेग मला जाणवत होता. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं, की ‘आय लव्ह यू’ वगैरे तकलादू आहेत रे.., तुझ्या देहबोलीतून व्यक्त होणाऱ्या प्रेमापुढे. ‘यूँ ही पहलू में बैठे रहो..’ आज जाने की जिद ना करो...’ तू तसंच पुढे म्हणालास. मग मी माझ्याही नकळत तुझ्याशेजारी बसून गेले, ती तुझ्या कायमच्या सोबतीच्या अभिलाषेनं.... 

बरोबर सहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट. तुला आठवतंय? आठवणार का नाही? तुझ्या लीप वर्षातला खास दिवस होता ना तो. आठवतच असणार तुलाही. आज चौदा फेब्रुवारी आहे बघ. सकाळपासून तुझी खूप खूप आठवण येतेय. खूपच. हुरहूर, कासावीस, उलघाल सगळे समानार्थी आणि तरीही भिन्न छटांचे हे शब्द शरीरभर ठाण मांडून बसलेत. मिसिंग यू अ लॉट... तू करतोस मिस? चार वाजलेत. बाहेर ऊन नाहीये. तुला आवडतो तसा पिवळसर प्रकाश आहे. हवेतही प्रेमाचे तरंग आहेत. तुला आवडतो त्याच टपरीवरचा चहासुद्धा आहे. टपरीचं हॉटेल झालं इतकंच; पण तू... तू कुठेच नाहीस.. कुठेच म्हणजे कुठेच.! घरी, गावी, शहरात, परदेशात कुठेच नाहीयेस. जीभ रेटतच नाही रे.. म्हणायला, की तू जगातच नाहीस. 

हेच वास्तव ना.. कशाचं टेन्शन घेतलं होतंस तू? कशाचं दडपण होतं? कुठले प्रॉब्लेम्स होते तुझे? काही कळू दिलं नाहीस आणि मग अनावर झालं ते सारं, तेव्हा फॅनला लटकलास. गेलास सोडून. मी म्हणत राहिले... आज जाने की जिद ना करो.., पण तू ऐकणार थोडी होतास. माझ्या हातात तीन महिन्यांची मनू ठेवून तू.. तू निघून गेलास. अनंताबिनंताच्या प्रवासाला. दोन वर्षं झाली आता. तुझ्या आठवणींची रुंजी कायम-कायम आहे. कैक वेळा तुझा राग येतो. तुझ्या भेकडपणाचा त्रासही होतो. बोलून मोकळा झाला असतास, तर केली असती काहीतरी तजवीज... जगण्याची! पण तुला कधी बोलताच नाही आलं; पण आता मी काय करू तूच सांग? नाही म्हणजे, मागे राहणाऱ्यानं काय करावं. आयुष्य रेटत रेटत न्यावं नाही का? एकाकी होऊन राहावं. तू मोकळा झालास; पण तुझ्या जाण्याची शिक्षा मला का? मनूला का? पदोपदी तुझं नसणं माझ्याभोवती पिंगा घालतं. मी स्वत:ला समजावत राहते, की सो व्हॉट..! जगणं थांबत नसतं कुणावाचून. खरंच जगणं थांबत नाही. मी पहिल्यापेक्षा जास्त आनंदी राहते. मनात येणाऱ्या सगळ्या नकारात्मक भावनांना दूर लोटते; पण काही वेळा वाटत हे सारं खोटंय रे.. वरवरचं. आय नीड कंपनी. आय नीड कम्पॅनियन. आय नीड लव्ह. येस व्हाय नॉट..! खूप मोडून पडल्यासारखं होतं कित्येक वेळा. एकटेपणानं जीव नकोसा होतो. लोक म्हणतात मनू आहे की.. पण ती मुलगी आहे रे.. आय नीड पार्टनर. डू यू अंडरस्टँड...? कुणीतरी माझ्याबरोबरचा, समवयस्क, सहचर... 

मी असं कुणाला बोलायला गेले, की लोकांना वाटतं ‘ऑल धिस मीन आय वाँट सेक्स.. बट यू नो व्हॉट आय मीन..? आणि बरं तसं वाटलं तरी चूक काय? माझ्या शरीराच्या गरजा सेकंडरी का? त्यासाठीदेखील मला त्रास नसेल का होत? होतोच रे.. फक्त ते बोलायची सोय नाही. कुठंच. मैत्रिणींतही. लगेच लेबलिंग होत रे. मी कोण, कशी, कुणासोबत... लगेच गृहीतकं तयार होतात. असो..  मला सकाळपासून तुझी खूप खूप आठवण येतेय. तुझ्या सहवासातले अगणित क्षण मनावर कब्जा करून बसलेत. त्या आठवणीनं मला फार छान वाटतंय. असहायदेखील वाटतंय. मागे राहणाऱ्यांचे हाल होतात हे कळलं असतं तर तू थांबला असतास का रे? जाऊ दे. मला तुला काहीतरी वेगळंच सांगायचंय. तू तसा समजूनच घेशील.. मी ना.. मी दुसरं लग्न करतेय. मनूसाठी वगैरे नाही हां.. माझ्यासाठीच..! 

म्हणजे, त्यानं मला पहिल्यांदा विचारलं तर माझी तंतरलीच. चारचौघींसारखी भडकले. शिव्याही घातल्या. मी एकटी नाही, माझ्या एकटेपणाचा फायदा घेऊ नको वगैरे फुल बॅटिंग केली; पण मी एकटा आहे. मला तुझी सोबत आवडेल’, असं तो म्हणाला तेव्हा मला रडू आलं. मग तुझी फिलॉसॉफी झाडली. तुला आठवतंय, तू एकदा मला म्हणाला होतास, ‘आयुष्यात ज्याला खरं प्रेम मिळालं त्यानं त्यासोबत लग्न करूच नये. प्रेमाची इतकी सुरेख भावना लग्नाच्या व्यवहारात लोपून जाते. खरं प्रेम आयुष्यात मिळालं नाही तरी कायम मनात रेंगाळत राहतं... 

हा नियम खऱ्या प्रेमासाठी. उगीच थोड्याबहुत आकर्षणाला किंवा आकर्षणापेक्षा किंचित थोडं पुढं असणाऱ्या भावनांना आपण प्रेमाची लेबलं लावतो. तेच मुळी चुकीचं. कधी कधी वाटतं मला, ‘मी तुझ्याशी लग्नच करायला नको होतं. भांडणं करण्यात किती वेळ घालवतो ना आपण. त्यापेक्षा मी कायम तुझ्या मनात प्रेम होऊन राहिलो असतो तर ते किती सुखद..’ ही तुझी घाणेरडी फिलॉसॉफी ऐकून मी जाम चिडले होते तुझ्यावर. मला रडूही आलं होतं तेव्हा. माझ्याशी लग्न केल्याचा तुला पश्चाताप होतोय म्हणून माझा खूप त्रागा झाला होता. नंतर तू समजावत राहिलास, ‘अगं पश्चाताप नाही; पण मी तुला दुखावतो. या जगात जी मला सर्वाधिक प्रिय आहे, तिलाच मी दुखावतो. याचा मलाच खूप त्रास होतो.’

हां.., तर प्रेम आणि लग्नवाली ही मला न पटलेली फिलॉसॉफी मी त्याला पटवून सांगायला लागले. त्याला तुझं म्हणणं तंतोतंत पटलं. मग म्हणाला, ‘बरं, आपण लग्नाचा व्यवहार न करता लग्नाचा सोहळा केला तर... सोबत जगण्याचा उत्सव केला तर. आपणही भांडू, संघर्ष करू, दुखावूसुद्धा, पण त्यानंतरही आपल्याला एकमेकांची ओढ कायम राहिली तर मग मागे हटायचं नाही... सोबत चालत रहायचं..’ बस्स..! मी तयार झाले.

तर, मी लग्न करतेय, तुझ्या आठवणींसोबत. तुला विसरता येणार नाही. तुला माफही करता येणार नाही. तू जखम होऊन राहणार सोबत. त्यावर खपलीही नकोय, त्यावर फुंकरही नकोय आणि एक नवी सोबतही हवीय. मी बरोबर की चूक, मला माहीत नाही. मला स्वत:ला ते सिद्धही करायचं नाहीये. एव्हरीथिंग इज कॉम्पिलेकेटेड, नो. बट अॅज यू सेड, इट्स लाइफ. इट ऑल्वेज कम विथ सिंपल क्वेश्चन प्रोबॅबली हॅविंग मल्टिडायमेन्शनल आन्सर्स...! तू खूश आहेस ना..? असणारच. तुझ्याविषयी खात्री आहे. मिस यू डिअर... हॅपी व्हॅलेंटाइन्स डे..! लॉंग लिव्ह इन माय हार्ट..!!

- हिनाकौसर खान-पिंजार
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
vikas pandhare About
व्हॉट सो स्पेशल
0
0
Nayana Agalave About
निशब्द ....प्रेम या भावनेची अतिशय सुंदर मांडणी केली आहे ....
1
0
Deepa Pillay pushpkanthan About
Kharay janara nighun jato mokla hota mage rahilelyana matra sangrsha ektepana
1
0
किरण क्षीरसागर About
तू हे सारं वेगळ्या कोनातून मांडलंस. त्यामुळे ते भावतं. हे छान लिहिलं आहेस.
1
0
Indrayani Ghare About
Punha lagn karatana tine khulepanane sharirik garaj manya kelyacha dhadasi pana awadala. Tichya past la manat jag theun life la positively ghenari naika 👍👍👍
3
0
Indrayani Ghare About
Khupach chhan. Tyach sodun jan Aadhichya Romantic parshwabhumi var aankhinach chataka lavun jat manala.
3
0
प्रज्ञा केळकर About
हा लेख म्हणजे रोलर कोस्टर राईड आधी शांत, सौम्य, प्रेमाची अलवार जाणीव करून देणारं.. मग, अचानक खाली, वर उसळ्या, हेलकावे, धक्के... आणि पुन्हा सारं काही शांत, समुद्रच जणू.. पोटात वादळ घेतलेला आणि शांत, आणि अथांगही.. कमाल आहेस तू!
2
0

Select Language
Share Link