Next
शेअर बाजारात ‘बॉटम फिशिंग’ची वेळ
BOI
Sunday, February 18, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे सध्या बाजारात ‘बॉटम फिशिंग’ची वेळ आहे. निवडक आठ-दहा कंपन्यांचे शेअर्स घेतल्यास दिवाळीपर्यंत त्यात चांगली वाढ होईल. अशा काही शेअर्सबाबत जाणून घेऊ या आजच्या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ....
.........
गेल्या आठवड्यात पंजाब नॅशनल बँक व अन्य राष्ट्रीयकृत बँकांत रत्ने, हिरे व्यवहारात गीतांजली जेम्स व अन्य कंपन्यांमधून झालेल्या नीरव मोदी यांच्या ११ हजार कोटी रुपयांच्या अफरातफरीमुळे पुन्हा एकदा भांडवली बाजार ढवळून निघाला. हा घोटाळा २१ हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग व ‘ईडी’च्या धाडीमुळे दुकानांतून पाच हजार कोटी रुपयांचा माल हाती पडल्याने घोटाळ्याची रक्कम अंशतः कमी होईल; पण त्यामुळे शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी निर्देशांक २८६ अंकांनी घसरून ३४ हजार १० अंकांवर बंद झाला. ३६ हजार ४४३ या उच्चांकावरून तो २४०० अंकांनी उतरला आहे. निफ्टी २३ अंकांनी उतरून १०४५वर बंद झाला. त्याचा उच्चांक ११ हजार १७१ आहे. 

बाजारातील शेअर्सचे भाव अधूनमधून सकारण वा अकारण खाली येत असतात. या वेळेला या घोटाळ्याचे कारण मिळाले. सुदैवाने अन्य अनेक शेअर्सचे भाव उत्तम राहिल्याने पडझड आटोक्यात राहिली. पोलाद, गृहवित्त, नॉन बँकिंग, फायनान्स, रसायने या क्षेत्रातील कंपन्यांचे भाव स्थिर होते. ज्याला ‘बॉटम फिशिंग’ म्हणतात, ती वेळ आता आली आहे. आता आठ-दहा चांगल्या कंपन्याचे शेअर्स मोठ्या संख्येने घेऊन ठेवले, तर दिवाळीच्या वेळी उत्तम भाववाढ झालेली दिसेल.

दिवाण हाउसिंग फायनान्सची डिसेंबर २०१७ तिमाहीची विक्री चांगली झाली. नक्त नफाही ३०६ कोटी रुपयांपर्यंत वाढला. कंपनीने शेअरमागे दोन रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला होता. या कंपनीचा शेअर दिवाळीपर्यंत ७०० रुपयांवर जाईल. सध्या तो ५४० रुपयांच्या आसपास मिळत आहे. याच क्षेत्रातील ‘रेप्को हाउसिंग’ या कंपनीचा शेअरही ५५५ रुपयांच्या मागेपुढे आहे. तोही वाढून ७५० रुपयांपर्यंत जावा. अन्य कंपन्यांपैकी रेन इंडस्ट्रीज , स्टरलाइट टेक्नोलॉजी, विंध्या टेलिलिंक्सचे शेअर्सही घेण्यायोग्य आहेत. 

विंध्या टेलिलिंक्सचा शेअर आता ३११ रुपयांपर्यंत घसरला आहे. तो ३०० रुपयांपर्यंत आला, तर घेण्याजोगा ठरेल. शेअर बाजारात ज्याला गुंतवणूक करायची आहे, त्याने इकॉनॉमिक टाइम्स, फायनान्शियल एक्स्प्रेस अशा वृत्तपत्रांचे सखोल व सतत वाचन, मनन केले पाहिजे. आपली अंडी कावळीच्या घरट्यात उबवणाऱ्या कोकिळेप्रमाणे वागून चालणार नाही. ही वृत्तपत्रे/पाक्षिकांची किंमत गुंतवणुकीच्या मानाने नगण्य असते. पानपट्टीलासुद्धा यापेक्षा जास्त पैसे पडतात; तसेच हल्ली बालवर्गात पाल्याला शिक्षणासाठी घालतानाही मोठी फी द्यावी लागते. मग शेअर बाजारात तर नफाच मिळवायचा असल्याने माफक फी द्यायलाच हवी.

शेअर बाजाराचाही अन्य बाजाराप्रमाणे हंगाम (Season) असतो. त्याचे वेळापत्रक समजून घेऊन वागायला हवे. वसंत, वर्षा, ग्रीष्म, शरद, हेमंत व शिशिर असे वर्षात एकूण सहा ऋतू असतात. शेअर बाजारातही मे महिना ग्रीष्म ऋतूसारखा असतो. कंपन्यांचे मार्चअखेरचे आर्थिक वर्ष संपलेले असते. लाभांश जाहीर झालेला असतो व बाजारात मंदी असते. खरेदीसाठी हीच वेळ योग्य असते. विक्रीसाठीच्या संधी वर्षभर येत असतात. अल्पमुदतीच्या अशा संधी तिथे शोधत राहिल्या पाहिजेत.

- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search