Next
शेतीमध्येही ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’
BOI
Thursday, September 19, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’ तंत्रज्ञान शेती क्षेत्रातही उपयोगी ठरू शकते. त्यावर एक नजर ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...
..........
इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी तंत्रज्ञानात प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची ताकद आहे, याची प्रचीती आता येऊ लागली आहे. शेतीसारखा व्यवसायही त्याला अपवाद नाही. गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये अनेक तांत्रिक बदल घडले आहेत. जगाची लोकसंख्या सध्या सात अब्जाहून अधिक असून, सन २०५०पर्यंत ती १० अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या अफाट लोकसंख्येला अन्नपुरवठा करण्यासाठी कृषी उद्योगाला आयओटी स्वीकारण्यावाचून पर्याय नाही.

तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या बाबतीत भारतात शेती हे एक दुर्लक्षित क्षेत्र आहे. कृषी उत्पन्नांची वाढती मागणी, हवामानबदल, पर्यावरणाचा शेतीवर होणारा परिणाम या सगळ्या आव्हानांशी दोन हात करण्यासाठी ‘आयओटी’चा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे. 

शेतीतील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ‘आयओटी’चा वापर सुरू झाला, तर शेतकरी आणि शेतमजुरांचे कष्ट आणि वेळ यात बचत होईल आणि परिणामी नफा वाढण्यास हातभार लागेल.

‘आयओटी’मुळे शेतकऱ्यांना माहितीचा वापर करून अजून सक्षम बनवण्यात मदत होईल. या क्षेत्रात ‘स्मार्ट टेक्नॉलॉजी’चा अवलंब करण्यात सेन्सर, रोबोट्स, कंट्रोल सिस्टीम आणि स्वयंचलित वाहने आदी घटकांच्या वापराचा समावेश आहे. पर्यावरणाला अनुकूल अशी कीटकनाशके वापरण्यासाठीही ‘आयओटी’ मदत करू शकते. हवामानातील बदल, मातीची रचना आणि हवामान अंदाज यांसारख्या नैसर्गिक घटकांची नोंद घेण्यास, त्यांच्यातील बदल नेमकेपणाने टिपण्यात ‘आयओटी’ अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते. शेतीमध्ये ‘आयओटी’चा वापर वेगवेगळ्या प्रकारे कसा करता येईल, याची एक झलक पुढे दिली आहे. त्यातील काही गोष्टींचा अवलंब आत्ताही केला जाऊ लागला आहे.

- शेतातील वेगवेगळ्या यंत्रणा मोबाइल फोनचा वापर करून बसल्या जागी चालू-बंद करता येतील. त्यामुळे दूरवरच्या शेतात जाऊन पंप किंवा अन्य गोष्टी चालू-बंद करण्याचा वेळ खूप प्रमाणात वाचेल. 

- स्वयंचलित सिंचन यंत्रणा हा यातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होईल आणि सिंचन व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. जमिनीत ओलावा कमी-जास्त होईल, त्यानुसार शेतकऱ्याला मोबाइलवर मेसेज येईल, जेणेकरून तो योग्य तो निर्णय घेऊ शकेल.

- हवामानाचा अंदाज घेऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी हंगामात कोणते पीक घ्यावे, हे ठरविण्यास शेतकऱ्यांना ‘आयओटी’ची मदत होईल.

- मातीमधील सूक्ष्म अन्नद्रव्ये, पाणी आणि अन्य आवश्यक किंवा घातक घटकांचे प्रमाण ‘आयओटी’मुळे लवकर आणि योग्य प्रकारे नोंदवले जाऊ शकते. त्यानुसार नेमके खतव्यवस्थापन करता येऊ शकते.

- देशभरातील-जगभरातील शेतकरी, कृषी तज्ज्ञांशी माहितीची देवाणघेवाण करणे, अन्नधान्याच्या किमतींविषयीची माहिती मिळवणे, तसेच अन्य गोष्टींबद्दल चर्चा करणे ‘आयओटी’मुळे सोपे होऊ शकते.

- पिकावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होण्यासारखी स्थिती असल्यास किंवा प्रादुर्भाव अगदी थोड्या प्रमाणात झालेला असतानाच सेन्सरद्वारे त्याची माहिती शेतकऱ्याला कळू शकेल. त्यामुळे योग्य वेळी रोग-किडींचे नियंत्रण करता येईल आणि पुढील नुकसान टाळता येऊ शकेल. 

- ‘आयओटी’मुळे शेतीमधील प्रत्येक गोष्टीत, घटकात, कृतीत काटेकोरपणा (प्रिसिजन) येऊ शकेल. त्यामुळे सुलभता वाढून, नफाही वाढू शकेल. 

- आपल्या शेतीचे क्षेत्र, त्याचा प्रदेश, जमिनीचा प्रकार, हवामान, पाऊस-पाणी, उत्पादनाला असलेली मागणी, मागणीचा नेमका कालावधी याची जास्तीत जास्त योग्य माहिती ‘आयओटी’द्वारे शेतकऱ्यांना मिळू शकते. साहजिकच त्यामुळे योग्य ते पीक घेतले गेल्यामुळे नफा वाढू शकतो.

- बी-बियाणे आणण्यापासून उत्पादनला बाजारपेठेत योग्य भाव मिळवून देण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांत ‘आयओटी’चा शेती क्षेत्राला फायदाच होईल.

कृषी क्षेत्रात ‘आयओटी’च्या वापरात वाढ होण्यात येणारा मोठा अडथळा म्हणजे शेतकऱ्यांना त्याविषयी असलेली अपुरी माहिती आणि भिती. दुसरा अडथळा म्हणजे इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटीचा अभाव. त्यामुळे तंत्रज्ञान उपलब्ध असूनदेखील बऱ्याच ठिकाणी ते वापरता येत नाही. तसेच शेतीमध्ये एकच कोणताही एकच फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी लागू पडत नाही. पीक, जमीन, ठिकाण, पाण्याची उपलब्धता, हवामान अशा प्रत्येक घटकाप्रमाणे त्यात बदल होत असतो. त्यामुळे शेतीसाठी ‘आयओटी’चा विचार वेगळ्या प्रकारे करावा लागतो. 

‘आयओटी’चा वापर करून जागतिक पातळीवर शेती स्मार्ट व्हायला लागली आहे. भारतातही काही प्रमाणात त्याचा अवलंब सुरू झाला आहे. त्याचा मोठा प्रमाणावर वापर करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. 

- अनुष्का शेंबेकर
ई-मेल : anushka19@gmail. com

(लेखिका माहिती-तंत्रज्ञान विषयातील इंजिनीअर असून, पुण्यातील ऑलिफाँट सोल्युशन्स या कंपनीच्या संस्थापक सीईओ आहेत. माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांत त्या १२हून अधिक वर्षे कार्यरत असून, या क्षेत्रातील नवे ट्रेंड्स हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

(‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ हे सदर दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search