Next
अपरिचित आसमंताचा वेध घेणारा ‘किमया’ प्रयोग
BOI
Saturday, January 05, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘किमया - अपरिचित आसमंताचा वेध’ हे माधव आचवल यांनी लिहिलेले पुस्तक. आचवल हे वास्तुविशारद, चित्रकार, लेखक व समीक्षक होते. या पुस्तकाच्या अभिवाचनाचा ज्येष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे यांनी सादर केलेला प्रयोग मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी अलीकडेच पाहिला. वास्तुकलासौंदर्य संवेदनशील असलेल्या आचवलांचे मनोगत ‘किमया’ प्रयोगाच्या माध्यमातून वास्तू व कलाक्षेत्राशी संलग्न असलेल्या समंजस श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अतुल पेठेंनी समर्थपणे केले आहे, असे बुरांडे यांना वाटते. या प्रयोगाच्या अनुभवाबद्दल बुरांडे यांनी व्यक्त केलेले हे मनोगत...
......
माणूस आहे तिथे घर आले. प्रत्येक जण आपापल्या कल्पना व आवडीनुसार स्वत:चे घर बनवत असतो. घर आरेखन प्रक्रियेत घरधनी व रचनाकारचा सहभाग कला- संवेदनशीलतेला धरून असेल, तर त्या घराचा ‘बाज’ इतरांच्या घरांपेक्षा ‘हटके’ असतो! घर बनवताना घर बांधणीचे उत्तम ज्ञान असणे जितके आवश्यक असते, तितकेच ते स्वतःच्या जीवनशैलीशी अनुरूप बनवण्यासाठी कला-संवेदनशील दृष्टिकोन हवा असतो. तरच त्यातील ‘सर्जनशीलता’ इतरांना दिसून येते. अन्यथा, बहुतांश निर्जीव घरांचा उपयोग केवळ आडोसा देण्याइतपत मर्यादित असतो! जगप्रसिद्ध अमेरिकन वास्तुरचनाकार फ्रँक लॉइड राइटने आरेखित केलेल्या अनेक सर्जनशील वास्तुरचनांत वरील पैलू दिसून येतात! राइटने आरेखित केलेला ‘फॉलिंग वॉटर’ हा बंगला पर्यावरण जपण्याच्या सजग विचाराचे महत्त्व जाणून अमेरिकन सरकारने ‘राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू’ म्हणून घोषित केला आहे. ‘किमया’ प्रयोगासाठी भारतीय जीवनशैलीवर आधारित व कला-सौंदर्य संवेदनशील दृष्टिकोनातून अंतर्गत सजावटीने परिपूर्ण बनवलेले असे एक ‘हटके’ घर अलीकडेच पाहायला मिळाले. निमित्त होते, ‘किमया - अपरिचित आसमंताचा वेध’ या पुस्तकाच्या अभिवाचनाचा. या पुस्तकाचे लेखक माधव आचवल हे वास्तुविशारद, चित्रकार, लेखक व समीक्षक होते. या अभिवाचन प्रयोगाची संकल्पना ज्येष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे व प्रसिद्ध वास्तुविशारद अतुल चाफळकरांची आहे.

डिसेंबर महिन्यातील उबदार थंडीत ‘गुलाब व्ह्यू’ बंगल्यासमोरील बागेत गरम चहाचा आस्वाद घेत काही मंडळी बसली होती. मंद प्रकाशात बंगल्याच्या दर्शनी भागाचे निरीक्षण करत असताना एका व्यक्तीने पाणी व चहापात्र ठेवलेल्या दिशेने बोट दाखवून आमच्या आगमनाची दखल घेतली. बंगल्याच्या दर्शनी बागेला लागून असलेल्या एका बोळवजा जागेत रांगेत ठेवलेल्या चपला पाहून, तसेच पाहण्याची सवय नसलेल्या डोळ्यांना आश्चर्य वाटले. ‘चपला रांगेत ठेवाव्यात’ या फलकाप्रमाणे शहरात लावलेल्या फलकांवरील सूचनांचे अनुकरण झाले, तर मुंबईचे चित्र कसे दिसेल हा विचार मनात तरळून गेला. असो. शिस्तीच्या पहिल्या धड्याचे अनुकरण करून आम्ही आत गेलो. काही व्यक्ती उघड्या खोलीतून आत-बाहेर करत होत्या. बंगल्यातील दालनात व खोलीत निवडक वस्तू, आर्टिफॅक्ट्स, पुस्तकांचे संच, विविध प्रकारचे फर्निचर व पेंटिंग्ज यांनी जमीन व भिंतींना त्रिमितीय रूप आले होते. त्या त्रिमितीय दृश्य परिणामातून यजमानाची वैयक्तिक आवड व जीवनशैलीतून घराचा हटकेपणा जाणवला. अनोळखी श्रोत्यांचा दबका आवाज व परस्परांचे चेहरे आजमावणाऱ्या अव्यक्त नजरांचा अंदाज घेत आम्ही गच्ची नामक मोकळ्या व प्रसन्न जागेत प्रवेश केला.

कोणत्याही सार्वजनिक नाट्यगृहात लावलेली चिन्हे किंवा मार्गदर्शक अभ्यागतांना मार्ग दाखवण्याचे काम करतात. आमची अडचण समजून घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आम्ही स्वत:च ठरवले! रुढीबद्ध मार्गदर्शनाची वाट न पाहता आम्हीच पहिली रांग निश्चित केली. क्षणाक्षणाला गहिऱ्या होत जाणाऱ्या अंधाराला व उपस्थितांना धीम्या आवाजातील वाद्यसंगीत साथ करत होते. आमच्या समोरील फूटभर उंच बैठकीवर एक व्यक्ती आसनस्थ होऊ शकेल अशा आकाराची काळ्या रंगातील बैठक ठेवली होती. त्याशेजारी वाचन करताना सोयीनुसार वर-खाली करता येईल असा उंच आकारातील शोभिवंत दिवा व शैलीबद्ध अक्षरातील ‘किमया’ नाव असलेली पुस्तकसदृश काळ्या रंगातील लक्षवेधी फ्रेम ठेवली होती. एरव्ही यजमानाच्या कला-संवेदनशील मनातून बनवलेल्या राहत्या घरातील गच्चीवरील वातावरणात तात्पुरत्या प्रयोगासाठी उभ्या केलेल्या सजावटीत सर्जनशीलता काय असेल, तर बैठकीच्या मागे नैसर्गिक वेलीच्या साह्याने उभा केलेला मानवी उंचीचा व मानवी डोळ्यांत मावणारा मांडव! मांडवावरील काळ्या रंगातील प्लास्टिकचा अनैसर्गिक वापर वगळता इतर सर्व मानवनिर्मित घटक वाचनप्रयोगासाठी अनुकूल होते. ‘कृपया मोबाइल स्विच ऑफ ठेवावेत’ या आवाजाने मला विचारातून बाहेर काढले. अर्ध्या मिनिटात कार्यक्रम सुरू होईल असा निरोप देऊन ती व्यक्ती अंधाराचा हात धरून निघून गेली. थोडक्यात, परंपरागत नाट्यगृहात अनुभवास येणाऱ्या व आवश्यक असलेल्या सर्व घटकांचा वापर सांकेतिक होता. त्यात माइक टेस्टिंग, मंद आवाजातील घंटानाद व मोबाइल स्विच ऑफ करण्याची सूचना इत्यादींसारख्या रुढीबद्ध रिवाजातील वेगळेपणा जाणवला. अर्ध्या मिनिटाच्या आत दोन व्यक्ती माझ्या उजव्या बाजूला ठेवलेल्या काळसर रंगातील आडोशाला येवून बसल्याचे जाणवले. अंधाराचे अस्तित्व झटकून टाकणारा पिवळसर हलक्या रंगाचा झब्बा व पांढरा पायजमा परिधान केलेले अतुल पेठे मंचावर येऊन उभे राहिले. थोड्याच अवधीत हळुवारपणे अतुल पेठेंनी या गच्चीवर आपण एकटेच आहोत, अशी ‘किमया’ उपस्थितांच्या मनावर रुजवली!

प्रयोग सादर करताना अतुल पेठे

वाचनाची सुरुवात घर या संकल्पनेची व्याप्ती, इमारत व अवकाश म्हणजे काय या मानवी जीवनाशी संलग्न असलेल्या प्राथमिक घटकांना धरून झाली. त्यानंतर माधव आचवलांना अभिप्रेत असलेल्या स्थापत्य व मानवी जीवनाशी निगडित असलेले विविध पैलू उपस्थितांच्या मनावर अलगतपणे रेंगाळत राहतील याची दक्षता घेत पेठेंचं वाचन रसिकांच्या मनाची पकड घेत पुढे जात होते. प्रतिभावान लेखक शब्दांना अर्थरूप देतो, तर समृद्ध वास्तू कला-संवेदनशील वास्तुविशारद रेषांना अर्थपूर्ण बनवतो, हेच लेखक व वाचकाने सिद्ध केले आहे! प्रयोग संगीत, प्रकाशयोजना व कथेतील प्रसंगानुसार केलेली प्रॉपवरील वस्तूंची आदलाबदल श्रोत्यांना एका उंचीवर नेत होती.

प्रयोगाचा आस्वाद घेणारे श्रोते

अतुल पेठेंनी केलेले वाचन सुटसुटीत व स्पष्ट होते. त्यांच्याकडे असलेल्या अंगभूत साहित्यिक प्रतिभेमुळे उपस्थितांच्या मनाचा ताबा घेणे त्यांच्यासाठी अवघड नव्हते! या पार्श्वभूमीवर विशिष्ट वातावरणनिर्मितीसाठी काळसर रंगातील इमारतसदृश प्रॉप, त्यावर ठेवलेले समयोचित घटक उपस्थितांच्या कल्पनेतील वास्तू-सौंदर्यविषयक अंधार दूर करण्यास मदत करतात. माझ्या मते, खांडेकरांच्या बंगल्याची निवड व त्या जागेत झालेला छोटेखानी प्रयोग म्हणजे वास्तुकला-सौंदर्य नेमके कशात आहे, ते कसे अनुभवायचे, कसे जोपासायचे याचे प्रात्यक्षिक होते, असे म्हणायला हरकत नाही! प्रयोगातील प्रसंगानुसार बदलणारा देखावा (Kaleidoscope - कॅलिडोस्कोप) पाहून कला-सौंदर्याबाबतचे ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोचे वाक्य आठवले. तो म्हणतो - ‘सौंदर्याची आयडिया म्हणजे परिपूर्ण सौंदर्य. ते बुद्धीग्राह्य असते. इंद्रियगोचर सुंदर वस्तू या त्या परिपूर्ण सौंदर्याच्या प्रतिकृती असतात.’ याचा प्रत्यक्ष अनुभव या प्रयोगातून मिळाल्याचे जाणवले! 

वास्तविक पाहता निसर्गत:च सर्वांना सौंदर्यदृष्टी मिळत असते. हा प्रयोग अनुभवलेल्या प्रत्येकाचा अनुभव माझ्या अनुभवापेक्षा वेगळा असू शकतो. ज्याने त्याने कला-संवेदन जाणिवेतून तो तपासून पाहिला असावा, असे मला वाटते.

प्रत्येक दिवशी येणाऱ्या अंधाराचा शेवट सूर्यप्रकाशाने होतो, हा सृष्टीचा नियम आहे. सलग दीड तास प्रयोग पाहिल्यानंतर फक्त दोन गोष्टी ध्यानात राहतात. एक म्हणजे माधव आचवलांनी जपलेला संवेदनशील मनाचा कोपरा, तर दुसरी गोष्ट म्हणजे अतुल पेठेंचे सहज वाचन, प्रसंगानुसार बदलत जाणारा चेहरा, बैठकीतील बदल व दृक्-श्राव्य रचनेतून साकारलेले माधव आचवलांचे वास्तुविश्व उपस्थितांच्या संवेदनशील मनाला भिडणारे होते. सहज मनाला पटणारी वातावरणनिर्मिती करून आनंदी क्षण कसे वेचायचे किंवा जमेल तेवढ्या जागेत भातुकलीचा खेळ मांडून हे जीवनाचा आनंद घेणाऱ्या मुलांमध्ये दिसून येते हे आचवलांनी दिलेले उदाहरण पुरेसे आहे! लिओ टॉलस्टॉयच्या म्हणण्यानुसार ‘शब्दांमधून आपल्या भावना, रेषा, रंग, ध्वनी किंवा शब्दांद्वारे मांडण्याची कला म्हणजे त्याच्या बघण्या किंवा ऐकण्यातून अंतर्मनातील भाव जागृत करणे’ होय. वास्तुकला-स्थापत्याशास्त्रास ‘मदर ऑफ ऑल आर्टस्’ असे का म्हणतात त्याचा प्रत्यय येण्यास हा कला-प्रयोग पुरेसा आहे.

‘नाटकघर, पुणे’ आणि ‘जॉय गट, सोलापूर’ निर्मित ‘किमया’ प्रयोग साकारण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या चमूतील संगीत दिग्दर्शक नरेंद्र भिडे, प्रकाशयोजक राहुल लामखडे व संपर्क व्यवस्था प्रमुख अनिकेत दलाल या सर्वांचा सहभाग तेवढाच मोलाचा होता, असे वास्तुविशारद अमोल चाफळकरांनी प्रयोगाच्या समारोपावेळी सांगितले. चाफळकरांनी यजमान संजीव खांडेकर व वैशाली नारकर यांच्यासह स्वत: चीही ओळख करून दिली. अशा प्रकारचा वाचनप्रयोग वास्तुकला-स्थापत्यशास्त्राचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी झाले पाहिजेत, तरच वास्तुआरेखन किंवा वर्तमान आधुनिक शहराचे आराखडे बनवताना या विषयाकडे कसे पाहावे, हे विद्यार्थ्यांच्या ध्यानात येईल, असे ‘अॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चर’ महाविद्यालयाचे  प्राध्यापक, वास्तुविशारद आर्किटेक्ट श्रीपाद भालेराव यांनी सुचवले. 

वास्तुकलासौंदर्य संवेदनशील माधव आचवलांचे मनोगत ‘किमया’ प्रयोगाच्या माध्यमातून वास्तू व कलाक्षेत्राशी संलग्न असलेल्या समंजस श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अतुल पेठेंनी समर्थपणे केले आहे. या प्रयोगाविषयीचे मनोगत इतरांनाही सांगावेसे वाटले म्हणून हा प्रयत्न!

किमया चमूचे मनापासून अभिनंदन!

संपर्क : चंद्रशेखर बुरांडे – fifthwall123@gmail.com

(‘किमया’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या प्रयोगाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत. चंद्रशेखर बुरांडे यांचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. अतुल पेठे यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search