Next
पुण्यात साकारणार अनोखे ‘कलाग्राम’
स्मार्ट सिटी अंतर्गत कायमस्वरूपी प्रकल्प
BOI
Monday, March 04, 2019 | 11:58 AM
15 0 0
Share this story


पुणे : पारंपरिक कलांचे सादरीकरण, हस्तकलेच्या वस्तूंची खरेदी आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुणेकरांबरोबरच पुण्यात येणाऱ्या पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरेल असे अनोखे ‘कलाग्राम’ सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ साकारत आहे. हा कायमस्वरूपी प्रकल्प स्मार्ट सिटी अंतर्गत साकारण्यात येणार आहे. 


‘शहर, जिल्ह्यातील कलाकारांबरोबरच देशविदेशातील कलाकारांना कला सादर करण्यासाठी आणि विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पाचा आराखडा आरेखनकार शोभा भोपटकर यांनी केला असून, त्यासाठी दिल्लीतील प्रीतमपूर आणि जनकपुरी या दोन्ही ठिकाणच्या ‘दिल्ली हाट’ प्रकल्पांचा विशेष अभ्यास केला होता. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराच्या पटलावरील हा एक मानबिंदू ठरेल, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच या प्रकल्पाचे डिझाईन करण्यात आले आहे. येत्या दोन वर्षांत तो पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी ७५ लाख रुपये खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून, १ कोटी रुपये नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून, तर दोन कोटी रुपयांची तरतूद आपल्या विशेष आमदार निधीतून अशी सुमारे चार कोटी रुपयांची तरतूद या प्रकल्पासाठी केली आहे. उर्वरित तरतूद स्मार्ट सिटीच्या सहकार्याने होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहा वर्षे पाठपुरावा सुरू होता. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे,’ अशी माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली. 


नृत्य-संगीतासाठी ‘ओपन थिएटर’

‘‘कलाग्राम’मध्ये ग्रामीण भागातील आठवडी बाजारासारख्या रचनेत हस्तकला वस्तूंची दालने उभारली जाणार आहेत. या ठिकाणी कलाकृती खरेदी करता येतील; तसेच कारागिरांचे प्रत्यक्ष कामही पाहता येईल. नृत्य-संगीतासाठी ‘ओपन थिएटर’ असेल. विविध राज्यांमधील खाद्यपदार्थांची दालनेही या ठिकाणी असतील. कलांचा आनंद घेत आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत प्रियजनांबरोबर वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम सांस्कृतिक केंद्र असेल,’ असे मिसाळ यांनी सांगितले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link