Next
सनसेट पॉइंट : सुरों पे चलता हुआ अफसाना
BOI
Tuesday, February 05, 2019 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

गुलजार

‘सनसेट पॉइंट’, गुलजार नावाचा शब्दांचा जादूगार आणि विशाल नावाचा प्रतिभावान संगीतकार या बेमिसाल जोडीनं बनवलेला एक अद्भुत आविष्कार. ‘सुरों पे चलता हुआ अफसाना’ असं याचं उपशीर्षकही मोठं समर्पक आहे. गुलजार साहेबांनी बडी फुरसत और नजाकत से, ही जादुई सुरांच्या साथीनं तरंगणारी गोष्ट रचली आहे. ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘सनसेट पॉइंट’ या गुलजार यांच्या गाण्यांच्या अल्बमबद्दल..
...........................
‘कच्चे रंग उतर जाने दो..
मौसम है गुजर जाने दो..’
‘चित्रा’चे आर्त तरीही नरम, उबदार सूर आणि त्यासोबत येणारं विशाल भारद्वाजचं हळुवार संगीत कानावाटे मेंदूत झिरपतं आणि डोळ्यांसमोर थेट एक सुंदर संध्याकाळ उभी राहते. ही संध्याकाळ असते हिमाचल प्रदेशातल्या एका नदीकाठची. तलम, अलवार तरीही हुरहूर लावणारी.

एक युवती हिमाचलमधल्या एका छोट्याशा गावात दूर एका पुलाजवळ उभी आहे. नदीच्या प्रवाहाचा संथ, पण लयबद्ध आवाज येतोय. तालात. पाणी जितकी खळखळ करतंय, त्याहून जास्त चलबिचल युवतीच्या मनात होत आहे. प्रियकराबरोबर घालवलेल्या क्षणांच्या अनेक आठवणी तिच्या मनात फेर धरत आहेत. आठवणी तिच्या मनात येतात तशा त्या आपल्यालाही ऐकू येतात. तेवढ्यात एक गाडी मागून जाते. स्टिरियो, लेफ्ट टू राइट. कान सुखावतात आणि तेव्हाच ‘आ चल डूबके देखें’ सुरू होतं. ‘आ, चल डूबके देखें, एक दो चाँद से कूदे.’ वा! चाँद से कूदे – कवी कल्पनाही अफलातून गोष्ट आहे. पुढची ओळ, ‘आँखो की कश्ती में, रात बितायी जाये...’ किती गहिरे असतील ते डोळे. एखाद्या डोहासमान.‘झीलों के पानी पे, नींद बिछायी जाये!’ शब्दा-शब्दांत किती प्रतिभा डोकावते. याला म्हणतात देवाचं वरदान! देवदूत असतात ही अशी माणसं. वेगळ्याच जगातली. पृथ्वीवरच्या पामरांना उपकृत करण्यासाठी खास जन्म लाभलेली.

‘चल दरिया बांध ले पैरो से और सागर संगम जाये..’
‘चल संसत के रंग पेह्ने तन पे, बुद्धं शरणं गाए!’
अफलातून रचना. हा ‘संसत’चा फंडा कळलाच नव्हता कित्येक वर्षं. परवा कॅसेटचं लीफलेट नीट वाचलं, ऐकता ऐकता संसत.. ‘सन सेट’. भगवा. पवित्र रंग. मावळतीच्या सूर्याचा. या सगळ्या सगळ्याचा त्याग करू. संन्यास घेऊ!

काही ओळी मध्ये जातात... पुढच्या सुंदर ओळी..
‘अरे चल, जेबें भरले तारो से चल चल..’ अप्रतिम!
‘अरे चल.. मफलर पहन के बादल कें बारीश बरसाते चलें..’
काय अफलातून कल्पना आहे ही. कविता किती आत मुरलेली असावी एखाद्याच्या. किती सहजतेनं इतकी अवघड कल्पना लिहावी आणि तितक्याच सहजतेनं, ती ऐकणाऱ्याच्या कानांना आणि आत्म्याला सुखावत, आत खोल खोल झिरपावी! कमाल. अपार सुख आहे हे!

‘आ चल..’मध्ये चित्राबरोबर भूपिंदरचाही आवाज साथीला येतो. त्याचा एकदम वेगळा आवाज घेऊन. नॅसल, अस्पष्ट. तरी पहाडी पण मऊसूत असणारा. के. एस. चित्रा आणि भूपिंदर हे अगदीच वेगळं कॉम्बिनेशन विशालला कसं सुचलं असावं? आधी कधीही हे असं कॉम्बो झालं नव्हतं आणि कदाचित नंतरही होणार नाही. संगीतमय कथा. जोडीला गुलजार साहेबांचा कडक, घुमावदार आणि रेशीम ल्यालेला भुरळ घालणारा आवाज! कोहरा, आगोष, प्याली, पैगाम, वक्त, रिश्ता, दामन, टोरॉन्टो, परेड, सेकंद की सुई, आहट, दाग हे शब्द म्हणावेत ते गुलजार साहेबांनीच! सिगरेटचा धूर अनंत काळ मुरलेल्या त्यांच्या कंठातून, एक एक नुक्ता काय अस्खलित ऐकू येतो. एकदम वाजवून. कुठलाही संदेह न ठेवता. काय ते शब्द, काय ती रचना आणि काय ते उच्चार! आपण एरव्ही लिहितो, बोलतो ते सगळं हे असं ऐकून तुच्छ वाटायला लागतं. भाषेचं मार्दव, शब्दसौंदर्य आणि त्यातलं वेगळेपण जाणवून देणारं अभिवाचन करावं, ते अशा देवदूतांनीच!

विशाल भारद्वाजविशाल भारद्वाज. सत्या पाहिल्यापासून (खरं तर ऐकल्यापासून) या बाबाला फॉलो करायला सुरुवात केली. प्रचंड प्रतिभावान मनुष्य. जितका चांगला संगीतकार, तितकाच चांगला दिग्दर्शक. हृदय आणि मेंदू सिंक्रोनाइज्ड असलेला. गुलजार साहेबांची लेखणी असली, की विशाल अजूनच खुलतो. या दोघांनी हृदय ओतून बनवला असणार हा अल्बम. त्यावर चित्रा आणि भूपिंदरनं जबाबदारीनं गाऊन चार चाँद लावलेत! 

‘आसमानी रंग है..’ हे अतिशय हुरहूर लावणारं गाणं. संध्याकाळचा कुठला राग असावा. परफेक्ट फीलिंग पकडतं. हळवं करतं. कधी रडवतंही. ‘आ चल..’ने विमानात गेलेला मूड पुन्हा जमिनीवर घेऊन येऊ लागतो. त्यापुढचं ‘आरजू मेरी..’ही असंच. हुरहूर. अनिश्चितता दर्शवणारं. तीव्र आठवण जागी झालेल्या मनाची स्थिती दाखवणारं. यातली ऐकावी ती वीणा. नारायण मणीनं वाजवलेली. सुंदर, नजाकतदार काम. ‘साइड ए’ पाहता पाहता संपते.

कथेत आणि गाण्यात बुडालेलो आपण उत्सुकतेनं आणि अधीरतेनं बाजू बदलून ‘साइड बी’ लावतो. ‘पखिंया वे पखिंया’ सुरू होतं. पंजाबी गाणं. फारसं कळत नाही वाचल्याशिवाय. वाचलं तरीही काही शब्दांचं आकलन नीट होत नाही. तरीही ट्यूनमुळे अनेकदा ऐकावसं वाटतं. सुंदरसा ढोलक. आणि की-बोर्ड. ऱ्हिदम द्यायला काही स्थानिक वाद्यं. सुंदर गाणं. या गाण्याच्या शेवटी एक मोठा ट्विस्ट आहे. पण तात्पुरता सुखावणारा. नंतर पुढे घडतं ते वेगळंच. ताटातूट होते प्रेमी जीवांची. भूपिंदरच्या आवाजात दर्द ओतप्रोत भरलेलं एक, ‘तेरे जाने से तो कुछ बदला नही’ सुरू होतं. या गाण्यानंतरही एक मोठा ट्विस्ट. पण चांगला. अत्यंत सकारात्मक. मेंढपाळ येऊन युवतीला धीर देतो. येशूचा ओघाने आलेला संदर्भ, सगळंच जादूनं भारल्यासारखं आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण. लो फील करताना, आपण आपल्याला जेव्हा विसरलेलो असतो. सगळं संपलं आता, असं जेव्हा वाटत असतं, तेव्हा आपला पुनर्जन्म होत असतो. कधी आपोआप. तर कधी कुठल्या प्रसंगामुळे! रीबर्थ..!

के. एस. चित्रा‘जल भर दे..’, कमालीचं सुंदर गाणं. भूपिंदरच्याच आवाजात. प्रियकराच्याच आवाजात. तो आता कायमचा दूर गेला असला तरीही. आठवण सुटता सुटत नाही. त्याच्या आवाजातच सगळं ऐकायची सवय झालेली असते. तो आवाज म्हणजेच पूल असतो आठवणींचा. ‘इत्तदा’ और ‘इंतहा’ दोन अग्र. थोडं सावरतो आपण. नव्या पहाटेकडे चालू लागतो. इतकं काही बिघडलेलं नाही. समजावतो स्वतःलाच! कच्चे रंग – दुसरं वर्जन सुरू होतं.

एक लूप पूर्ण होतो. सर्कल ऑफ लाइफ. लाइफच्या आतली सर्कल्स. वेगवेगळे किस्से. आठवणी. काळाचे अगणित तुकडे. वर्तुळाच्या स्वरुपात. ठराविक अंतर जाऊन आपण परत तिथेच. किंचित अधांतरी.. पण पूर्वीपेक्षा सजग. सावध.
‘कच्चे रंग उतर जाने दो..
मौसम है गुजर जाने दो..’
पूर्वी वेगळ्या संदर्भात आणि आत्ता खूप वेगळ्या.. शब्द मात्र तेच. किती विचार केला असेल इतकी सुरेख गुंफण करताना. मनात अनेक वेळा पाया पडतो मी गुलजार नावाच्या व्यक्तिमत्वाच्या. ‘शीशमके पत्तो पे पानी, बूंद बूंद बजता रहता है..’ थोडं पुढे जाऊन, 
‘उडते हुए सुखे तिनको का. 
जोडना और पिरौना क्या. 
अंधे गुलों के शाखों पे, 
होना और न होना क्या..’
तीच हुरहूर, पण सोबत खंबीरपणा, वाढलेली समज. अनुभव, शहाणपण शिकवणारा. स्वर्गीय अल्बम. यातली गाणी, कविता, मधल्या सुंदर ओळी, गुलजार, चित्रा, भूपिंदरचे आवाज आणि विशालचं कर्णमधूर संगीत मनात कायमच वाजत राहील. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Neha About 161 Days ago
Superb
1
0
Disha Gaikwad About 161 Days ago
Very classy article 👌👌 Gulzar sir is great 👏👏👏👏
1
0
Prapurika joshi About 161 Days ago
Gulzaar ji, ...all naam,sher,shayari ,filmigeet are pleasure for us , classy article.
1
0
पद्मजा About 161 Days ago
सुंदर रसग्रहण
1
0

Select Language
Share Link
 
Search