Next
अलिबाग परिसराचा फेरफटका
BOI
Saturday, July 06, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

वरसोली बीच

‘करू या देशाटन’
सदराच्या मागील भागात आपण रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या उगमपासूनचा सह्याद्रीला लागून असलेला पाली परिसर पाहिला. आजच्या भागात पाहू या कुंडलिका नदी सागराला मिळते तेथून उत्तरेकडे असलेला पर्यटकांचा आवडता अलिबाग परिसर. 
.......
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. इतिहासाच्या पाऊलखुणा तर येथे जागोजागी आहेत. मुंबई व पुण्याहून साप्ताहिक सुट्टी घालविण्यासाठी येथे येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होते. जास्त पर्यटक मुंबईतील असल्याने येथे फिरताना मुंबईत असल्यासारखे वाटते. कारण मराठी असले तरी हिंदीतच बोलण्याची आणि इंग्रजीची स्टाइल व फॅशन करण्याची चढाओढ दिसते.

ज्यू (इस्रायली) प्रार्थनागृह, अलिबागअलिबाग : मजा करायची आहे, धमाल मस्ती करायची आहे? मग चला अलिबागला! भारताचे दिवंगत लष्करप्रमुख जनरल अरुण वैद्य, तत्त्वज्ञ नानासाहेब धर्माधिकारी, ‘जय मल्हार’फेम देवदत्त नागे, अभिनेत्री अश्विनी भावे, ‘सारेगमप लिटिल चॅम्प’मधील मुग्धा वैशंपायन हे सर्व अलिबागचेच. सन १९०४मध्ये स्थापन केलेली चुंबकीय वेधशाळा अलिबागमध्ये आहे. आता येथे अत्याधुनिक यंत्रणा असल्याने हवामानाचा अचूक अंदाज मिळतो. अलिबागमध्ये कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे. समाधी परिसर खूपच छान ठेवण्यात आला आहे. कान्होजी आंग्रे यांच्यामुळेच इंग्रजांना पश्चिम किनारपट्टीवर जम बसविता आला नाही. शेवटी इंग्रज बंगालच्या उपसागरातून कोलकाता येथे गेले व तेथून गंगा नदीच्या काठाने दिल्लीकडे पोहोचले. 

अलिबाग आणि त्याच्या शेजारच्या गावांमध्ये अनेक ज्यू (इस्रायली) लोक वस्ती करून होते. त्या वेळी इस्रायल अस्तित्वात नव्हते. इस्रायली आळी (गल्ली) नावाचा भागही अलिबागमध्ये आहे. या लोकांना बेने इस्रायली म्हणून ओळखले जायचे. त्यांचा प्रमुख व्यवसाय तेल गाळणे आणि विकणे हा होता. त्या वेळी तेथे बेने इस्रायली नावाचा श्रीमंत माणूस राहत असे. त्याच्या बागेत आंबा आणि नारळाचे अनेक वृक्ष होते. म्हणून स्थानिक लोक ‘अलीची बाग’ असे म्हणत व त्या वरूनच अलिबाग हे नाव रूढ झाले, असे म्हणतात. मॅजेन एवॉट सिनेगॉग (Magen Avot Synagogue) हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ येथे आहे व वारसा वास्तू म्हणून त्याची काळजी घेण्यात येते. व्हॉइसराय लॉर्ड कर्झन याने येथे भेट दिली होती. अलिबागच्या आसपास अनेक बीच आहेत व अलिबाग हे मध्यवर्ती असल्याने आणि दोन्ही बाजूला बीच असल्याने येथे गर्दी असतेच. 

हिराकोट : अलिबागच्या बसस्थानकापासून उत्तर पश्चिम कोपऱ्यात दोन किलोमीटर अंतरावर हिराकोट तलावाशेजारीच हा भुईकोट उभा आहे. कुलाबा किल्ल्याला संरक्षक म्हणून याची निर्मिती झाली होती. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हा भुईकोट किल्ला १७२०मध्ये बांधला. या किल्ल्यात कान्होजी आंग्रे यांचा खजिना असे. जेव्हा पहिले बाजीराव यांचे रावेरखेडी येथे निधन झाले, तेव्हा नानासाहेब (थोरल्या बाजीरावांचे चिरंजीव) हिराकोट येथे मुक्कामास होते. त्यानंतर ते पेशवाईची वस्त्रे आणण्यासाठी साताऱ्याला गेले. सन १८४३मध्ये आंग्रे यांनी किल्ला सोडल्यावर इंग्रजांनी त्याचे तुरुंगात रूपांतर केले. किल्ल्याचे क्षेत्र प्रतिबंधित असल्याने आपल्याला आत प्रवेश मिळत नाही व पोलिसांच्या परवानगीने फक्त बाहेरून बघता येतो. 

कुलाबा किल्ला

कुलाबा /सर्जेकोट किल्ला :
अलिबागच्या सागरकिनाऱ्यावर उभे राहिल्यावर समुद्रात एका प्रचंड खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही जलदुर्गजोडी दिसते. ती ३५० वर्षे सागराच्या लाटा अंगावर घेत उभी आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो, तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भुईकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून, पूर्व-पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे. शिवाजी महाराजांनी मोक्याच्या बेटांवर किल्ले बांधले व जुने बळकट केले. त्यापैकी कुलाबा किल्ला खूप महत्त्वाचा. कारण तो मुंबईच्या समोर आहे. इंग्रज व इतर पाश्चात्य आक्रमकांवर वचक ठेवण्यासाठी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिद्धीस आला. 

किल्ल्याचे प्रवेशद्वार उत्तर-पूर्व दिशेला किनाऱ्याच्या बाजूला आहे. हा दुर्ग बांधताना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली बघण्यास मिळतात. दुर्गाच्या दुसऱ्या दरवाज्याचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याला एकूण १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला पाच, पूर्वेला चार, उत्तरेला तीन व दक्षिणेला एक बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. 

किल्ल्यात प्रवेश करताच भवानी मातेचे मंदिर, पद्मावती देवी, गुलवती देवी यांची मंदिरे आहेत. डावीकडे पुढे गेल्यावर हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार यांचा दर्गा आहे. डावीकडे आंग्र्यांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर अजूनही लोकांचा राबता असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. गणेशमूर्तीची उंची दीड फूट आहे. १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असून, गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्करिणी आहे. पुष्करिणीच्या पुढे तटापलीकडच्या दरवाज्यातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची पायऱ्या असलेली विहीर आहे. 

दुर्गाच्या दक्षिण टोकाला असलेल्या दरवाज्याला धाकटा दरवाजा, यशवंत दरवाजा, दर्या दरवाजा अशी नावे आहेत. या दरवाज्यावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली दिसून येते. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे कान्होजींच्या काळात नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त केली जात असत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या दोन तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणाऱ्या कंपनीचे नाव कोरलेले आहे. डाउसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आयर्न वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड...  वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरून ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते. भरती-ओहोटीचे भान ठेवूनच किल्ल्यात जावे, नाही तर किल्ल्यावर अडकून पडावे लागेल. (कुलाबा किल्ल्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सर्जेकोट : कुलाबा किल्ल्याच्या उत्तरेस लागूनच सर्जेकोट आहे. मोठ्या भरतीच्या वेळी दोन्ही किल्ले वेगळे दिसतात. दोन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वी एक वाट होती. शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘किल्ल्यासमीप दुसरा डोंगर असू नये. असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा. यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते. अन्यथा शत्रू त्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो.’ आज्ञापत्रातील या आज्ञेनुसार संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याजवळील खडकावर सर्जेकोट किल्ला बांधला. किल्ल्यावर बुरुजाव्यतिरिक्त अन्य कोठलेही बांधकाम अस्तित्वात नाही. शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा हा एक साक्षीदार आहे. 

भरती - ओहोटीची गणिते : 
- तिथीला तीनने गुणायचं आणि चारने भागायचे. उदा. पौर्णिमा म्हणजे १५ गुणिले ३ = ४५. 
४५ भागिले ४ = ११.२५
म्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर सहा तासांनी पूर्ण ओहोटी

- भरती-ओहोटीच्या गणितात (तिथी) तीनने गुणून मिनिटे वाढवतात. नवमी असेल तर ९ गुणिले ३ भागिले ४ = ६.७५
यात सहा हा पूर्णांक तास धरायचा आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनिटे (एका तासाचा ०.७५ भाग म्हणजे ४५ मिनिटे)
तसेच ९ गुणिले ३ = २७ मिनिटे, एकूण मिनिटे : ४५+२७ = ७२ मिनिटे = १ तास १२ मिनिटे
यात आधीचे सहा मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनिटे) = ७ वाजून १२ मिनिटे ही भरतीची वेळ मिळाली. 

- तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते. उदा. पौर्णिमा - १५, १५+१=१६. १६ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ला पूर्ण भरती. नंतर सहा तासांनी पूर्ण ओहोटी. (भरती-ओहोटीची गणिते : साभार – ‘मायबोली’) 

अक्षी येथील सोमेश्वर महादेव मंदिर

अक्षी बीच :
हे मच्छिमारांचे गाव आहे. काही लोक शांतताप्रिय असतात आणि त्यांना सागरकिनारी आनंद घ्यायचा असतो. अशा लोकांसाठी अक्षी बीच हा एक पर्याय आहे. नारळाच्या झाडांच्या पार्श्वभूमीवरील सुंदर, शांत आणि स्वच्छ किनारा पाहणे ही एक सुखद गोष्ट आहे. अनेक सागरी पक्षी येथे पाहण्यास मिळतात. सीगल्स, बार-टेल्ड गॉडविट, डनलिन, टर्न्स आणि प्लेव्हर्स या किनाऱ्यावरील बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती येथे हंगामाप्रमाणे पाहता येतात. नागाव बीचकडे जातानाच अक्षी गाव लागते. अक्षी गावात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच उजव्या हाताला सोमेश्वर महादेव मंदिर आहे. कोकणातील इतर मंदिरांप्रमाणेच हे मंदिरसुद्धा कौलारू आहे. मंदिराचे सभागृह प्रशस्त असून प्रवेशद्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे. तसेच सभामंडपातील लाकडी खांबांवर बारीक कोरीवकाम केले आहे. 

अक्षी शिलालेख‘अक्षी’ गावाची ओळख इ. स. १०व्या शतकापासून आहे. येथे पहिला देवनागरी शिलालेख सापडला आहे. पुरातत्त्वज्ञ डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे तो मराठीतील पहिला शिलालेख आहे. त्यावर शके ९३४ म्हणजेच इ. स. १०१२ असा स्पष्ट उल्लेख आहे. शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे. हा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. त्या नऊ ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत. खाली शापवाणीचे चित्र कोरले आहे. अक्षी अलिबागपासून सुमारे पाच किलोमीटर दूर आहे. 

रेवदंडा : चौल आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. रेवदंडा या गावाला पाच किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. त्यात हे गाव सामावले आहे. रेवदंडा हे पौराणिक व ऐतिहासिक ठिकाण आहे. महाभारतात रेवतीक्षेत्र म्हणून ओळखले जायचे, असे सांगितले जाते. रेवती हे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाच्या पत्नीच्या नावावरून पडले असे सांगितले जाते. या गावाचे सागरी महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी येथे किल्ला बांधायचे ठरविले. त्यानुसार सन १५२८मध्ये पोर्तुगीज कप्तान सोज याने हा किल्ला बांधायला सुरुवात केली. त्याअगोदर १५१६मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी एक इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात. हिची तटबंदी १५२१ ते १५२४च्या दरम्यान बांधली गेली. 

रेवदंडा किल्ला

कुंडलिका नदीच्या खाडीच्या मुखावर ही अतिशय मोक्याची जागा पोर्तुगीजांनी काबीज केली. या ठिकाणापासून खाडीमार्गाने कोलाडपर्यंत जाता येत असल्याने संभाजी महाराजांच्या वेळी मराठ्यांनीही या ठिकाणी हल्ला केला होता; पण तो यशस्वी झाला आंही. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. या किल्ल्यावर पूर्वी पोर्तुगीज आरमाराचा रखवालदा नावाचा सात मजली मीनार होता त्यापैकी चार शिल्लक आहेत. 

रेवदंडा बीच

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या दिसून येतात. चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती शिल्लक आहेत. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पुढे तीन मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. किल्ल्याच्या तटाखालून भुयारे आहेत; पण सध्या ती बंद केली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच रेवदंडा बीच आहे. 

चौल रामेश्वर मंदिर

चौल :
चौल आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. या गावाचा इतिहास दोन हजार वर्षे जुना आहे. हे सातवाहन काळातील बंदर होते. या दोन्ही स्थळांची पौराणिक नावे चंपावती-रेवती! चंपक म्हणजे चाफा. चौल चंपावती म्हणून ओळखले जायचे. आजही येथे चाफ्याची झाडे दाखविली जातात; पण काहींच्या मते येथे चंपा नावाची मासे पकडण्याची जाळी वापरली जातात, म्हणून चंपा ही ओळख, तर काहींच्या मते चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले. या पौराणिक नावांशिवाय चेमूल, तिमूल, सिमूल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमूर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एवढी नावे असलेले हे कदाचित एकमात्र गाव असावे. चौल नारळी-पोफळीच्या झाडीत दडलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. अलीकडील इतिहासाप्रमाणे सन १५१६मध्ये अहमदनगरच्या राजा बुरहान याने पोर्तुगीजांना येथे एक कारखाना तयार करण्यास आणि बंदर बांधण्यास परवानगी दिली. येथे घोडे आयात करून ठेवले जात व त्यांचा व्यापारही होत असे. 

नागाव बीचपुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे चौलमध्ये वेगवेगळ्या भागांत उत्खनन करण्यात आले आणि यातून हे प्राचीन बंदर उजेडात आले. या उत्खननामध्ये त्या प्राचीन बंदराचे अवशेष, ‘जेटी’ची भिंत, सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, रिंगवेल (नळीची विहीर), सातवाहनकालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ ‘अम्फेरा’ आणि असे बरेच काही आढळून आले. चौलमध्ये जुने कोकणी पद्धतीचे रामेश्वर मंदिर आहे. नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करिणी येथे आहे. मूळ मंदिराची निर्मिती कधी, कोणी केली याची माहिती मिळत नाही; पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आढळतात. येथे एकवीरा भगवती देवीचे मंदिर असून, या मंदिराच्या गर्भागृहाच्या दरवाज्यावरील तुळईवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७६मध्ये (इसवी सन १७५२) केल्याचा एक संस्कृत लेख आहे. चौलचा अगदी प्राचीन उल्लेख ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्राइन सी’ या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रवासवर्णनात येतो. चौलसमोरच खदायीपलीकडे कोर्लईचा किल्ला आहे. येथून जंजिराही जवळ आहे. 

कसे जाल अलिबागला?
जवळचे रेल्वे स्टेशन वडखळ व पेण - ३० किलोमीटर. जवळचा विमानतळ मुंबई - १०० किलोमीटर. जवळचे बंदर मांडवा - २० किलोमीटर. अलिबाग येथे साधी ते पंचतारांकित हॉटेल्स उपलब्ध आहेत. वर्षभर केव्हाही जाता येते.


- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 84 Days ago
The Russian traveler Afanasy Nikitin landed at Revdanda in 1469 . Beyond Three Seas is the Eglish translation of his book . The high school in Revdanda has erected of this remarkable man .
1
0
जयश्री चारेकर About 104 Days ago
खूप छान माहिती. वाचताना सर्व आठवणी आठवल्या
1
0

Select Language
Share Link
 
Search