Next
सेरेंडिपिटी
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Tuesday, January 02 | 10:00 AM
15 1 0
Share this story

मानवी स्वभाव मोठा गमतीशीर. काहींच्या बाबतीत वर्षानुवर्षं दोघं एकमेकांसमोर असूनही प्रेम जुळत नाही, तर काही थोड्या भाग्यवानांच्या बाबतीत पहिल्याच भेटीत एक विलक्षण ‘कशीश’ दोघांना जवळ आणते, मनं जुळतात. प्रीत उमलते. ‘सेरेंडिपिटी’ ही फिल्म अशीच एका ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट’ची पण दैव, योगायोग आणि कार्मिक कनेक्शनच्या भोवती विणलेली आगळी प्रेमकहाणी. ‘सिनेसफरमध्ये आज पाहू या त्या फिल्मबद्दल...
........ 
‘सेरेंडिपिटी’ सिनेमाची सुरूवात होते ती ख्रिसमस सीझनच्या धामधुमीने. न्यूयॉर्कच्या सर्वच मॉल्समध्ये ग्राहकांची गर्दी लोटल्ये. मॉल्स मस्तपैकी सजलेत. दिव्यांचा लखलखाट. रोषणाई. ब्लूमिंगडेल्स डिपार्टमेंटल स्टोअरमधल्या कर्मचाऱ्यांची लगबग. एकजण नवीनच आलेले बॉक्सेस फोडून सामान स्टँडवर लावण्यासाठी सॉर्टींग करतेय. एका बॉक्समधून आलीय एक सुंदर काश्मिरी लोकरीच्या हँडग्लोव्ह्जची जोडी. ती ग्लोव्हस्टँडवर लावण्यासाठी नेली जाते. ख्रिसमस तोंडावर आलाय. त्यामुळे ब्लूमिंगडेल्समधेही ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडालीय. आणि अशाच धामधुमीत ती दोघं खरेदीला आली आहेत. जोनाथन ‘जॉन’ ट्रॅगर (जॉन क्युसॅक) आणि सेरा थॉमस (केट बॅकिंन्सेल) आपापलं आयुष्य जगतायत वेगवेगळ्या शहरांत! दोघांचेही पार्टनर्स ठरलेत; पण दोघांना कुठची कल्पना असायला, की नियतीच्या मनात काही वेगळेच प्लॅन्स आहेत दोघांसाठी. कदाचित त्यांचं आयुष्य बदलवणारे?

आपापल्या पार्टनरसाठी काय घ्यावं याचा विचार करत असतानाच दोघांची नजर एकाच वेळी त्या सुंदर काळ्याभोर लुसलुशीत कश्मीर हँडग्लोव्ह्जच्या जोडीवर जाते. दोघंही तिथे जातात आणि एकाच वेळी दोघांचे हात त्या ग्लोव्हजवर पडतात. त्यांची नजरानजर होते. मग नॅचरली दोघं एकमेकांना आउट ऑफ कर्टसी, ‘पहले आप, पहले आप’ करतात आणि तेवढ्यात तिसराच कुणी येऊन ते ग्लोव्ह्ज घेऊ पाहतो आणि मग मात्र दोघं मिळून त्याला कटवतात. आपणच एकमेकांचे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असल्याचं सांगत आणि काहीच्या बाही थापा मारत! हा सीन मजेशीर. जोनाथन सेराला ते ग्लोव्ह्ज घ्यायला लावतो. गप्पा मारत दोघं बाजूच्या ‘सेरेंडिपिटी’ पार्लरमध्ये आइस्क्रीम खायला जातात. बोलता बोलता, सेरा जॉनला त्या पार्लरचं ‘सेरेंडिपिटी’ हे नाव त्या शब्दाच्या ‘फॉर्च्युनेट अॅक्सिडेंट’ या अर्थामुळे आवडत असल्याचं सांगते. ती भाबडी आणि दैव, विधिलिखित यावर तिचा विश्वास. त्यावर जॉन पटकन उद्गारतो, ‘म्हणजे थोडक्यात ‘लकी डिस्कव्हरीच’, जशी तू आत्ताच मला त्या स्टोअरमध्ये भेटलीस तशी?’... आइस्क्रीम संपून दोघांची निघायची वेळ होते. जॉन तिच्याकडे सहजच फोन नंबर मागतो.

‘आपण एकमेकांना फोन नंबर देऊ या? जस्ट इन केस!’
‘जस्ट इन केस? कशाला?’
‘बघ ना किती छान वेळ गेला तुझ्यासोबत. पुन्हा भेट होईल न होईल.....म्हणून...’
‘हे बघ नशिबात असेल ना भेट होणं, तर नक्की होईल; पण आत्ता योग्य वेळ नाही ती!’
‘आणि हे बघ आपण नावं पण नाही सांगितली अजून. मी जोनाथन!’
‘मेरी ख्रिसमस जोनाथन’ ... 

एवढं बोलून ती एक गोड झप्पी देऊन निघतेसुद्धा कॅबमधून. या चुटपुट लावून गेलेल्या गोड मुलीच्या तशा वागण्याने निराश झालेला जॉन वैतागून निघतो घरी जायला; पण अंडरग्राउंडच्या जिन्याशी त्याला आठवतं आपण आपला स्कार्फ विसरलोय सेरेंडिपिटी पार्लरमध्ये. चरफडत तो पुन्हा चालत चालत तिथे जातो. बघतो तर तिथे, आपली विसरलेली बॅग न्यायला सेरा आलेली असते आणि त्याचा तिथे राहिलेला स्कार्फ हातात घेऊन विचारच करत असते. त्यांची पुन्हा योगायोगाने ही दुसरी भेट! तो जवळ आल्यावर ती त्याचा स्कार्फ त्याच्या गळ्यात घालते. तो तिला आपल्याबरोबर थोडा वेळ घालवण्याची विनंती करतो. बोलघेवडा जॉन तिला आवडलाय. कुठेतरी नकळत केमिस्ट्री जुळलीय त्या पहिल्याच भेटीत. ती चक्क हो म्हणते!

आइस स्केटिंग रिंक! दोघं गप्पा मारत स्केटिंग करतायत. हिवाळ्याची ती रम्य संध्याकाळ. आइस स्केटिंग रिंक रोषणाईने उजळून निघालीय. पार्श्वभूमीवर रोमँटिक म्युझिक सुरू आहे.

‘हां, तर तू अजूनही मला तुझा नाव सांगणार नाहीस तर. बरं मला सांग, तू मनापासून काय मिस करत्येस?’
‘माझी आई’
‘जर तुझी आई असतो तर मीही तुला मिस केलं असतं.’ (त्याच्या या वाक्यावर ती जराशी लाजते.)
आणि मग चक्कर मारता मारता दोघांची प्रश्नोत्तरं सुरू होतात. त्यातून एकमेकांच्या आवडीनिवडी... एकमेकाला जोखणं सुरू आहे जणू.
‘आवडता सिनेमा?’ ती विचारते.
‘कूल हँड ल्युक’
‘न्यूयॉर्कमधले अविस्मरणीय क्षण?’
‘हा जो जगतोय आत्ता, तो त्या यादीत टॉपला आहे!’
‘ओह...आय अॅम फ्लॅटर्ड’ (त्याच्या हलक्याश्या फ्लर्टींगने ती सुखावल्ये).

.... तेवढ्यात ती धडपडते आणि पडते. तिच्या हाताला खरचटलंय. तिचा हात हातात घेऊन जखम बघताना त्याचं लक्ष तिच्या हातावरच्या छोट्या ठिपक्यांकडे (फ्रेकल्स) जातं.
‘अगं, हे काही नुसते ठिपके नाहीत. नीट बघ ते कॅसिओपिया आहे.’
‘कॅसिओपिया?’
‘तुला नाही माहीत?’ असं म्हणत तो एक स्केचपेन मिळवून ते ठिपके जोडतो. इंग्लिश M आकाराच्या कॅसिओपिया (शर्मिष्ठा) नक्षत्राची आकृती तयार होते. तो तिला त्यामागची कथा ऐकवतो. एव्हाना न्यूयॉर्कच्या ख्रिसमस सिझनमध्ये हमखास असणारं भुरूभुरू बर्फ पडायला सुरुवात झालीय. तिच्या केसांवर बर्फाचे हलके कण जमा झालेत. तो अलगद आपल्या बोटानी ते कण उडवतो. दोघांमध्ये एक अत्यंत तरल हळुवार काहीतरी नातं उमलतंय!... तो वाकून हलकेच तिच्या हातावरच्या जखमेचं चुंबन घेतो. हळुवार जवळीक दोघांत!

दोघांची निघायची वेळ होते. ती कशी कुणास ठाऊक एका चिटोऱ्यावर आपलं नाव आणि फोन नंबर लिहायला तयार होते. त्याच्या पाठीवर तो चिटोरा ठेवून ती आपलं नाव आणि नंबर लिहिते. खरं तिचाच स्वतःवर विश्वास बसत नाहीये, की केवळ काही तासांपूर्वी भेटलेल्या एका अनोळखी तरुणाला आपण आपले डिटेल्स देतोय. ती तो चिटोरा त्याच्या हातात ठेवणार... तोच... बाजूने एक  भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकमुळे जोसाचा वारा येऊन तो चिटोरा उडतो आणि रस्त्यावरच्या शेकडो लहान लहान कागदाच्या कपट्यांमध्ये मिसळून जातो. तिच्या भाबड्या मनाला तो दैवाने दिलेला एक संकेत वाटतो. मागे फिरण्याचा! फार न गुंतण्याचा!! तो तिला पुन्हा नंबर आणि नाव परत लिहायची विनंती करतो; पण आता तिच्यातली ती एक भाबडी, भोळी, दैवावर, विधिलिखितावर विश्वास ठेवणारी मुलगी जागृत झालेली असते. आणि मग सुरू होते एक विलक्षण उत्कंठावर्धक क्षणांची मालिका...

ती आपल्या पर्समधून पाच डॉलरची एक नोट काढते आणि त्यावर त्याला त्याचं नाव आणि नंबर लिहून द्यायला सांगते आणि त्याने लिहून दिल्यावर त्या नोटेकडे न बघताच ती समोरच्या स्टोअरमधे जाऊन ती नोट त्या दुकानदाराला देऊन चुइंगगम विकत घेऊन तोंडात टाकते. जॉन वेडाच होतो. त्यावर तिचं म्हणणं, ‘जर का विधिलिखित असेल आणि असेल आपली भेट नशिबात पुन्हा, तर ती नोट कधी ना कधी पुन्हा माझ्या हातात येईलच.’ तो हैराण. तो तिला तिचा नंबर विचारतो, तर त्यावर ती एक पुस्तक काढून दाखवते आणि सांगते, ‘माझं  नाव आणि नंबर आतल्या पानावर लिहून ते पुस्तक मी उद्या सकाळी सेकंड हँड स्टोअरला देईन आणि तुला कधी जर ते मिळालं तर नशिबात आपली भेट असेल!’... यावर तो खूप काही बोलतो – ‘इतके छान भेटलो...इतका छान वेळ एकत्र काढला आणि आता अचानक हे सगळं नशिबावर का सोडायचं?’ वगैरे; पण ती तेवढ्यावरच थांबत नाही. त्याला घेऊन धावत ती समोरच्या बिल्डिंगमध्ये शिरते. एका लिफ्टमध्ये शिरते आणि त्याला समोरच्या लिफ्टच्या दारात उभं करते आणि सांगते, ‘तू आत शिरल्यावर एक दीर्घ श्वास घेऊन रँडमली कुठल्याही मजल्याचं बटन दाब. मीही जर तेच दाबलं असेल, तर आपली भेट होईल. त्याचा अर्थ आपली भेट हे विधिलिखित असेल!’... तो तिच्यावर वैतागत, आणि स्वतःशी चरफडत तेही करायला तयार होतो. ती समोरून त्याच्या हातात काश्मिरी हँडग्लोव्ह्जची बॅग टाकते (ज्याच्यात एकच ग्लोव्ह आहे. कारण दुसरा तिने स्वतःजवळ ठेवलाय) आणि लिफ्टचा दरवाजा बंद होताहोता आपलं नाव सांगते एकदाचं, ‘सेरा. सेरा आहे माझं नाव!’ आणि तिची लिफ्ट निघते. तिने दरम्यान २३व्या मजल्याचं बटन दाबलंय. तो समोरच्या लिफ्टमध्ये एक सेकंद दिङ्मूढ; पण भानावर येऊन ‘अडमतडम’ केल्यासारखं करून नेमकं २३व्या मजल्याचंच बटन दाबतो. आणि सुरू होतात काही उत्कंठावर्धक क्षण...

आपण प्रेक्षक आनंदात की २३व्या मजल्यावर त्यांची भेट होणार म्हणून; पण हाय दैवा!! लिफ्ट १४व्या मजल्यावर पोचल्यावर थांबते आणि सैतानाची वेशभूषा केलेलं एक अत्रंगी कार्ट आपल्या बापाबरोबर आत शिरतं. त्यांनाही वरतीच जायचंय; पण ते अवलक्षणी कार्ट आल्याआल्या आपले हात चालवून सर्वच्या सर्व बटणं धडाध्धड प्रेस करून मोकळं होतं. इकडे २३व्या मजल्यावर पोहोचलेल्या सेराला समोरच्या लिफ्टने जॉनने २३व्या मजल्यावरच उतरून पटकन बाहेर यावं असं वाटतंय; पण त्याची लिफ्ट स्टॉपिंग-अॅट-ऑल फ्लोअर्स करत सावकाश वरती येत्येय. सेराचाही धीर सुटत चाललाय. जॉन आधीच कुठल्यातरी खालच्या मजल्यावर उतरला असेल असं समजून काहीशा दु:खी मनःस्थितीत ती उठून समोरचीच दुसरी लिफ्ट पकडून खालती जायला निघते. तिच्या लिफ्टचं दार बंद होताहोता जॉनची लिफ्ट २३व्या मजल्यावर पोचते; पण सेरा दिसत नाही त्याला तिथे. अत्यंत निराश होऊन तोही पुन्हा ग्राउंड फ्लोअरला येतो. तेव्हा सेरा थोडक्यात वळून गर्दीत दिसेनाशी झालेली असते. जॉनचं नशीब त्याच्यावर रुसलेलं असतं. नियतीने एका सुंदर गोड मुलीला अल्पकाळ आयुष्यात आणून पुन्हा दूर नेलेलं असतं...

आता ती भेट होऊन काही काळ उलटलाय. हॅली ब्यूखॅनन (ब्रिजिट मॉयनाहॅन) या आपल्या पार्टनरबरोबर जॉन न्यूयॉर्कमध्ये, तर सेरा तिचा पार्टनर लार्स हॅमन्डसोबत (जॉन कॉर्बेट) लॉस एंजलीसमध्ये पुढचं लाइफ सुरू करण्याच्या मार्गावर आहेत. पार्टी संपवून घरी निघाल्यावर जॉनला रस्त्याने जाताना सेकंड हँड बुकस्टॉल दिसतो - नकळत त्याची पावलं तिकडे वळतात, सेराने नाव आणि नंबर लिहिलेलं पुस्तक आहे का बघायला... सेरा अजून पूर्णपणे गेली नाहीये त्याच्या मनातून! तर तिकडे लार्सने आणलेली एंगेजमेंट रिंग बोटात चढतच नाही हे पाहून दैववादी सेराच्या मनात शंकेची पाल चुकचुकून गेलेली!....

पुढचा दिवस उजाडलाय तो जॉनसाठी विचित्रच. त्याला वेगवेगळ्या तीन जणांकडून आधी गोल्फ क्लबमध्ये, नंतर सलूनमध्ये आणि नंतर टॅक्सीमध्ये ‘सेरा’ नाव कानांवर पडतं आणि तो हैराण. जणू निसर्गाने चंगच बांधलाय त्याच्या मनातून सेरा हे नाव आणि सेराची आठवण पुसू न देण्याचा! तो तडक त्याच्या जिवलग मित्राकडे डीनकडे (जेरेमी पिव्हेन) जाऊन त्याला हा विलक्षण योगायोग सांगतो. एकापाठोपाठ एक तिघांकडून सेराचंच नाव कानावर का पडावं? ‘तिला शोध’ असंच तर नियती नसेल सांगत? त्याच्या तोंडून ते ऐकताना डीन हैराण! तो त्याला म्हणतोदेखील, ‘भल्या गृहस्था तुझं लग्न ठरलंय, नव्हे तीन दिवसांवर आलंय आणि हे काय खूळ आता डोक्यात? तू आहे ते रिलेशन का धोक्यात घालतोयस कुठल्या त्या सेरा नावाच्या मृगजळामागे धावत?’ पण जॉन त्याला समजावतो, ‘हे बघ, हॅली म्हणजे गॉडफादर पार्ट २ आहे समज. जो बेस्टच आहे; पण तो किती चांगला किंवा कसा आहे हे समजण्यासाठी ओरिजिनल गॉडफादर बघावा ना?..तरच ठरवता येईल ना दुसरा किती चांगला आहे किंवा कसे?’ ..... बिचारा डीन नाईलाजाने जॉनला मदत करायला तयार होतो... पण कसे शोधणार ते नुसत्या सेरा नावावरून तिला अमेरिकेत?... आणि नियतीकडून एक संकेत मिळतो जॉनला. हॅलीने सांगितल्याप्रमाणे हनिमूनसाठी कपड्यांची आवराआवर करत असताना त्याला सेराने जाताजाता दिलेली ती ब्लूमिंगडेल्स स्टोअरची छोटी पिशवी आणि तो काळा हँडग्लोव्ह मिळतो आणि बरोबर त्या वेळची खरेदीची रिसीट!.... बस्स! तिथून जॉनची थरारक ‘सेरा शोध’मोहीम सुरू होते...

तिकडे लॉसएंजलिसमध्ये सेरालासुद्धा नियतीकडून एक संकेत मिळतो. आधीच लार्सने दिलेली रिंग बोटात जात नसते, त्यात त्याला त्यांच्या हनिमूनच्या डेट्स पोस्टपोन करायच्या असतात स्वतःच्या फ्लूट कॉन्सर्टसाठी! सेरा बिचारी त्यावर काहीच न बोलता तिथून निघते आणि पावसात एका ठिकाणी थांबते तर समोर ‘कुल हँड ल्युक’चं पोस्टर... जो जॉनचा आवडता सिनेमा म्हणून त्याने सांगितलेलं असतं. लार्सवर चिडलेल्या त्या मनःस्थितीत सेरासुद्धा हा नियतीचा संकेत मानून, लार्सशी लग्न करण्याआधी जॉनला शोधण्याचा एक शेवटचा प्रयत्न करायचं ठरवून तिच्या मैत्रिणीकडे, ईव्हकडे (मॉली शॅनन) जाते आणि न्यूयॉर्कला जाऊन जॉनला शोधण्यासाठी तिच्याकडे मदत मागते....

पुढे काय घडत जातं ते बघण्यात मझा येतो...

जॉन आणि सेरा - दोघांचंही आपापल्या पार्टनरबरोबर काही दिवसांवर येऊन ठेपलेलं लग्न... पण त्याआधी जॉनने डीनला घेऊन सेराचा पत्ता मिळवण्यासाठी ब्लूमिंगडेल्सपासून सुरुवात करून केलेला आटापिटा.... शेवटी एका अशक्य योगायोगाने त्याला सेराने नाव आणि फोन नंबर लिहिलेलं पुस्तक मिळतं आणि त्याद्वारे सेराचा पत्ता मिळवून त्याने सॅन फ्रान्सिस्कोला जाऊन घेतलेला तिचा शोध आणि कळलेलं निराशाजनक सत्य, ज्यामुळे खचून जाऊन त्याने थांबवलेला तिचा शोध..

आणि इकडे सेराने ईव्हला घेऊन न्यूयॉर्कमध्ये येऊन जॉनसाठी चालवलेली शोधमोहीम... लग्न ठरलेलं असूनही मी हे का करतेय ते ईव्हला सांगते तेही अशा शब्दांत -

‘I’ve just spent the entire flight staring into the sky, thinking. Not about my fiance, but about this mystery guy I met a million and a half hours ago. A guy I don’t even remember, except for this... vague picture I have inside my head. It was just a few seconds. A fragment, really. And it was like...in that moment,the whole universe existed just to bring us together. That’s why I’m here. That’s why I’m gonna let fate take me wherever it wants to go.  Because when all this is over,at least I’m never gonna have to think of him ever again...’

रस्त्यात खरेदी केलेल्या दोघींच्या ‘प्राडा मनीपर्स’ची अदलाबदल होते आणि परतीच्या प्रवासात विमानात बसल्यावर सेराला चक्क त्या पर्समध्ये ती पाच डॉलरची नोट मिळते, जीवर जोनाथनचं नाव आणि फोन नंबर असतो. मग काय? सेराची धावपळ. त्या नंबरच्या साह्याने ती जॉनच्या घरापर्यंत जाऊन पोहोचते. तिथे कळतं, की त्याचं लग्न थोड्याच वेळात होतंय वोल्डॉर्फ अस्टॉरीया हॉटेलमध्ये. नियतीने इतक्या जवळ आणून असं त्याला दूर करणं कसं शक्य आहे? मिळेल ती टॅक्सी पकडून जिवाच्या आकांताने सेरा धावत सुटते. हॉटेलच्या हॉलमध्ये पोहोचल्यावर तिला कळतं, की का कुणास ठाऊक पण जॉनने लग्न मोडलं. त्यामुळे समारंभ झालाच नाही तिथे.... सेराच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू... आनंदाचे ...आणि एका होऊ शकत असणाऱ्या मिलनाच्या शक्यतेचे?!!! म्हणजे?.... दैवाला त्यांचं एकत्र असणंच मान्य आहे तर!!!.... काही वर्षांपूर्वी त्या अनोळखी तरुणाला नियतीने समोर आणून उभं केलं होतं, त्यामागे काही विवक्षित प्लॅन होता तर नियतीचा?...

... इकडे जॉनने लग्न मोडून सेराचा शोध घेण्याच्या निर्णयावर डीनने चक्क एक लंबचौडं पत्र लिहिलंय, जे तो जॉनच्या हातात ठेवतो आणि त्याचा निरोप घेतो. पत्रात त्याने लिहिलंय -

‘life is not merely a series of meaningless accidents or coincidences. But rather it’s a tapestry of events... that culminate in an exquisite, sublime plan..... to live life in harmony with the universe, we must all possess a powerful faith in what we refer to as destiny. Destiny!!’

पत्र वाचून संपतं, तेव्हा जॉन त्याच स्केटिंग रिंकशी पोचलाय जिथे तो सेराबरोबर आला होता. थोडा वेळ तिथे घालवावा वाटून तो तिथे जातो आणि तिथल्या बर्फावर आडवा होतो. त्याच्या हातात तिने दिलेला काळा हँडग्लोव्ह आहे. संध्याकाळची वेळ. पुन्हा भुरूभुरू बर्फ पडायला सुरुवात झाली आहे. मिचमिचल्या डोळ्यांनी तो आकाशातून होणाऱ्या त्या बर्फवृष्टीकडे पाहत असतानाच वरून एक काळ हँडग्लोव्ह सरसरत त्याच्या दिशेने येताना दिसतो. तो दचकून उठून बसतो. बाजूला बघतो तर त्याचा ग्लोव्ह तिथे असतो. मग हा दुसरा कसा आला इथे?... म्हणजे सेरा?... सेरा आलीय इथे?... माझी सेरा?.... मला शोधत?.... तो  उभा राहून वळून बघतो... होय! त्याची सेरा... नियतीने जिच्याशी गाठ बांधून दिलीय तीच सेरा तिथे उभी असते.... आनंदाने तिच्याही डोळ्यांतून अश्रू पाझरतायत... तिचा सोलमेट भेटलाच तिला अखेर!! 

पुढच्या दृश्यात दोघं ब्लूमिंगडेल्स स्टोअरमध्ये आपल्या पुनर्भेटीची अॅनिव्हर्सरी साजरी करतायत आणि..... दी एंड!

खूप भावतो हा सिनेमा. नियती.... सोलमेट्स... कार्मिक देणं असलं, की भेटी होतातच हे सांगणारा! पीटर चेल्समचं दिग्दर्शन आणि जॉन क्युसॅक केट बेकिंन्सेलची गोड पेअर असणारी ही लव्ह स्टोरी! दोघांनी... विशेषतः केट बेकिन्सेलने केलेला उत्कट अभिनय! जरूर बघाच! 

(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’मधील सर्व लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध आहेत. पुढच्या मंगळवारपासून पाहू या वेगवेगळ्या जॉनरच्या ‘मस्ट सी’ अशा दहा सिनेमांबद्दल...)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link