Next
संपन्नतेच्या शोधातील अस्मितेची धडपड
BOI
Monday, September 03, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

जगातील अन्य भागांतील लोकांप्रमाणेच तैवानने संपन्नतेकडे जाण्याचा मार्ग इंग्रजीच्या माध्यमातून मिळवायचे ठरविलेले दिसत आहे. तैवानच्या अस्तित्वासाठी जी चिनी भाषा अत्यंत कळीची, त्या भाषेचा बळी देऊन इंग्रजीला जवळ करण्याचे मनसुबे तैवानने रचलेले आहेत. स्वभाषेवर प्रेम करणाऱ्या तैवानी लोकांना हे निश्चितच आवडलेले नाही. तैवान पुढील वर्षापासून इंग्रजीला अधिकृत भाषेचा दर्जा देणार आहे. त्या अनुषंगाने तेथील भाषेबद्दलची चर्चा करणारा हा लेख...
.........
चीन नावाच्या अक्राळविक्राळ ड्रॅगनच्या मुसंडीमुळे जगभरातील समुदाय भयभीत झाले आहेत. त्याच्या या मुसंडीमुळे त्याची भाषाही चोहोकडे पसरत आहे. पाकिस्तानपासून अफ्रिकेपर्यंत आणि कोरियापासून अमेरिकेपर्यंतचे देश चिनी भाषा शिकत आहेत. अशा परिस्थितीत चीनच्या शेजारीच असलेले त्याचे भावंड (त्याला असे म्हटलेले आवडले नाही तरीही) मात्र काहीसे खितपत पडले आहे. आपला वाटा पुरेसा मिळत नाही, असे या देशाला वाटते अन् त्यात तथ्यही आहे.

आपली ही खंत दूर करण्याचा एक मार्ग या देशाने निवडला आहे आणि तो म्हणजे संपन्नता. आता ही संपन्नता कशी मिळवायची, तर जगातील अन्य भागांतील लोकांप्रमाणेच तैवानने संपन्नतेकडे जाण्याचा मार्ग इंग्रजीच्या माध्यमातून मिळवायचे ठरविलेले दिसत आहे. तैवानच्या अस्तित्वासाठी जी चिनी भाषा अत्यंत कळीची, त्या भाषेचा बळी देऊन इंग्रजीला जवळ करण्याचे मनसुबे तैवानने रचलेले आहेत. स्वभाषेवर प्रेम करणाऱ्या तैवानी लोकांना हे निश्चितच आवडलेले नाही.

तैवान पुढील वर्षापासून इंग्रजीला अधिकृत भाषेचा दर्जा देणार आहे, असे देशाचे पंतप्रधान विल्यम लाई यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले. देशाच्या शिक्षण मंत्रालयात गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. त्यावर आता निर्णय झालेला दिसत आहे. पुढील महिन्यात शिक्षण मंत्रालय या संबंधातील शिफारशी असलेला अधिकृत अहवाल लाई यांना सादर करणार आहे.

यामुळे तैवानी लोकांचे इंग्रजी भाषेतील प्रावीण्य सुधारण्यास मदत होईल, तसेच त्यांना परदेशात अधिकाधिक संधी मिळविता येतील, असे लाई यांनी एका मुलाखतीत सांगितले. तैवानला रिपब्लिक ऑफ चायना या अधिकृत नावाने ओळखण्यात येते. या पावलामुळे हा देश यापुढे ‘द्वैभाषिक देश’ म्हणून ओळखला जाईल, असे ते म्हणाले. ही एक आगळी क्रांतीच होय.  

तैवान आणि चिनी भाषा हे एक वेगळेच अद्वैत आहे. त्याचा इतिहास थोडक्यात असा - चँग कै शेक याच्या नेतृत्वाखाली कुओमिंटांग पक्षाने १९११मध्ये चीनमध्ये उठाव केला. चीनची सत्ता हस्तगत केल्यानंतर त्यांनी देशासाठी एकच प्रमाणभाषा लागू करण्याचा निर्धार केला. जगात चिनी भाषा बोलणाऱ्यांची संख्या भलेही सर्वांत जास्त असेल. परंतु चिनी ही काही स्वतंत्र भाषा नाही. तो अनेक भाषांचा एक समूह आहे. ते सर्व सिनो-तिबेटी भाषा कुटुंबाचे घटक आहेत. चिनी भाषा बोलणारे बहुतेक लोक चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि तैवानमध्ये राहतात. मंडारीन ही चीनची अधिकृत भाषा आहे. चीनमधील विविध प्रांतांत अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. एका प्रांतातील लोकांची भाषा दुसऱ्या प्रांतातील लोकांना कळेलच असे नाही; मात्र याला उतारा म्हणून की काय, त्यांची लिपी समान होती. हांगझू, नानजिंग यांसारख्या अनेक प्रांतातील बोलीभाषा काही काही काळापुरत्या अधिकृत भाषा म्हणून नेमल्या गेल्या.

चिनी लिपी चित्रात्मक असल्यामुळे एका प्रांतातील लोकांना दुसऱ्या प्रांतातील भाषा वाचण्यास कष्ट पडत नाहीत. आपल्याकडील गुजराती आणि देवनागरी लिपी जशा अगदी एकसारख्या आहेत, तसाच प्रकार तिकडे आहे. कुओमिंटांगने चीनमध्ये सत्तेवर आल्यानंतर बीजिंगमध्ये प्रचलित असलेली मंडारीन हीच भाषा देशाची राष्ट्रीय भाषा म्हणून स्वीकारली. तिला नाव दिले ग्यूयू. अन्य प्रांतांतील भाषांतील काही शब्द व व्याकरणाचे नियम या भाषेला लागू करण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र हे काम अगदीच अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर तो नाद सोडण्यात आला.

१९४८ मध्ये माओच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाने कुओमिंटांगला मुख्य चीनमधून हाकलून लावले. त्यानंतर त्या पक्षाच्या मंडळींनी तैवानमध्ये बस्तान बसविले; मात्र भाषाविषयक धोरण आधीचेच पुढे चालविण्यात आले. माओच्या सांस्कृतिक सैन्याने हाकलून लावलेल्या चिनी राष्ट्रवादी मंडळींनी साठ वर्षांपूर्वी तैवानमध्ये प्रवेश घेतला आणि तैवानी लोकांच्या अक्षरशः मुस्कटदाबीला सुरुवात झाली. तैवानच्या विद्यार्थ्यांवर चिनी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आली आणि तेथील बालकांना मग स्वतःच्या देशात नसलेल्या शब्दांचे उच्चार करताना नाकी नऊ येऊ लागले. आजतागायत ही परिस्थिती कायम आहे.

तैवानी बोलींमध्ये नसलेले उच्चार या विद्यार्थ्यांना करण्यास सांगण्यात येते. ते ज्यांना जमत नाही, त्यांच्यावर अडाणी असल्याचा शिक्का मारण्यात येतो. त्यामुळे तैवानी लोकांची स्वभाषेतील अभिव्यक्ती प्राथमिक, फार फार तर माध्यमिक शाळेपर्यंतच मर्यादित असते. अधिक उच्च संकल्पना जणू लोपून गेल्या आहेत.  

तैवानमधील लाखो लोकांना मंडारीन ही भाषा शिकविण्यात आली. त्यामुळे त्यांना चीनमधील नागरिकांसोबत संवाद साधणे शक्य होत असले, त्यातूनच आर्थिक लाभ होत असला, तरी त्याचा सांस्कृतिक फटका त्यांना बसला आहे. यातील बहुतांश लोक फुजियानिज ही बोलीभाषा बोलतात. तीस वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या निर्वासितांनी ती आणली आणि आता तीच तैवानी भाषा म्हणून ओळखली जाते.

बेटावरील आणखी लाखो लोक हक्का ही चीनमधील आणखी एक बोली बोलतात किंवा चिनी भाषेशी काडीचाही संबंध नसलेल्या बोली बोलतात. तैवान बेटावरील लोकांना समन्वयाची भाषा म्हणून, त्यांना एकत्र करण्यासाठी म्हणून मंडारीन त्यांच्यावर लादण्यात आली.  

चिनी राष्ट्रवादी मंडळींनी १९४५मध्ये तैवानचा ताबा घेण्यापूर्वी जपानने तेथे ५० वर्षे राज्य केले होते. चँग कै शेक यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ताबा घेताच तैवानमध्ये जपानी भाषेच्या वापरावर बंदी घालण्यात आली. आता मंडारीन हीच त्यांना जोडणारी भाषा झाली आहे. चीनमधील मंडारीनपेक्षा ती खूप वेगळी आहे. (चीनमधील प्रमाण मंडारीनची घडवणूकच देशाची एक भाषा म्हणून करण्यात आली आहे. चिनी सरकारने या भाषेला पोतुंग्वा म्हणजे सामान्य भाषा असे नाव दिले आहे.) त्यामुळे चीनच्या तुलनेत तैवानी लोकांची तीच स्वतःची ओळख बनली आहे.

तैवानमध्ये भाषेचा हा मुद्दा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील होता. कुओमिंटांगने १९४९ ते १९८७पर्यंत प्रमाण मंडारीनची सक्ती करतानाच, अन्य प्रादेशिक भाषांची गळचेपी केली. या भाषांच्या वापरावर एकतर निर्बंध आणण्यात आले अथवा त्यावर बंदीच घालण्यात आली. १९९०च्या दशकात तैवानमधील राजकीय वातावरण मोकळे झाल्यानंतर याचा वचपा काढण्यात येऊ लागला. चेन शुई-बियान यांच्या कार्यकाळात, विविध प्रादेशिक भाषांना परत थारा देण्यात आला. या भाषांसाठी पाठ्यपुस्तके घडविण्यात आली. शुई-बियान स्वतःच्या तैवानी मिन्नानमध्ये भाषणे करीत असत. माजी अध्यक्ष ली तेंग-हुई हेही खुलेपणाने याच भाषेत बोलतात.

या चिमुकल्या बेटावर तैवानीज होक्कीन, हक्का आणि अन्य अनेक भाषा बोलल्या जातात. गेल्या वर्षी तैवानने स्वदेशी भाषा विकास कायदा मंजूर केला. या अंतर्गत देशी भाषांना राष्ट्रीय भाषांचा दर्जा देण्यात आला. आता लाई यांच्या योजनेमुळे इंग्रजी ही देशाची दुसरी अधिकृत भाषा बनू शकेल. तसा इंग्रजी प्रावीण्य निर्देशांकात तैवानचा क्रमांक अत्यंत खालचा म्हणजे ८०पैकी ४०वा लागतो.

तैवानचे पंतप्रधान  विल्यम लाई...मात्र लाई यांच्या या योजनेचा रस्ता तसा विना अडथळा नाही. भाषाप्रेमींनी त्यावर टीका केलीच आहे. ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता महत्त्वाची आहे. परंतु एखादी व्यक्ती आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी मूळ ओळख, संस्कृती आणि वारसा हेदेखील आवश्यक आहेत. खासकरून केवळ काही दशकांपूर्वी सांस्कृतिक साम्राज्यवादाच्या आणि हुकूमशाही शासनाच्या बंधनातून मुक्त झालेल्या देशासाठी,’ असे तैपेई टाइम्स या वृत्तपत्राच्या संपादकीय लेखात म्हटले आहे. हे वृत्तपत्रही इंग्रजी आहे, हे जास्त महत्त्वाचे!

थोडक्यात म्हणजे तैवानची अवस्था ‘एक तरफ उसका घर, एक तरफ मयकदा’ अशी झाली आहे. ज्या देशाने आपल्या बलाढ्य शेजाऱ्याची (त्याला पितृदेश म्हणा का आणखी काही) दादागिरी सहन करूनही ७० वर्षे आपली अस्मिता जपली, आज तोच देश ‘अर्थस्य पुरुषो दासः’ या उक्तीला जागत आहे. त्याच्या अस्मितेची धडपड किती फलदायी ठरते, यावर मंडारीनचे भवितव्य ठरणार आहे.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search