Next
आकाशकंदील उडविण्याची परंपरा असलेली दिवाळी
BOI
Thursday, November 08, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this article:कलमठ (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील कोष्टी समाजबांधवांनी आकाशकंदील उडविण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आजही जपली आहे. या आगळ्यावेगळ्या दिवाळीबद्दल लिहीत आहेत तुषार हजारे...
.........
काळ बदलतो, नवे नवे प्रश्न निर्माण होतात. जुन्या परंपरा नाहीशा होतात. आधुनिकता सामोरी येत असली, तरी कलमठ (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील कोष्टी समाजबांधव वर्षानुवर्षे असलेली आपली संस्कृती आणि परंपरा जपत दिवाळी सण साजरा करतात. दिवाळी सणाच्या निमित्ताने समाजातील एकोप्याचे दर्शन घडते. आकाशकंदील उडविण्याची वर्षानुवर्षे असलेली परंपरा आजही हे समाजबांधव जोपासताना दिसत आहेत. त्यामुळे ही दिवाळी इतरांपेक्षा आगळीवेगळी ठरते. 

सणांचा राजा, आनंद, चैतन्य, उत्साहाचा सोहळा म्हणजे दिवाळी सण! उजेडाची उधळण... अंधःकार भेदून प्रकाशवाटा दाखवणारा सण आणि सर्वांनाचा हवाहवासा वाटणारा सण म्हणजे दिवाळी. अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त करणारा सण म्हणजे दिवाळी. 

कौटुंबिक आनंदाबरोबर माणसाच्या मनातील शुभशक्तींना सामुदायिकरीत्या प्रकाशित करण्याचा हा खूप अर्थपूर्ण सण आहे. दिवाळी सण साजरा करण्याची प्रत्येक समाजात काही ना काही वेगळी परंपरा आहे. कलमठातील कोष्टी समाजाची वेगळी परंपरा म्हणजे सणाच्या दिवसांत आकाशकंदील उडविण्याची. या सणाच्या दिवसांमध्ये समाजातील प्रत्येकाच्या घरासमोर आकाशकंदील, पणत्या लावल्या जातात. अंगणात फटक्यांची आतषबाजी केली जाते; पण आकाशकंदील उडविणे हे दिवाळीचे खास आकर्षण असते. त्यामुळे कोष्टी समाजातील दिवाळी आगळीवेगळी ठरते. 

दिवाळी सणाची चाहूल लागताच घरोघरी महिलांची फराळ तयार करण्याची लगबग सुरू होते. विशेष म्हणजे करंज्या व फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी महिला एकमेकांच्या घरी जाऊन मदत करतात. महिलांच्या या कृतीतून समाजातील प्रत्येक कुटुंबाचे एकमेकांशी संबंध आजही जोडलेले असल्याचे दिसून येते. नरकचतुर्दशीच्या दिवशी समाजातील आबालवृद्ध एकत्र येऊन नरकासुराची प्रतिमा तयार करतात. त्यानंतर नरकासुराच्या प्रतिमेची धिंड काढून मध्यरात्री व पहाटे त्या प्रतिमेचे दहन केले जाते. 

पहाटे प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती अभ्यंगस्नान करून घराच्या राजांगणातील तुळशीवृंदावनासमोर कारीट फोडल्यानंतर प्रत्येक जण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर समाजबांधव एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद घेतात. या परंपरेत आता काळानुरूप बदल झालेला असून, समाजातील प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्ध, महिला विठ्ठल मंदिरात एकत्र येऊन फराळाचा आस्वाद घेतात आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. हा क्षण अविस्मरणीय असतो. 

लक्ष्मीपूजनादिवशी प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीचे पूजन केले जाते. समाजातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांकडे जाऊन लक्ष्मीचे दर्शन घेते. बलिप्रतिपदा, भाऊबीजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवसांमध्ये आकाशकंदील बनवून ते उडविणे ही कोष्टी समाजातील पूर्वापार परंपरा आहे. ती आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जाते.

आकाशकंदील उडविणे हा सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतो. एखादे यान आकाशात सोडले जाते, त्याचप्रमाणे आकाशकंदील आकाशात सोडला जातो. हा कंदील बनविण्याची पद्धतही आगळीवेगळी आहे. कंदील बनविण्यासाठी खास करून कागदी पोलींचा (रंगीत कागद) वापर केला जातो. साधारणपणे तीन, पाच, सात, नऊ, बारा डझन पोलींचा वापर करून ठराविक उंची व घेर ठरवून गोल तयार केला जातो. या गोलाला रॉकेटचे स्वरूप दिले जाते. गोलाच्या खाली आटा बांधला जातो. हा आटा बांबूच्या काठीपासून तयार केला जातो. तार बांधून तो आटा आकाशकंदिलाच्या तळाशी लावला जातो. तत्पूर्वी सुती कपड्यांच्या चिंध्या काही तास रॉकेलमध्ये भिजवून ठेवल्या जातात. हा आकाशकंदील तयार करण्यासाठी आबालवृद्धांसह महिलादेखील हातभार लावतात. 

हा तयार केलेला आकशकंदील रात्री उडविण्याची तयारी केली जाते. रॉकेलमध्ये भिजविलेल्या चिंध्यांना आग लावून आकाशकंदिलामध्ये हवा भरण्याची प्रक्रिया सुरू होते. उडविण्यासाठी मुबलक हवा भरल्यानंतर रॉकेलमध्ये भिजविलेल्या कपड्यांचा बोथा तयार करून तो आट्याला बांधला जातो आणि पेटविला जातो. त्यानंतर हा आकाशकंदील आकाशात सोडला जातो. या आकाशकंदिलाला चार, सहा, आठ, दहा, बारा लहान बोथे जोडले जातात. हा आकाशकंदील जेव्हा आकाशाकडे झेप घेतो, तो क्षण पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांचे पारणे फिटते. आकाशकंदील उडविण्याचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे कोष्टी समाजाची ही दिवाळी आगळीवेगळी ठरते! 

संपर्क : तुषार नंदकिशोर हजारे
मु. पो. कलमठ बाजारपेठ, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
मोबाइल : ८८३०४ ३०२५०, ९७६३७ ४४९७४

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 180 Days ago
If would be very helpful if this technic were available to others . It seems to be cheap , seasonal work , not needing much capital , a cottage industry . D
0
0
Bal Gramopadhye About 201 Days ago
How do you make it? what materials ? What procedures ? All the information will help others.
0
0

Select Language
Share Link
 
Search