Next
पुरातत्त्व अभ्यासकांना खुणावणारे इटलीतील उत्खनित नगर : पॉम्पे
दोन हजार वर्षे कुठलीही वस्तू आणि वास्तूंना धक्का नाही
BOI
Sunday, June 16, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

पॉम्पेचे हवाई दृश्य

इटलीतील एके काळचे उत्साही पॉम्पे शहर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा हा म्हणता पृथ्वीच्या चेहऱ्यावरून अदृश्य झाले, विस्मृतीच्या गर्तेत जाऊन पडले आणि १८व्या शतकातील उत्खननानंतर ते पुन्हा ‘प्रकट’ झाले. दोन हजार वर्षे ते जमिनीखाली जसेच्या तसे टिकून होते. ‘किमया’ सदरात आज ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्या लेखाचा उत्तरार्ध...
............
अनेक शतके जमिनीखाली गाडले गेलेले पॉम्पे शहर नाश न होता सुरक्षित राहिले. उत्खननानंतर ते उजेडात आले आणि वस्तू-वास्तूंवर परिणाम होण्यास सुरुवात झाली. जग आणि पुरातत्त्वज्ञांसमोर हे मोठेच आव्हान होते आणि आहे. आवश्यक त्या प्रक्रिया करून, आहे त्या जागी आणि संग्रहालयात त्याचे जतन करणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी होणारा आणि अजूनही लागणारा खर्च अवाढव्य आहे. पॉम्पेच्या रक्षणासाठी सुमारे ३५ कोटी डॉलर्सची आवश्यकता आहे.

भित्तिचित्रपॉम्पेच्या महाअरिष्टाचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास पुढील गोष्टी लक्षात येतात. पॉम्पेच्या लोकांना व्हेसुव्हियस हा ज्वालामुखी होता याची कल्पना नव्हती. इ. स. ७९च्या आधी किमान १८०० वर्षे त्याचा उद्रेक झालेला नव्हता. जेव्हा तो पर्वत राख आणि लाव्हा ओकू लागला, तेव्हा पहिल्या काही मिनिटांतच दोन हजार लोक मृत्युमुखी पडले. बाकीचे उष्णतेने आणि राखेखाली गाडले गेल्याने नष्ट झाले. २४ ऑगस्टच्या दुपारी ही दुर्घटना घडली.

ते शहर शेती आणि उद्योगधंद्यामुळे भरभराटीला आलेले होते. तिथली जमीन अत्यंत सुपीक होती. बाहेरच्या देशांशी उत्तम व्यापार चालत होता.

सन १७४८मध्ये तिसऱ्या चार्ल्स राजासाठी राजवाडा बांधताना प्राचीन पॉम्पे अचानक उजेडात आले. सन ७९पर्यंत ज्वालामुखी हा शब्द लोकांना ज्ञात नव्हता. ‘व्हल्कन’ या (ज्वाला आणि धातूंच्या) रोमन देवतेवरून ‘व्होल्कॅनो’ हा शब्द प्रचलित झाला.

व्हेसुव्हियस अंदाजे १७ हजार वर्षे प्राचीन आहे आणि आजपावेतो ५० वेळा त्याचा उद्रेक झालेला आहे. या पर्वतावर उद्रेकाची दोन वेगवेगळी मुखे आहेत. एक जुने आणि एक सन ७९मधील. पर्वताची उंची सुमारे १३०० मीटर्स (४३०० फूट) आहे.

उद्रेकानंतर बाहेर पडणारा लाव्हा ताशी ७२५ किलोमीटर वेगाने वाहत जातो. त्याचे तापमान एक हजार अंश सेल्सिअसपर्यंत असू शकते. सन ७९मध्ये दर सेकंदाला १५ लाख टन लाव्हा रस बाहेर पडत होता. २४ तास त्याचा प्रवाह अखंड चालू होता. व्हेसुव्हियस हा युरोपातील एकमेव ‘जिवंत’ आणि जगातील सर्वांत धोकादायक ज्वालामुखी मानला जातो. त्याचा १८व्या शतकात सहा वेळा आणि १९व्या शतकात आठ वेळा उद्रेक झाला. १९४४नंतर अद्याप त्याचा उद्रेक झालेला नाही.

पॉम्पेत मिळालेले अँफिथिएटर हे सर्वांत प्राचीन (इ. स. पू. ८०मध्ये तयार झालेले) दगडी बांधकाम आहे. तिथे पाच हजार जणांची आसनव्यवस्था होती. त्या शहराचा दुर्घटनेत इतका विध्वंस झाला, (ते जमिनीखाली १५-२० फूट गाडले गेले) की त्यामुळे पुन्हा तिथे वस्ती करण्याचा विचार कोणाच्याच मनात उद्भवला नाही. पुढे ते विस्मरणात गेले. अधूनमधून तिथल्या संपत्तीची काही प्रमाणात लुटालूट झाली; पण ती एकूण व्याप्तीच्या मानाने अत्यल्प होती.

व्हेसुव्हियसच्या आजूबाजूला सध्या ३० लाखांहून अधिक लोक (धोक्याची परिस्थिती असूनही) राहतात. जगात अन्यत्र कुठल्याही ज्वालामुखीजवळ इतकी वस्ती नाही. संरक्षक भिंतीच्या आतील १५० एकरांवर झालेले पॉम्पेचे उत्खनन हे पुरातत्त्वज्ञांचे जगातील सर्वांत मोठे कार्य आहे.

पॉम्पेच्या उपनगरांतील काही घरे इ. स. पू. ३००मधील आहेत; म्हणजे सन ७९मध्ये उद्रेक झाला, त्या वेळी आजच्या अमेरिकेपेक्षा तिथली घरे जुनी होती.

आजच्या पाश्चानत्य जगात खासगी आणि सार्वजनिक जीवनाबद्दल ज्या कल्पना आहेत, त्यापेक्षा पॉम्पेच्या रोमन लोकांच्या संकल्पना फार वेगळ्या होत्या. लैंगिक चित्रण, आज जे आक्षेपार्ह मानले जाते आणि झाकले जाते, ते त्या काळी अत्यंत उघड दिसून येत होते. खासगी जीवनातील अन्य गोष्टीसुद्धा गुप्त ठेवण्याची पद्धत त्या काळी नव्हती.

हर्क्युलेनियम

आदर्श रोमन घराची रचना त्या काळी कशी असायची, त्यावर उत्खननामधून प्रकाश पडतो. घराच्या बहुतेक भागांत सर्वांना मुक्त प्रवेश असायचा. रस्त्यावरूनच पुढच्या विभागात जाता येई. तिथे व्यापारी उलाढाल चाले. बहुतेक ठिकाणी पावसाचे पाणी साठवून ठेवलेला छोटा तलाव असे. मधला खूप मोठा भाग (छताशिवाय) उघडा असे. वर थेट आकाश! अन्य मोठा भाग म्हणजे प्रशस्त बाग. तीही बहुतेक ठिकाणी लोकांसाठी खुली असे. याला विरोधाभास म्हणजे तिथली शयनगृहे त्या मानाने लहान आणि खिडक्याविरहित असत. साधारणपणे इमारती दुमजली असत. काही तीन मजलीसुद्धा.

शहराच्या भोवतालच्या भागातही भरपूर लोकवस्ती होती. तिथे शेकडो शेतजमिनी आणि हवेल्या होत्या. सुमारे तीन-चार हजार गुलाम शहरात राबत होते. त्या काळातली ती प्रथाच होती. त्यांच्या राहण्याची व्यवस्था गावाबाहेर होती. काही जण श्रीमंत धन्यांच्या घरातच राहत. समुद्रकिनारा हे पर्यटकांच्या विहाराचे लोकप्रिय स्थळ होते. रोमन सम्राट नीरो (राज्यकाल इ. स. ५४ ते ६८) याचा महाल शहराबाहेर बांधलेला होता, असे म्हणतात. पॉम्पेची एक सुकन्या ‘पोपाए सबिना’ त्याची सम्राज्ञी होती.जनतेच्या खाण्यापिण्याची चंगळ होती. गहू, डाळी, मासे, सुका मेवा, विविध फळे, कांदा-कोबीसारख्या भाज्या, अनेक प्राण्यांचे मांस यांचा भरपूर वापर होत असे. अर्थात त्यातले काही पदार्थ फक्त श्रीमंतांनाच परवडत हे स्पष्ट आहे. एकंदरीत सगळा समाज अत्यंत समृद्ध होता.

शहराभोवतीच्या भिंतीमध्ये अनेक कमानी आणि दरवाजे होते. सुरक्षाव्यवस्था चोख होती. पादचारी आणि वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग होते. रस्ते प्रशस्त होते. त्यांना क्रमांक किंवा नाव देण्याची पद्धत मात्र नव्हती. काही काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक असावी, असा पुरावा आढळतो. विविध प्रकारच्या उद्देशांसाठी हजारो इमारती तिथे उभ्या होत्या. मोठ्या हवेल्या, दुकाने, मंदिरे, खेळाची मैदाने, उपहारगृहे, मंडया, सार्वजनिक स्नानगृहे, चोर किंवा गुलामांची जंगली प्राण्यांबरोबर झुंज लावण्यासाठी प्रेक्षागृहे, शाळा, पाणीपुरवठ्याची केंद्रे, बागा आणि नाट्यगृहे - एक ना अनेक! जुन्या आणि नव्या देवतांची प्रार्थनास्थळे आणि कारंजीसुद्धा होती. आधुनिक शहरामध्ये ज्या सर्व सुखसोयी आवश्यक असतात, त्या त्या तिथे उपलब्ध होत्या. भिंतीवर आणि जमिनीवरसुद्धा पौराणिक/ऐतिहासिक प्रसंग चितारलेले असत. उच्चभ्रू लोकांच्या निवासस्थानी बाहेर बागेत जेवणासाठी - खास करून पाहुण्यांसाठी - उत्तम व्यवस्था असे. गुलामांसाठी मात्र कोंदट, तुरुंगाप्रमाणे बंदिस्त आणि अन्याय्य व्यवस्था असे.ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तेव्हा धूर आणि वाळू-दगडांचा मोठा ढग आकाशात सुमारे ४० किलोमीटर उंचीपर्यंत उसळला. १९४५मध्ये हिरोशिमावर जो बॉम्ब टाकण्यात आला, त्यापेक्षा त्या वेळच्या स्फोटाची क्षमता एक लाख पट मोठी होती. लोकांना बचावासाठी पळून जाण्याची जागाच कुठे उरली नाही. अल्पावधीत सर्व शहर भूमीने ‘स्वाहा’ केले. दुपारनंतर पुन्हा दुसरा स्फोट झाला आणि दगड-राखेच्या आधीपेक्षा उंच ज्वाळा उंचावल्या. या वेळी फेकल्या गेलेल्या धोंड्यांचे आकार इतके मोठे होते, की त्यांच्या माऱ्याने इमारती धडाधड कोसळू लागल्या. आपले प्रियजन आणि मौल्यवान वस्तूंच्या रक्षणाची कोणतीच संधी लोकांना मिळाली नाही. रात्री ११ वाजता पुन्हा तप्त राख आणि हवेचा मारा शहरावर झाला आणि होते नव्हते ते सगळे बेचिराख झाले. एके काळचे ज्वलंत, उत्साही शहर हा हा म्हणता पृथ्वीच्या चेहऱ्यावरून अदृश्य झाले, विस्मृतीच्या गर्तेत जाऊन पडले आणि १८व्या शतकातील उत्खननानंतर ते पुन्हा ‘प्रकट’ झाले. 

एखाद्या विद्वानापेक्षाही सामान्य पर्यटकाला आज पॉम्पे शहर सगळ्या तपशीलांसह ज्ञात आहे. अशा ठिकाणाला भेट द्यावी, असे आपल्याला वाटले तर नवल ते काय!

(या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...)

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search