Next
मायाबाजार
बॉलिवूडपट आणि प्रेम
BOI
Tuesday, December 25, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


प्रेम ही आदिम भावनांपैकी सर्वांत महत्त्वाची भावना. साहित्य, चित्र, संगीत, शिल्प, नाटक, चित्रपट इत्यादी कोणत्याही स्वरूपातला कलाविष्कार सादर करताना, प्रेम हा विषय कायमच अग्रणी राहिला आहे. या सुखद, हुरहुर लावणाऱ्या भावनेचा आपण प्रत्येकाने कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनुभव घेतलेला असतो. सिनेमा या माध्यमात मोठ्या जनसमुदायावर प्रभाव पाडण्याची क्षमता असते. अशा या ताकदवान माध्यमाला, प्रेम या विषयाची भुरळ पडली नसती, तर नवलच..! ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या बॉलिवूडचे चित्रपट आणि प्रेमाची संकल्पना यांच्या नात्याबद्दल...
.......................
प्रेम ही एक हळुवार आणि नाजूक भावना आहे. व्यक्तिपरत्वे त्याचे अनुभव वेगवेगळे असतात. काही सुखद, तर काही दु:खद असतात. काही बोचरे, तर काही तरल असतात. भारतात क्रिकेट आणि सिनेमा हे एखाद्या धर्मासमान आहेत. सिनेमा या माध्यमात मोठ्या जनसमुदायावर प्रभाव पाडण्याची क्षमता असते. अशा या ताकदवान माध्यमाला प्रेम या विषयाची भुरळ पडली नसती, तर नवलच! 

देव आनंदकेसांचा सुरेख कोंबडा फुलवून रुबाबात हिंडणारा देव आनंद, सात्त्विक चेहरा असलेली लावण्यवती वहीदा रेहमान, ‘कभी कभी’ ही सुरेल प्रेमकविता मुकेशच्या दर्दभऱ्या आवाजात सादर करणारा अमिताभ, दोन्हीही हात पसरून आपली सिग्नेचर पोझ देत नायिकेला घायाळ करणारा शाहरुख, लोभस चेहरा आणि आपल्या मिश्किल अदांनी काळजात घर करणारी लावण्यवती माधुरी, पडद्यावर सुरेल गाणी साकारणारा आदबशीर राजेश खन्ना, एव्हर स्मायलिंग धर्मेंद्र, विनोद खन्ना आणि विनोद मेहरा, तारुण्याने मुसमुसणारी नीतू सिंग, आपल्या कातिल अदांनी बेहोश करणारी दीपिका, काळजात उठणारा दर्द आपल्या भावविभोर डोळ्यांवाटे आणि उत्कट मुद्राभिनयाद्वारे साकारणारा रणबीर हे सगळे चंदेरी पडद्यावरचे गंधर्व पूर्वीपासून आजतागायत प्रेमाचे वेगवेगळे रंग सादर करत आहेत, प्रेक्षकांना प्रेमात पाडत आहेत. 

यश चोप्रा आणि करण जोहरच्या चित्रपटांनी प्रेमपटांना प्रचंड ग्लॅमरस बनवलं. युरोपचं देखणं वातावरण, बर्फाच्छादित पर्वतशिखरं, सुंदर रोमँटिक गाणी, शिफॉन साडीमधल्या नायिका आणि देखणे नायक असं सगळं गोड गुलाबी आणि चकचकीत वातावरण आठवलं, तरी एक छान मूड बनतो. ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए..’ म्हणत ट्युलिपच्या बागांमधून फिरणारे रेखा-अमिताभ, ‘कभी कभी...’मध्ये आपल्या धीरगंभीर आवाजात प्रेयसीला, ओक वृक्षाखाली शेकोटीच्या समोर बसून कविता ऐकवणारा अमिताभ, ‘सेनोरिटा, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है..’ म्हणणारा ‘डीडीएलजे’चा राज म्हणजेच शाहरुख. दिल्लीच्या नयनरम्य बागांमधे प्रेमाच्या रंगात रंगून जाऊन प्रेमगीतं म्हणणारे ‘चांदनी’मधले ऋषी कपूर आणि श्रीदेवी, ‘सूरज हुआ मध्धम’ या अवीट गोडीच्या गाण्यावर, इजिप्तच्या वाळवंटात थिरकणारे शाहरुख आणि काजोल. करण जोहर आणि चोप्रा यांच्या चित्रपटांतून अशा कितीतरी अविस्मरणीय जोड्या, सुमधूर प्रेमगीतं आणि अनेक प्रणय प्रसंग डोळ्यांसमोरून तरळून जातात. 

बॉलिवूडनं प्रेमाचे अनेक रंग दाखवले. फिके, हलके, गडद, भडक,  सर्व तऱ्हेचे. ‘अमर प्रेम’, ‘गाइड’ यांसारख्या वेगळ्या वळणाच्या प्रेमकथा आपण पाहिल्या. ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू..’ म्हणत नायिकेला साद घालणारा ‘आराधना’तला राजेश खन्ना, ‘आनंद’मध्ये वेगळ्याच अवतारात सामोरा आला. ‘आनंद’मधलं त्याचं पात्र हे आयुष्यावर प्रेम करणारं. एकाच वेळी उदात्त आणि हळवं. ‘सिलसिला’मध्ये भावाच्या प्रेयसीवर अन्याय होऊ नये म्हणून स्वतःच्या प्रेमाचं बलिदान देणारा आणि नंतर एका वेगळ्या जाणिवेनं व्यथित होऊन जुन्या प्रेमाचं पुनरुज्जीवन करण्याकरता धडपडणारा अमित मल्होत्रा आपण बघितला. ‘आनंद’ आणि ‘सिलसिला’नं अनेक वर्षं भुरळ घातली. नव्या पिढीच्या दिग्दर्शकांनाही आनंद आणि सिलसिला यांचा रिमेक (अनुक्रमे कल हो ना हो आणि कभी अलविदा ना कहना) बनवण्याचा मोह टाळता आला नाही. 

माधुरी दीक्षितप्रेमात ठोकर खाणारा आणि त्यामुळे स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा देवदासही पुढे दिलीप कुमार, शाहरुख आणि अभय देओल या अभिनेत्यांनी साकारला. साधारण एकाच संकल्पनेवर आधारित असलेले सिनेमे ठराविक काळाने पुन्हा येताना दिसतात. कपडेलत्ते, चष्म्याच्या, पर्सेसच्या फॅशन्स जशा आलटून पालटून परत येतात, तसे सिनेमाचे ट्रेंडही ठराविक काळाने परत परत येत असतात. प्रेमाच्या या गोड गुलाबी रंगाचे गडद लाल, काळसर पदर दाखवण्याचं कामही बॉलिवूडच्या चित्रपटांनी चोख पार पाडलं. कॉलेजमध्ये असलेल्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडून, तिला आपलंसं करण्याच्या नादात, अनेक घातपाती कारवाया करणारा ‘डर’मधला मनोविकृत प्रेमी राहुल, शाहरुख खानने मोठ्या प्रभावीपणे साकारला. यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अँटी हिरो ही कल्पना नव्या जोमाने उदयास आली. 

एन. चंद्रांनी यापूर्वी ‘तेजाब’मध्ये हा प्रयोग यशस्वीपणे केला होता. तेजाबचा मुन्ना चक्क तडीपार गुंड असतो. ‘डर’मध्ये मनोविकृतीचा नवा आयाम देऊन यश चोप्रांनी अभिनव प्रयोग केला. राहुलचं हे मनोविकृत पात्र लोकांना बरंच भावलं. ‘गुलाम’मधला सिद्धूही काहीसा असाच. बंडखोर प्रेमी. प्रेमाखातर संपूर्ण सिस्टीमला उलथवून टाकणारा. ‘दिल से’मधली नायिका मनीषा कोईराला तर चक्क अतिरेकी मुलगी. तिच्या प्रेमात पडून तिच्या मागे लागणारा नायक आणि त्या दोघांनी सिनेमाच्या शेवटाकडे घेतलेला आगळावेगळा निर्णय ही फार चर्चेची गोष्ट ठरली होती. ‘गोलियों की रासलीला - रामलीला’मधला नायकही असाच. ‘नायक’ या प्रस्थापित संकल्पनेला चक्क छेद देणारा. ‘राम’ असं नाव धारण करूनही वारंवार मर्यादाभंग करणारा. नावातला आणि वर्तनातला हा विरोधाभास मोठा विशेष होता. हल्ली नायकांचं ‘बॅड बॉय’ असणं हे इन थिंग समजलं जातं.

‘देवदास’, ‘रॉकस्टार’ आणि ‘दिल से’ यांमध्ये प्रेमाखातर भयंकर हळवं होऊन स्वतःचं आयुष्य अक्षरशः उधळून देणारे नायक आपण बघितले. प्रेमाकरिता स्वतःच्या जिवाचं बलिदान देणारे नायक नायिका ‘कयामत से कयामत तक’मध्ये दिसतात. ‘कयामत से कयामत तक’वरून प्रेरणा घेऊन पुढे ‘इश्कजादे’ आणि साधारण हीच कल्पना वेगळ्या साच्यात बसवून काढलेला ‘सैराट’ हेदेखील आपण पाहिले. प्रेमवीरांना आता आयुष्यात सगळं संपलं, असं वाटत असतानाही, त्या समस्यांना धीरानं तोंड देऊन उर्वरित आयुष्य सुखानं व्यतीत करता येऊ शकतं, असा बहुमोल संदेश देणारा ‘मसान’ही आपण अनुभवला. प्रेमात करावा लागणारा त्याग आणि बलिदानाची महती सांगणारे ‘वीर झारा’, ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’, ‘रंगीला’ आणि ‘संगम’ हे चित्रपटही कायम स्मरणात राहतील. प्रेम या संकल्पनेतला गोंधळ व्यवस्थित मांडणारे, ‘दिल तो पागल है’, ‘सोचा ना था’, ‘जब वी मेट’, ‘लव्ह आज कल’, आजकालच्या तरुण पिढीचं करिअर आणि प्रेम यातला केऑस मांडू पाहणारे ‘कॉकटेल’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘वेक अप सिड’, ‘तमाशा’ हे चित्रपट त्यांच्या वेगळेपणामुळे लक्षात राहतील. बालवय, पौगंडावस्था ते वार्धक्यापर्यंत आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर भेटणाऱ्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘मेरा नाम जोकर’, गुरुदत्तचा अपार दु:ख कथन करणारा ‘प्यासा’, प्रेम, राजकारण आणि सूड या टोकाच्या भावनांचा मिलाफ साधणारा पोलिटिकल ड्रामा ‘रांझणा’ इत्यादी चित्रपटांमधून आपण प्रेमाच्या निरनिराळ्या छटा बघत आलो आहोत. 

प्रत्येक दशकागणिक या बॉलिवूडमधील प्रेमातही बरेचसे बदल होत गेले. अतिशय प्रभावी मुद्राभिनय, नेत्रपल्लवी, मोजके पण नेमके संवाद, इथपासून सुरुवात करून कायिक अभिनय, थोडेसे धीट संवाद, किंचित शारीरिक जवळीक ते भडक बोल्ड स्वरूपाचे बिनधास्त संवाद, शारीरिक घसट आणि नीतिमूल्ये ही पर्सेप्शन बेस्ड गोष्ट आहे असे मानून एरव्हीच्या प्रचलित कक्षेबाहेर पाऊल टाकणारे सिनेमे आता येऊ लागले आहेत. साठच्या दशकात चित्रपटातून आढळणारा भोळाभाबडा रोमान्स निरनिराळी वळणे घेत आता अधिकाधिक शारीर होतो आहे. काळाबरोबर प्रेमाच्या व्याख्या आणि आविष्कार बदलत जातीलही; पण चित्रपटसृष्टीवर असलेलं या आदिम भावनेचं गारूड सहजासहजी उतरणार नाही हे नक्की. प्रेमाच्या रंगात रंगून जाणारे ‘देवसाब’ आणि ‘काका’ होते. आताआतापर्यंत राहुल, राज, माया आणि पूजा होते, आज सिड, देव आणि संजना आहेत. उद्या अजून कुणी असेल! रूपेरी पडद्यावर चित्रपटांमधून साकार होणारा प्रेमाचा हा लोभसवाणा मायाबाजार अनंत काळापर्यंत सुरूच राहील हे मात्र निश्चित! 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search