Next
संगीताच्या स्पर्धेत उतरताना.. – भाग एक
BOI
Tuesday, May 07, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


संगीताच्या स्पर्धेत उतरताना स्पर्धकानं आवर्जून लक्षात ठेवाव्यात अशा कितीतरी गोष्टी आहेत. सूर-ताल-लय या अत्यावश्यक गोष्टींव्यतिरिक्त स्टेजवर आत्मविश्वासपूर्वक प्रवेश करणं, समोर श्रोत्यांकडे पाहून प्रसन्न मुद्रेनं गाणं, गीताचे शब्द पाठ असणं, स्वत:ला शोभेल असा पेहराव असणं याही गोष्टींचा विचार स्पर्धकानं करावा... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत, संगीताच्या स्पर्धेत उतरताना स्पर्धक म्हणून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी त्याबद्दल...
.......................
खचाखच भरलेल्या सभागृहात एकदम शांतता पसरते. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचते. पहिला क्रमांक कोण पटकावणार याचा अंदाज सर्वांनाच असतो. फक्त परीक्षकांचा कौल आपल्या मनातील स्पर्धकाला दिला गेला ना, याची खात्री करून घ्यायची असते. अशा वेळी परीक्षकांची खरी कसोटी असते. ‘...आणि पहिला क्रमांक मिळाला आहे....’, असं म्हणत विजयी स्पर्धकाचं नाव जाहीर होतं आणि एकच जल्लोष होतो. त्याचे पाठीराखे आनंदानं नाचू लागतात. सुजाण प्रेक्षकांच्या टाळ्या आणि आम्हां परीक्षकांचे मार्क्स बरोबर जुळले, असं परीक्षक या नात्यानं बोलताना मी विधान करताच, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आम्ही दिलेला निर्णय मान्य केलेला असतो. 

समारंभ संपल्यावर बक्षीस मिळालेले आणि न मिळालेले अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धकांशी संवाद साधायला मला आवडते. बक्षीस न मिळालेल्या स्पर्धकांशी, आपण कुठे कमी पडलो, नाउमेद न होता पुन्हा प्रयत्न करताना काय काळजी घ्यावी, याबाबत बोलणं होतं. ही खरी स्पर्धा; मात्र अशी निकोप स्पर्धा प्रत्येक वेळी होतेच असं नाही.

गेली चाळीस वर्षं, अशा अनेक स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम करताना, दर वेळी निरनिराळा अनुभव येत गेला. कधी आंतरशालेय, कधी आंतरमहाविद्यालयीन, तर कधी सर्व वयोगटांच्या स्पर्धा. कधी शास्त्रीय संगीताच्या, कधी सुगम संगीताच्या, कधी नाट्यसंगीताच्या तर कधी हिंदी, मराठी सिनेसंगीताच्या. प्रत्येक वेळी एक गोष्ट नेहमीच आनंद देणारी असते. ती म्हणजे नवनवीन युवा कलाकारांना ऐकायला मिळतं. त्यांचा उत्साह, जिद्द कौतुकास्पद असते. पिढी दर पिढीमध्ये उपजत समज वाढत जाताना दिसून येते. त्यामुळे ‘आम्ही तुमच्याएवढे होतो, तेव्हा आम्हाला इतकी समज नव्हती’, अशी मनमोकळी दाद त्यांना द्यावीशी वाटते. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मुलांचा जन्मही झाला नसेल, अशा काळातली, तीस चाळीस वर्षांपूर्वीची हिंदी, मराठी गाणी ते लीलया सादर करत असतात. त्या जुन्या गाण्यांची अवीट गोडी आजही त्यांना आकृष्ट करत असते.

स्पर्धा कशासाठी? 
या अशा स्पर्धांमधून नेहमीच नवोदित कलाकारांना श्रोत्यांसमोर येण्याची संधी मिळत असते. आपण जे काही शिकलो आहोत, जी कला आत्मसात करत आहोत, त्यात आपण कुठवर पोहोचलो आहोत, कुठे कमी पडतो आहोत, हे जाणून घेण्याची ही संधी असते. त्याचबरोबर आपल्यापेक्षा जास्त तयार असलेले स्पर्धक कसे गातात, वाजवतात याची चाचपणी करण्याची संधी या नवोदितांना स्पर्धांमुळे मिळते.

मुळातच स्पर्धा ही प्रथम आपल्याशीच असायला हवी. स्पर्धेत उतरणं म्हणजे आपण आपल्याला अधिकाधिक चांगल्या प्रकारे श्रोत्यांसमोर सादर करणं असतं. ‘कॉम्पिटिशन लीड्स टू पर्फेक्शन’, असं म्हटलं जातं. म्हणूनच संगीताच्या स्पर्धांही आपल्याला स्वत:ला पारखण्यासाठी उपयोगी पडतात. फक्त स्पर्धेत भाग घेताना, प्रत्येक वेळी आपल्यालाच बक्षीस मिळेल असा अट्टाहास ठेवून चालत नाही. आपण आपला परफॉर्मन्स चांगला दिला, तरी आपलं स्पर्धेतील यश हे अनेक बाबींवर ठरतं. बक्षीस मिळणं हे जसं आपल्या पात्रतेवर ठरतं, तसंच ते इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्या स्पर्धेत किती जणांनी भाग घेतला आहे, त्यांचा दर्जा काय आहे, जाहीर केलेले स्पर्धेचे नियम आयोजकांनी पाळले आहेत का, परीक्षकांनी नि:पक्षपातीपणे निकाल दिला का, अशा अनेक गोष्टींचा परिणाम स्पर्धेच्या निकालाकडे पाहतांना विचारात घ्यावा लागतो. त्यामुळेच एका स्पर्धेत पहिला आलेला स्पर्धक कायम श्रेष्ठ सिद्ध होत नाही, तसंच एखाद्या वेळी यश नाही मिळालं तर तो कायमचा अयशस्वी झाला असंही होत नाही. त्यामुळे निरपेक्ष मनानं स्पर्धेसाठी सामोरं गेलं, तर अशा निकोप स्पर्धा, अधिकाधिक प्रगती करण्यासाठी प्रेरक ठरतात.

माझ्या मते अशा स्पर्धांच्या बाबतीत स्पर्धा - तारक का मारक हे ठरवताना स्पर्धक, आयोजक, परीक्षक आणि श्रोते हे चार घटक विचारात घ्यावे लागतात. 

स्पर्धक : 
स्पर्धेमधील स्पर्धक किती आहेत? एकाच वयोगटातील आहेत का? त्यांची तयारी किती आहे? या गोष्टी महत्त्वाच्या असतात. स्पर्धकानं स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी, त्या स्पर्धेचा दर्जा काय, त्यात भाग घेण्याची आपली तयारी आहे का, हे प्रथम विचारात घेतलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं, तर केवळ आपल्या सोसायटीत किंवा घरातील नातेवाईकांसमोर केवळ करमणुकीसाठी स्पर्धा आहेत, का आपल्या शाळेत वर्गातील मुलांसमोर गायचं आहे, तर कौतुकानं ऐकणाऱ्यांपुढे सुरुवातीला जरूर प्रयत्न करावा. पण आपली शाळा, कॉलेज यांचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आपल्यावर असेल, तर पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरायला हवं. सर्वप्रथम गाण्याची निवड महत्त्वाची असते. सर्वांना आवडेल आणि आपल्याला आवाजाला झेपेल, वयाला शोभेल असं गाणं निवडावं. ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं. जेव्हा आपण एखादं लोकप्रिय गाणं निवडतो, तेव्हा सहाजिकच ऐकताना श्रोत्यांकडून मूळ गायक वा गायिकेशी तुलना केली जाते. म्हणूनच कधी कधी लोकांना परिचित नसलेलं एखादं नवीन गीत गायलं, तर तेसुद्धा स्पर्धेत परिणामकारक होतं. जर तुम्ही शिकत असाल तर आपल्या गुरूंकडून त्याबाबत मार्गदर्शन घ्यावं. त्याच्या सूर-तालाबाबत समजून घ्यावं.

यांतील काहीच विचार न करता, केवळ अतिउत्साहात स्पर्धेत भाग घेऊन, श्रोत्यांना आणि परीक्षकांना ताप देणारे स्पर्धक अनेक ठिकाणी असतात. विशेषत: शाळा-कॉलेजातील स्पर्धांमध्ये असे स्पर्धक पाहायला मिळतात. त्यातही तालाची बाजू बऱ्याच जणांची ठीक असली, तरी सुरांबाबत ते खूपच उदासीन असतात. कारण आपला आवाज स्वरात मिळवण्यासाठी काही शिकावं लागतं, आवाज कितीही चांगला असला, तरी त्यावर मेहनत घ्यावी लागते, याबाबत ते अनभिज्ञ असतात. कितीही सुंदर गाडी बक्षीस म्हणून मिळाली, तरी ती वापरण्याआधी ड्रायव्हिंग शिकावं लागतंच ना. तसंच आपला आवाज सुरात आणण्यासाठी स्वराची साधना करावीच लागते. 

स्पर्धेत सादरीकरणासाठी दिलेली वेळ पाळणं, हेदेखील महत्त्वाचं असतं. काही ठिकाणी वेळ पाळली नाही, तर मार्क्स कमी केले जातात. शास्त्रीय संगीताची स्पर्धा असेल तर रागाची निवड, राग शुद्धता पाळून दिलेल्या वेळेत, आलाप, तान, बोलआलाप, बोलताना, सरगम, बंदीश यांसह सर्वांगाने राग खुलवता आला पाहिजे. सुगम संगीताची स्पर्धा असेल, तर स्वरतालाबरोबरच त्या गीतातील भाव जपणं, शब्दोच्चार चांगले असणं, आपल्या गळ्याला झेपेल, अशा पट्टीत गाणं, यांना महत्त्व द्यावं लागतं. हिंदी सिनेसंगीत किंवा गझल गाताना त्या भाषेचा लहेजा जाणून घ्यावा लागतो. नाट्यगीत गात असाल, तर त्या गीताची नाटकांतील पार्श्वभूमी माहीत असली पाहिजे. ते पद नाटकात कोणत्या प्रसंगी, कोणत्या पात्राच्या तोंडी आहे, हे माहीत करून घ्यायला हवं. सगळीच नाट्यगीतं आलाप- तानांनी सजवून दणादण गायची नसतात. काही गीतं शब्दप्रधान असून, व्हरायटी व्हेरिएशन्ससह गाऊन खुलवायची असतात.

श्रोत्यांसमोर जातांना स्पर्धकाने आणखी काही गोष्टींचं भान ठेवायचं असतं. स्टेजवर आत्मविश्वासपूर्वक प्रवेश करणं, समोर श्रोत्यांकडे पाहून प्रसन्न मुद्रेनं गाणं, गीताचे शब्द पाठ असणं, स्वत:ला शोभेल असा पेहराव असणं याही गोष्टींचा विचार स्पर्धकानं करावा असं मला वाटतं. ज्यांना बक्षीस मिळत नाही त्यांच्याकडून, विशेषत: त्यांच्या पालकांकडून किंवा पाठीराख्यांकडून परीक्षकांवर पक्षपातीपणाचा आरोप केला जातो. परंतु समंजस स्पर्धकांनी जर सर्व स्पर्धकांचं सादरीकरण ऐकलं तर त्या दिवशी भाग घेतलेल्या इतरांच्या तुलनेत आपण कुठे कमी पडलो, ते त्याचं त्यालाही कळू शकतं. आपलं सादरीकरण जरी चांगलं झालं, तरी त्या दिवशीच्या स्पर्धेत किती जणांनी भाग घेतला होता, त्यांची तयारी कशी होती यांवरही आपल्याला बक्षीस मिळणार की नाही हे अवलंबून असतं. एवढ्या तयारीनीशी स्पर्धेत उतरलेल्या स्पर्धकाचं यश आणखी कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं, त्या घटकांविषयी पुढील लेखात पाहू...

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shilpa Naik About 159 Days ago
संगिताच्या अभ्यासकांना वआमच्या सारख्या प्रेक्षकांनाही उपयुक्त लेख
0
0
Surendra About 160 Days ago
Sunder well balanced
1
0

Select Language
Share Link
 
Search