Next
मेट्रोतून झळकणार पुण्याची गौरवशाली संस्कृती
पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार कोटींचा सामंजस्य करार; स्वारगेटला ‘मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’, तर सिव्हिल कोर्ट असणार मध्यवर्ती स्थानक
BOI
Wednesday, January 30, 2019 | 03:27 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ‘एएफडी फ्रान्स बँक’ आणि केंद्र सरकार यांच्यात दोन हजार कोटींचा करार झाला असून लवकरच ‘युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँके’सोबतही चार हजार कोटींचा करार होणार असल्याची माहिती ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. याशिवाय पुणे मेट्रो, पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी असेल, असेही त्यांनी सांगितले.

येथील ‘नॉर्थ ब्लॉक’स्थित ‘केंद्रीय आर्थिक विकास विभागा’च्या कार्यालयात पुणे मेट्रोसाठी ‘एएफडी फ्रान्स बँक’ आणि भारत सरकार यांच्या दोन हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झिजर, केंद्रीय मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. सी. एस. मोहपात्रा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एएफडी फ्रान्स बँकेच्या भारतातील उपसंचालक क्लेमेन व्हीडल डी ला ब्लँच, ब्रिजेश दीक्षित आणि पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमन्यम  या वेळी  उपस्थित  होते.

याबाबत अधिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ‘२०१९अखेर पुणे मेट्रोचे व्यावसायिक परिचलन तर २०२०मध्ये पहिली मार्गिका पूर्ण होणार आहे. या करारामुळे पुणे मेट्रोसाठी दोन हजार कोटींचा निधी कर्ज रूपाने उपलब्ध झाला आहे. सद्यस्थितीत मेट्रोचे २७ टक्के काम पूर्ण झाले असून या निधीच्या माध्यमातून कामाला गती येणार आहे. या वर्षाअखेर मेट्रोच्या व्यावसायिक परिचलनास सुरुवात करण्यासही याची मोठी मदत होणार आहे. तसेच वर्ष २०२०मध्ये पुणे मेट्रोची १६ किलोमीटरची  पहिली लाईन पूर्ण करणे व २०२१पर्यंत मेट्रोची दुसरी लाईन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण होईल असा विश्वास वाटतो. ‘एएफडी फ्रान्स बँके’कडून १.२ टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध झाले असून पुढील २० वर्षांत कर्जफेड करायची आहे, असे दीक्षित यांनी सांगितले.    

युरोपियन बॅंकेसोबत चार हजार कोटींचा करार 
‘युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँके’कडून पुणे मेट्रोसाठी चार हजार कोटींचे कर्ज लवकरच उपलब्ध होणार आहे. यासदंर्भात काही मंजुऱ्या मिळाल्यानंतर येत्या तीन आठवड्यांत सामंजस्य करार करण्यात येईल. पुणे मेट्रोसाठी एकूण ११ हजार ४०० कोटींचा खर्च येणार आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देत असून एएफडी फ्रान्स बॅंक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून एकूण सहा हजार कोटींचे कर्ज घेण्यात येत आहे’, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.

मेट्रो स्थानकांमधून झळकणार पुणेरी संस्कृती व इतिहास
पुणे शहराला असणारा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही मेट्रोच्या माध्यमातून दिसणार आहे. पुण्याची खास ओळख असलेल्या पुणेरी पगडीच्या आकारात ‘डेक्कन जिमखाना’ व ‘संभाजी पार्क मेट्रो स्टेशन’ तयार करण्यात येत आहेत. तसेच  शहराला असणारा संगीताचा वैभवशाली इतिहासही विविध संगीत वाद्य व कलाकृतींच्या माध्यमातून दिसणार आहे. दापोडी, संत तुकाराम नगर आदी औद्योगिक भागातील मेट्रो स्थानकांवर शहराची औद्योगिक क्षेत्रातील प्रगती दर्शवण्यात येणार आहे.

स्वारगेट येथे ‘मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’
शहरातील स्वारगेट परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. याच ठिकाणी असलेले राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे बस स्थानक, पुणे मनपा बस वाहतूक सेवेचे स्थानक व अन्य खाजगी वाहने व पादचारी यांची गर्दी असते. याच भागात मेट्रो स्टेशन उभारण्यात येत आहे. येथील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता, पुणे मेट्रो प्रकल्पाच्या वतीने ‘मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून पादचारी, रस्त्यावरील वाहतूक व मेट्रोची वर्दळ सुरळीत होणार असून प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. पुणे मनपा, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांनी १८ एकर जमीन उपलब्ध करून दिल्याचे दिक्षीत यांनी सांगितले.

सिव्हील कोर्ट असणार मध्यवर्ती स्थानक : ३० माळ्यांचे स्थानक
शहराच्या शिवाजी नगर परिसरातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक हे पुणे मेट्रोचे मध्यवर्ती स्थानक राहणार असून याठिकाणी मेट्रोच्या तीनही लाईन एकत्र येतील. हे स्थानक ३० माळ्यांचे असणार आहे.

सर्व स्थानकांवर सौर ऊर्जा पॅनल 
नागपूर मेट्रोतील यशस्वी प्रयोगानंतर आता ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ने पुणे मेट्रो प्रकल्पातही सौर उर्जेच्या वापरावर पूर्ण भर दिला आहे. त्यानुसार प्रत्येक मेट्रो स्थानकावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहेत. मेट्रोसाठी लागणाऱ्या एकूण उर्जेपैकी ६५ टक्के वीज सौर उर्जेद्वारे निर्मित असेल. केवळ प्रती युनीट दीड रूपयात ही वीज उपलब्ध होणार आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीची वास्तू रचना
पुणे मेट्रोच्या वास्तूरचनेसाठी खास आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम होत आहे. यासाठी फ्रान्स आणि स्पेनचे वास्तू विशारद तसेच भारतातील नामांकित वास्तुविशारद हफीज कॉन्ट्रॅक्टर पुणे मेट्रोच्या वास्तूरचनेची जबाबदारी सांभाळत आहेत.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search