Next
लॉर्ड्स कसोटी आणि भारतीय संघ
BOI
Wednesday, August 08, 2018 | 05:27 PM
15 0 0
Share this article:

विराट कोहली आणि अॅॅलेस्टर कूक

क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर भारत-इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू व्हायला काही तास उरले आहेत. पहिल्या कसोटीत भारतानं शेवटपर्यंत इंग्लंडवर अटॅक केलाच नाही यामुळे ते हरले. छोट्या लक्ष्याचा सामना करताना एकदा तरी अटॅक करणं गरजेचं असतं, जो पहिल्या कसोटीत केला गेला नाही. परंतु असं असलं तरी दुसऱ्या कसोटीत भारतीय कसोटीवीर पूर्णत: कसोटीवर उतरतील अशी आशा आहे. आगामी लॉर्ड्स कसोटी सामन्याबद्दलचा हा विशेष लेख...
.......................................
मागच्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळी भारतानं लॉर्ड्सवर इंग्लंडला हरवलं होतं. यावरून भारतीय संघ प्रेरणा घेऊ शकतो. मागच्या वेळी झालेली ती लॉर्ड्स कसोटी ही भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. लॉर्ड्स मैदान हे हिरवंगार कुरण होतं आणि त्यात बावीस यार्डाची खेळपट्टी हरवली होती. इंग्लंडच्या धष्टपुष्ट गायींना त्या खेळपट्टीवर सोडलं असतं, तरी त्या दिवसभर त्यावर रवंथ न करता चरल्या असत्या. इतकं गवत त्यावर होतं. 

खेळपट्टीवरील हिरवा रंग आणि भारतीय टीमचं हाडवैर आहे. हिरवं गवत दिसलं, की भारतीय संघ घाबरतो, अशी सर्वसामान्य समजूत आहे, पण त्या दिवशी एक माणूस त्या हिरव्यागार खेळपट्टीवर उभा राहिला, तो म्हणजे अजिंक्य रहाणे आणि त्याच्या साथीला उभा होता आपला पहिलाच इंग्लंड दौरा करणारा भुवनेश्वर कुमार. १४७ धावांवर सात बाद असताना दोघांनी मिळून भारताची धावसंख्या तीनशेच्या जवळपास नेली होती. त्यानंतर दोन्ही इनिंग्समध्ये चांगली गोलंदाजी करून भारतीय संघाने लॉर्ड्सची ती ऐतिहासिक कसोटी खरोखरच ऐतिहासिक कामगिरी करून जिंकली. या जुन्या लॉर्ड्सच्या आठवणीतून भारतीय संघाला पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी प्रेरणा मिळू शकते.

‘फेमस लॉर्ड्स स्लोप’ : 
लॉर्ड्सचं मैदान हे एक पारंपरिक मैदान आहे. काळाच्या ओघात जगभरातील सर्व मैदानांची पुनर्रचना झाली. बरीचशी नव्याने बांधण्यात आली, पण लंडनमधील लॉर्ड्स हेच एकमेव मैदान आहे, जे जसं होतं तसंच आहे. जगातील पहिला क्रिकेट सामना खेळल्या गेलेल्या लॉर्ड्सवर परंपरावादी ब्रिटिशांनी काहीही बदल केले नाहीत. या लॉर्ड्स मैदानावर खेळपट्टीपाशी एक प्रसिद्ध उतार आहे. त्याला ‘फेमस लॉर्ड्स स्लोप’ म्हणतात. क्रिकेट पंडितांमध्ये या स्लोपबद्दल वेगवेगळी मतमतांतरे आहेत. कोणी म्हणतं, या उताराचा काहीही जास्त परिणाम होत नाही, तर काहींचे याविरुद्ध मत असे, की वेगवान गोलंदाज विशेषतः जिमी अँडरसन या स्लोपचा जास्त फायदा उचलतो. फलंदाजांना खेळताना कायम या स्लोपचा त्रास होऊ शकतो.

लॉर्ड्सवरील दोन्ही बॉलिंग एन्ड्स हे प्रसिद्ध आहेत. नर्सरी एन्ड आणि पॅविलियन एन्ड. नर्सरी एन्डने गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाजाला नैसर्गिक इन्स्विंग मिळतो. तर पॅविलियन एन्डने बॉलचा टप्पा पडल्यावर तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर जातो. लॉर्ड्सवर धावा काढणं म्हणजे एक महान गोष्ट असते. तुम्ही इंग्लंडमध्ये खेळत असताना संपूर्ण जग त्या खेळाकडे लक्ष ठेऊन असतं. 

इंग्लंडचं वातावरण, त्यांचा खास ‘ड्युक्स’चा लाल बॉल, हे सगळं इंग्लिश दौऱ्याला वेगळं करतं. क्रिकेट जगतात फक्त वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्येच ‘ड्युक्सच्या’ बॉलने क्रिकेट खेळला जातो. हा बॉल फलंदाजाला खेळपट्टीवर कधीही स्थिरावू देत नाही. ड्युक्सचा बॉल कायम हलतो, अस्थिर राहतो.  क्रिकेटमधील बॉल्सचे तीन प्रकार हा एक संपूर्ण स्वतंत्र विषय आहे. यावर पुढे कधीतरी.


विराट कोहलीविराट कोहली आणि रँचो : 
‘थ्री इडियट्स’मधील रँचो सगळं काही करतो. मजा मस्ती, खोड्या पण अभ्यासातही तो कायम टॉपर असतो. तसाच विराट कोहली हा भारतीय संघातला रँचो आहे. मैदानावर टशन देतो, भांडणं करतो, खोड्या करतो, आपल्या मस्तीत असतो, पण फलंदाजी करताना मात्र तो पूर्णपणे बदललेला असतो. टेस्ट सामन्यामध्ये तर अगदी जबाबदार खेळाडू होऊन तो कणखर मानसिकतेनं स्वतःमध्ये साजेशे बदल करतो. हे त्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असतानाही दाखवलं होतं आणि इंग्लंडमधील पहिल्या कसोटीमध्येही.

२०१४मधील त्याचा १३चा अॅव्हरेज हा त्याचा आजवरचा सगळ्यात वाईट दौरा होता. २०१८चा दौरा सुरू होण्यापूर्वीपासूनच विराट कोहलीच्या या १३च्या अॅव्हरेजबद्दल बोललं जात होतं. त्याचं जिमी अँडरसनसोबतचं चिरद्वंद्व हे प्रसिद्ध आहे, पण पहिल्या कसोटीत दोन्ही इंनिंग्समध्ये विराटने अँडरसनचा बदला वगैरे घेण्यासाठी मुद्दाम कोणताही आततायी शॉट खेळला नाही. जिमी अँडरसन अत्यंत चांगली आणि भेदक गोलंदाजी करत असताना, विराट कोहलीनं कायम त्याच्या बॉलचा आदर केला आणि शेवटी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी शतकी खेळी त्यानं पूर्ण केली. 

मैदानावरील इतर वेळेसचा विराट कोहली आणि फलंदाजी करतानाचा कोहली हे दोन वेगळे असतात. मैदानावर क्षेत्ररक्षण करतानाचा पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट घातलेला, खोड्या करणारा, अरे ला कारे किंवा कधी स्वतःहून अरे म्हणणारा विराट कोहली वेगळाच असतो, तर फलंदाजी करताना छोट्या बाह्यांचा टी-शर्ट घातलेला, संघाची संपूर्ण जबाबदारी उचलणारा असतो. एकाग्रतेने खेळताना त्याला बघताना हॅट्स ऑफ म्हणावं वाटतं.

लॉर्ड्स कसोटी मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करणार, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. इशांत शर्मा इंग्लिश दौरा सुरू होण्याआधी महिनाभर इंग्लंडमध्ये काउन्टी क्रिकेट खेळला. त्याचा फायदा पहिल्या सामन्यात स्पष्टपणे दिसून आला. गेल्या दौऱ्यात लॉर्ड्सवर इशांत शर्माने शेवटच्या इनिंगमध्ये सात बळी मिळवत भारताला कसोटी सामना जिंकून दिला होता. आता या लॉर्ड्स कसोटीमध्येही त्याने चांगली कामगिरी करावी ही आशा आहे. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका जोरदार रंगणार यात वाद नाही....

- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search