Next
अरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद
BOI
Monday, July 15, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी :
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतर्फे बँकिंग या विषयावरील मोफत कार्यशाळा १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

अकादमीच्या अध्यक्षा अॅड. प्राची जोशी यांनी मार्गदर्शक व ‘फ्युचर प्रो’चे डायरेक्टर स्वप्नील तांबेकर यांचा फूलझाड देऊन सत्कार केला. फ्युचर प्रो व अकादमीच्या वतीने २४ जुलैपासून बँकिंग या विषयावरील बॅच सुरू होत असल्याचे अकादमीच्या समन्वयक अॅड. इंदुमती मलुष्टे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती आणि अरुअप्पा जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

स्वप्नील तांबेकर म्हणाले, ‘सरकारी बँकांमध्ये मोठी भरती प्रक्रिया होत आहे. यासाठीचा अभ्यासक्रम कठीण नाही. परंतु स्पर्धा कठीण आहे. कारण तयारी करणारे भरपूर जण आहेत. एकदा परीक्षा दिली, की पुढच्या परीक्षांची तयारी आपोआप होत जाते; पण पहिली परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास व चिकाटी महत्त्वाची आहे.’

‘माझे दहावीपर्यंतचे शिक्षण राजापुरातील विल्ये येथे झाले आहे. त्यामुळे कोकणातील मुलांची मानसिकता मला माहिती आहे. परंतु स्पर्धा परीक्षांद्वारे आपल्या हुशारीचे चीज होईल. ‘आयबीपीएस’द्वारे १८ सरकारी बँका, सार्वजनिक विमा कंपन्या व एमबीएची सीईटी देऊन काही खासगी बँकांमध्ये भरती होता येईल. अंतर्गत परीक्षा देऊन बँकांमध्ये करिअर वृद्धिंगत करता येते. क्लार्क, पीओ, एसओ अशा तीन पदांसाठी परीक्षा देता येते,’ असे ते म्हणाले. या वर्षीपासून ग्रामीण बँकांची परीक्षा मराठीतून होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘एसएससी-सीजीएल या परीक्षेतून केंद्र सरकारच्या एकूण १६ पदांसाठी भरती केली जाते. आयकर निरीक्षक, एक्साइज इन्स्पेक्टर, तसेच सीबीआय, फॉरीन मिनिस्ट्री, टपाल खाते आदींमध्ये भरती होते. दर वर्षी सुमारे दहा हजार पदांची भरती या परीक्षेद्वारे केली जाते. या परीक्षेसाठी बँकिंगचे विषय असतात. एसएससी-सीएचएसएल या परीक्षेतून ‘पोस्टल असिस्टंट’सारखी अनेक पदे बारावीच्या पात्रतेवर देता येतात,’ असे तांबेकर म्हणाले.

‘या वर्षी रेल्वेत सुमारे एक लाख २८ हजार जागा रिक्त होत्या. रेल्वेमध्ये नोकरी मिळाल्यास घरापासून सर्वांत जवळच्या स्टेशनच्या कार्यालयात काम मिळू शकते. रेल्वेच्या परीक्षांमध्ये मुलाखत नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भीती बाळगण्याची गरज नाही. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी हे तीन विषय महत्त्वाचे आहेत,’ असेही तांबेकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search