Next
परिवर्तन तुमच्याच हाती...
प्रसन्न पेठे
Monday, July 10, 2017 | 11:15 PM
15 0 0
Share this article:

देशातील परिस्थितीत परिवर्तन कसे घडायला हवे आणि आपण नागरिक ते कसे घडवून आणू शकतो, हा विचार इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा यांनी ‘परिवर्तन तुमच्याच हाती’ या पुस्तकातून मांडला आहे. त्या पुस्तकाविषयी...
...............
आपल्यातले देशप्रेमी नागरिक, विशेषतः कधी ना कधी परदेश प्रवास करून आलेले बहुतेक नागरिक, नकळतच तिथल्या समाजव्यवस्थेची, लोकांना मिळत असलेल्या सोयी-सुविधांची, राहणीमानाची आणि भ्रष्टाचारमुक्त दिनचर्येची तुलना भारतातल्या परिस्थितीशी करतात आणि मग एकीकडे ते मनोमन निराश होतात आणि दुसरीकडे संतापाने त्यांचा तीळपापडही होतो. - ‘का? का? आपला देश असा भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे? का आपल्या देशात सतत जातीपातीवरून दंगे, मारामाऱ्या होत आहेत? का सामान्य माणसाला तुच्छ समजले जाते? तो आपले काही वाकडे करू शकणार नाही असे गृहीत धरले जाते? का आपल्याला राजकारण्यांकडून उचित न्याय मिळत नाही? आणि का आपण हे भोगतोय स्वतंत्र झाल्यापासून? का आपण हा भ्रष्टाचार सहन करतोय? इतकी वर्षे?’ – एक ना अनेक विचार मनात पिंगा घालतात; पण शेवटी ते विचार वांझोटे ठरून, आपल्यातले बहुतेक लोक स्वतःशीच चरफडत गप्प बसतात....

पण आपल्यातच एखादे ‘देवेंद्रसिंग हरनामसिंग वधवा’ यांच्यासारखे इंजिनीअर उद्योजक असतात, जे मूग गिळून गप्प न बसता समाजात परिवर्तन घडवण्यासाठी पेटून उठतात आणि जनजागृतीसाठी लेखणी सरसावून, ‘परिवर्तन कसे घडायला हवे आणि आपण नागरिक ते कसे घडवून आणू शकतो’ ते २१९ पानांत, त्यांच्या जळजळीत, पण सच्च्या शब्दांत मांडून दाखवतात. ‘परिवर्तन तुमच्याच हाती’ या पुस्तकाच्या पानापानातून आपल्याला जाणवते ती ‘काळा पैसा, महागाई आणि भ्रष्टाचार’ या तीन असुरांविषयीची वधवा यांची आत्यंतिक चीड आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी मांडलेले रोखठोक निर्भीड विचार.

भारतात ही निराशाजनक परिस्थिती का आणि कशी उद्भवली आणि तिने हे अक्राळविक्राळ स्वरूप का धारण केले, याचा ऊहापोह करण्यासाठी वधवा यांनी पार १२व्या शतकाच्या इतिहासापासून ते भारत स्वतंत्र झाल्यावरच्या गेल्या सात दशकांतल्या इतिहासापर्यंतचा राजकीय आणि सामाजिक आढावा घेतला आहे. नक्की काय चुकत गेले ते सर्व प्रकारच्या सत्ताधीशांची आणि नाडल्या गेलेल्या त्या त्या वेळच्या जनतेची उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून सत्तेत असणाऱ्यांनी जनतेला अंधारात ठेवून स्वतःची तुंबडी भरण्याचे उद्योग केले. वर्षानुवर्षे आपल्याच घराण्यात सत्ता राहील आणि आपल्याच पिढ्यांचे भले होईल याकडेच लक्ष दिले. परिणामी ‘लोकशाही’ खऱ्या अर्थाने भारतात रुजलीच नाही... आणि सत्ताधीशांकडून होणारा भ्रष्टाचार झिरपत खाली जाऊन पूर्ण नोकरशाहीच भ्रष्ट झाली. आपणच मालक असल्याच्या थाटात आणि गुर्मीत सत्ताधीश वागत गेले.

खरे पाहता ‘सत्ताधीश’ नव्हे, तर भारताचे ‘सामान्य नागरिकच’ या देशाचे मालक आहेत आणि असायला हवेत - हे ठामपणे सांगताना, देशातल्या दुर्दैवी स्थितीवर कोरडे ओढीत वधवा यांनी ठिकठिकाणी चमकदार वाक्ये पेरली आहेत, जी त्यांचा मुद्दा अधोरेखित करतात. उदाहरणार्थ – ‘त्यांचे खायचे दात वेगळे होते एक व दाखवायचे दात वेगळे होते...(पान ६६), ‘इंग्रजांच्या काळात चालत आलेल्या नोकरशाहीच्या पद्धतीत काहीही बदल न करता स्वातंत्र्यानंतर ती पद्धत जशीच्या तशी उचलण्यात आली..(पान ६७), ‘...फक्त आणि फक्त व्होट बँकेलाच महत्त्व दिलेले आहे. ते व्होट तुम्ही कसे मिळविले ते सर्व काही प्रकाशाइतके समोर दिसत असूनही त्याकडे डोळेझाकच केली जाते..(पान ६८), ‘...या देशात भ्रष्टाचारापेक्षा मोठा कोणी राक्षस नाही  भ्रष्टाचारापेक्षा मोठा कोणी देवही नाही..(पान ७२), ‘अशा लोकांच्या हातात आजपर्यंत अशा विशालकाय देशाच्या कारभाराची सूत्रे देत आलो आहोत, जे फक्त व्होट बँकेचीच सेवा करण्याचे ढोंग करतात...(पान ७३), ‘प्रत्येकाजवळ एकच विचार घोकणारा मेंदू आहे, की माझी खुर्ची कशी वाचवू? गेलेली सत्ता परत कशी मिळवू?...(पान ७८), ‘नीतिमत्तेचे सर्व नियम धुडकावून राजकारणी लोकांनी, पक्षांनी देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याऐवजी लोकसंख्या जितकी वाढेल तितका आपल्याला त्याचा लाभच घेता येईल या विचारसरणीला मूक संमती दिली ..(पान १०८).......

मात्र हे सर्व निराशाजनक चित्र असताना वधवा यांना एक आशेचा किरण दिसतोय आणि तो पंतप्रधान मोदींच्या रूपात. मोदींनी जनतेला दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न प्रत्यक्षात येणे शक्य आहे हा आशावाद वधवा यांनी शेवटच्या टप्प्यात मांडलाय.

पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यात, जनतेला ‘जागे व्हा’ सांगताना वधवा यांनी विधायक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले आहे. ‘मोर्चे काढू नका, देशाचे नुकसान होईल असे काही करू नका, तुम्ही देशाचे मालक आहात, एक पैसाही न घेता निर्भयपणे मतदान करा, आपल्या हक्कांची मागणी करा’ – असे सांगताना या पुस्तकातून त्यांनी ‘Right to reject and Right to recall back’ हे लोकशाहीचे सार असून, परिवर्तनासाठी ते अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे,’ हे ठासून सांगितले आहे. पंतप्रधान मोदी भारताला योग्य दिशेने नेतील आणि त्यासाठी सगळ्यांनी मनापासून साथ द्यावी हा संदेश देणारे वधवा यांचे हे पुस्तक रोचक आणि वाचनीय आहे.
.........

पुस्तक : परिवर्तन तुमच्याच हाती...
लेखक : इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा
प्रकाशन : क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स, अहमदनगर
पाने : २१९
मूल्य : २५० रुपये
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search