Next
शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार पेन्शन!
नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णय
BOI
Saturday, June 01, 2019 | 02:10 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (३१ मे २०१९) झालेल्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी निवृत्तिवेतन आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत सर्वच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयांचा समावेश आहे.

‘अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली असून, सर्वच शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. आतापर्यंत १२.५ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. दोन कोटी शेतकरी यापासून वंचित होते. या घोषणेनंतर सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. देशातील जवळपास १४.५ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळेल,’ असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे. ‘या योजनेवर आधी ७५ हजार कोटी इतका खर्च होत होता. तो आता ८७ हजार कोटी इतका होणार आहे,’ असेही तोमर यांनी सांगितले.

या वेळी शेतकरी आणि लघू उद्योजकांसाठीच्या पेन्शन योजनेचीही घोषणा करण्यात आली. या योजनेनुसार, लघू उद्योजकांना वयाच्या ६०व्या वर्षांनंतर दर महिन्याला किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. देशातील तीन कोटी किरकोळ विक्रेते आणि छोट्या व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेसाठी १० हजार कोटींचा खर्च होणार आहे.  

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना :

- शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांत थेट बँकेत जमा होणार आहेत.

- तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे नोंदणी आवश्यक.

- शेतकऱ्यांनी नाव, गाव, वय, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांसह घोषणापत्र भरून तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे जमा करणे आवश्यक. 

- आधार कार्ड किंवा ते नसेल तर मतदान ओळखपत्र देणे आवश्यक.

- सुरू असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची झेरॉक्स.

- ग्रामसमितीकडून चुकून नाव न आल्यास तालुका समितीकडे अर्ज करावा.

- ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे दिलेली नाहीत, त्यांनीच ही कागदपत्रे जमा करावीत. ज्यांनी यापूर्वी माहिती दिली आहे, त्यांनी पुन्हा माहिती देण्याची आवश्यकता नाही.

शेतकरी पेन्शन योजना

-   १८ ते ४० वर्षे वयोगटातले शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात.

-   वयानुसार दरमहा बचतीच्या हप्त्याची रक्कम ठरेल.

-   जेवढी रक्कम शेतकऱ्याकडून भरली जाईल, तेवढीच रक्कम सरकारही त्याच्या खात्यात जमा करेल.

-   साठाव्या वर्षापर्यंत बचत करावी लागेल. त्यानंतर पेन्शन मिळणे सुरू होईल.

-   वयाच्या ६०व्या वर्षानंतर दरमहा किमान तीन हजार रुपये निवृत्तिवेतन मिळणार.

-   जमा झालेल्या रकमेनुसार निवृत्तिवेतनाची रक्कम ठरेल.

-   किसान सन्मान योजनेतून सरकारकडून मिळालेले पैसे थेट पेन्शन योजनेसाठी गुंतवायचे असतील, तर तशीही सुविधा उपलब्ध.

-   मृत्यू झाल्यास वारसाला लाभ.

-   १२ कोटी शेतकऱ्यांना फायदा.

व्यापारी पेन्शन योजना :

-   वर्षाला दीड कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या आणि जीएसटी लागू नसलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना लाभ. तीन कोटी छोटे व्यापारी आणि दुकानदारांना लाभ.

-   १८ ते ४० वर्षे वयोगटातील छोटे व्यापारी योजनेत सहभागी होऊ शकतात.

-   दरमहा किमान ५५ रुपये आणि वयानुसार जास्त रकमेचा हप्ता ६०व्या वर्षापर्यंत भरावा लागणार.

-   जेवढा हप्ता व्यापाऱ्याकडून भरला जाईल, तेवढाच हप्ता सरकारही भरणार.

-   ६०व्या वर्षानंतर दरमहा किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळणार. पेन्शनची रक्कम प्रत्येकाच्या जमा झालेल्या रकमेवर आधारित.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 92 Days ago
Step in the right direction .
0
0

Select Language
Share Link
 
Search