Next
स्वतःची लेखनशैली निर्माण करा : डॉ. अरुणा ढेरे
साहित्य परिषदेत साधला कुमारवयीन लेखकांशी संवाद
BOI
Saturday, June 01, 2019 | 02:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘लेखक होण्यासाठी कल्पनाशक्तीबरोबरच निरीक्षणशक्ती असली पाहिजे. अनुभव आपल्या शब्दात मांडता आले पाहिजेत. भाषा आणि अर्थाच्या छटा समजल्या पाहिजेत, शब्दांच्या पलीकडले शब्दांत मांडताना स्वतःची लेखनशैली निर्माण केली पाहिजे’, असा सल्ला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

‘छात्र प्रबोधन’ मासिकातर्फे कुमारांसाठी आयोजित राज्यस्तरीय  निवासी लेखन-संपादन कार्यशाळेतील सहभागी कुमार लेखकांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला भेट दिली, त्या वेळी डॉ. ढेरे बोलत होत्या. परिषदेतील माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, छात्र प्रबोधनच्या कार्यकारी संपादक शिल्पा कुलकर्णी, मानद संपादक शैलजा देशमुख हे उपस्थित होते. 

डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘मी लिहायला लागले होते, तेव्हा पद्मा गोळे, संजीवनी मराठे आणि इंदिरा संत यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले. उद्याच्या साहित्याची पालखी तुमच्या खांद्यावर आहे. या क्षेत्रात प्रत्येकाला उभे राहण्याची संधी आहे त्यासाठी भरपूर वाचन करा आणि संकोच न करता लिहा. परंपरा समजून घ्या आणि वर्तमानाच्या आतही डोकावून पाहा.’

प्रा. जोशी यांनी साहित्य परिषदेचा इतिहास कुमारांना सांगितला. ते म्हणाले, ‘अनुभवामुळेच लेखन कसदार होते. केवळ पाठ्यपुस्तके वाचून पंडित होऊ नका अनुभव आणि संवेदनांचे पंख लावून उंच भरारी घ्या. हे जग उघड्या डोळ्यांनी पाहा. ज्याला माणूस वाचता येतो तोच उत्तम लेखक होऊ शकतो.’ 

कार्यशाळेतील सहभागी कवींनी कवितांचे सादरीकरण केले. शिल्पा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी कुमारांनी डॉ. ढेरे आणि प्रा. जोशी यांच्या स्वाक्षरीसाठी त्यांच्याभोवती गर्दी केली होती. साहित्य परिषदेतर्फे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा ‘डॉ. रा. चिं. ढेरे स्मृती विशेषांक’, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते कुमारांना भेट देण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 82 Days ago
Easily said than done .
0
0

Select Language
Share Link
 
Search