Next
पुणेकरांनी अनुभवल्या अरुण दातेंच्या सुरेल आठवणी
बीबीसीने ध्वनिमुद्रित केलेल्या ऐतिहासिक मराठी गीतांना उजाळा
BOI
Friday, August 02, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this article:

नवा शुक्रतारा कार्यक्रमात सादरीकरण करताना गायक मंदार आपटे, श्रुती जोशी, श्रीरंग भावे यांच्यासह  अतुल दाते

पुणे : गाण्याचा कार्यक्रम करून मध्यरात्री घरी परतत असताना अरुण दाते यांची गाडी एका पोलीस अधिकाऱ्याने थांबविली. दातेंना वाटले आता पोलीस गाडी तपासणार, कागदपत्रांची छाननी करणार; पण झाले उलटेच. पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यासमोर वही व पेन धरत म्हटले मला तुमची सही हवीय... दातेंनी सही केली, मात्र आश्चर्याने विचारले, ‘तुम्ही माझी सही का घेतली ?’, तेव्हा तो अधिकारी म्हणाला, ‘उद्या सकाळी ड्युटी संपवून मी जेव्हा घरी जाईन तेव्हा माझ्या मुलीला सांगणार आहे ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी...’ गाणाऱ्या अरुण दातेंना मी प्रत्यक्षात पाहिलं...’  अरुण दाते अशा पद्धतीने सर्वच वयोगटातील रसिकांपर्यंत पोहोचले होते... या व अशा अनेक आठवणींबरोबर पावसाच्या सरींनी धुंद झालेल्या वातावरणात अरुण दाते यांच्या सुमधुर गाण्यांमध्ये पुणेकर रसिक रंगून गेले. निमित्त होते उद्योजक गौरव व आदिती कुलकर्णी यांनी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे.

अरुण दाते यांच्या ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी...’ व ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्यांची दखल घेत आजपासून सुमारे चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे २९ जुलै १९७९ रोजी बीबीसी अर्थात ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने ही गाणी चित्रित केली होती. विशेष म्हणजे ही दोन्ही गाणी बीबीसीने चित्रित केलेली आजपर्यंतची पहिली आणि शेवटची मराठी गाणी ठरली. याचेच औचित्य साधत गुरुवार, एक ऑगस्ट रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक मंदार आपटे, श्रीरंग भावे, गायिका श्रुती जोशी यांनी या वेळी अरुण दातेंची गाणी सादर केली, तर अतुल दाते यांनी अरुण दातेंच्या आठवणींना उजाळा दिला.


‘या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सादर झालेल्या ‘श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा...’, ‘भेट तुझी माझी...’, ‘सखी शेजारीणी...’ , ‘डोळे कशासाठी...’, ‘जपून चाल, पोरी जपून चाल’ या गीतांनी पुणेकरांना गाण्यांमधील शुक्रताऱ्याची स्वरानुभूती दिली. 

या वेळी अरुण दातेंच्या आठवणी सांगताना अतुल दाते म्हणाले, ‘सलमान खान यांचे वडील सलीम खान हे बाबांचे खूप चांगले मित्र होते. त्यांच्या कब्जा चित्रपटात त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींची नावे त्या चित्रपटातील विविध पात्रांना दिली होती. त्यात एक गृहमंत्री दाखविला होता त्या पात्राला त्यांनी अरुण दाते असे नाव दिले होते. त्याच पात्राला बाबांचे नाव का दिले यावर उत्तर देताना सलीम खान म्हणाले, ‘या चित्रपटातील गृहमंत्र्याचे पात्र प्रामाणिक आणि सच्चे होते. तोच प्रामाणिकपणा आणि जगण्यातला सच्चेपणा माझ्या फक्त याच मित्रात आहे आणि म्हणूनच त्या पात्राला अरुण दाते असे नाव दिले.’ अशा अनेक आठवणी अतुल दाते यांनी उपस्थितांना सांगितल्या. अभिनेत्री अनुश्री फडणीस हिने केलेल्या निवेदनालाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.      

प्रसन्न बाम (संवादिनी), झंकार कानडे (की-बोर्ड), अमित कुंटे (तबला), अमेय ठाकूरदेसाई (हॅंडसॉनिक),  प्रशांत कांबळे (ध्वनी व्यवस्था) यांनी साथसंगत केली.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search