Next
शेअर बाजार सध्या नरमगरम
BOI
Sunday, September 08, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this article:


जागतिक मंदी, देशातील वाहन उद्योगाची स्थिती, घसरलेला आर्थिक विकास दर अशा विविध कारणांमुळे गेल्या सप्ताहात शेअर बाजार अस्थिरच होता. बाजारातील एकूण वातावरण सध्या नरमगरमच असल्याने सावधपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या स्थितीत कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्याकडून....
.....
आठवडाभर चढ-उताराचा खेळ सुरू असलेल्या भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी, सहा सप्टेंबर रोजी चांगली वाढ नोंदवली गेली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३६ हजार ९८१ अंकांवर स्थिरावला होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १० हजार ९४६ अंकांवर स्थिरावला होता. सेन्सेक्समध्ये गुरुवारच्या तुलनेत ३३७ अंकांची तर, निफ्टीत ९८.३० अंकांची वाढ झाली. एकंदरीत सध्या शेअरबाजारात नरमगरम वातावरण असल्याने सावधानतेने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 

या पार्श्वभूमीवर, बजाज फायनान्सचा शेअर तीन हजार ३८७ रुपयांपर्यंत वधारला आणि शुक्रवारी तीन हजार ३७३ रुपयांवर बंद झाला. आठवड्याभरात तो तीन हजार ५०० रुपयांपर्यंत जावा. मार्च २०२० पर्यंत तो चार हजार २०० रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता आहे. दररोज बजाज फायनान्सच्या एक लाख शेअर्सचा व्यवहार होतो.

अतुल इंडस्ट्रीचा शेअर तीन हजार ४६७ रुपयांवर बंद झाला. वर्षभरात हा शेअर चार हजार रुपयांपर्यंत जाईल. दररोज त्याच्या ४० ते ४५ हजार शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/ऊ गुणोत्तर २०.७ पट दिसते. 

पावसाळा समाधानकारक असला, तरी शेअरबाजारातील सध्याचे नरमगरम वातावरण संपून तेजी यायला दिवाळीपर्यंत वाट पहावी लागेल. चांद्रयान-दोन मोहिमेच्या अपयशाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसू शकतो. 

बँक विलिनीकरणाच्या संदर्भात अदला-बदलीचे प्रमाण जाहीर झालेले नसल्यामुळे शेअर बाजाराला त्याबाबत उत्सुकता आहे. केंद्रसरकार बँकांमध्ये नवीन भांडवल घालणार आहे; पण ते कधी आणि कुठे याचा खुलासा झालेला नाही. स्टेट बँकेने, मात्र आपल्याला नवीन भांडवलाची आवश्यकता नाही, असे सांगितले आहे. स्टेट बँकेचा शेअर २७० रुपयांच्या आसपास खरेदी केल्यास वर्षभरात त्यात ३० टक्के वाढ मिळू शकेल. 

रिझर्व्ह बँकेने बँकांना आपले कर्जावरील व्याजदर कमी करण्यास, तसेच ते रेपोदराशी संलग्न करण्यास सांगितले आहे. बँकांनी स्वेच्छेने आपले व्याजदर कमी न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेला तसा आदेश द्यावा लागला आहे. 

बाळकृष्ण इंडस्ट्रीज अपेक्षेप्रमाणे गेल्या आठवड्यात वर गेला नाही. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा शेअर सध्या १०८ रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा नीचांकी भाव ७३ रुपये, तर उच्चांकी भाव १३९ रुपये आहे. सध्याच्या भावाला किं/ऊ गुणोत्तर २.९ पट इतके आकर्षक दिसते. रोज एक कोटीपेक्षा जास्त शेअर्सचा व्यवहार होतो. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने नुकतेच रुरल इलेक्ट्रीफिकेशन फाउंडेशनचे अधिग्रहण केले आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअरही सध्या घेण्याजोगा आहे. गेल्या तिमाहीत तिला चांगला नफा झाला होता. सध्या हा शेअर १२ रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. वर्षभरात तो ३० टक्के तरी वाढेल. रोज सुमारे तीन लाख शेअर्सचा व्यवहार होतो. 

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Chandrakant Gumaste About 11 Days ago
Expert advice from time to time for past many years. Thanks and oblige.
0
0

Select Language
Share Link
 
Search