Next
‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’अंतर्गत अनेकांना दृष्टी
BOI
Monday, November 27, 2017 | 06:06 PM
15 0 0
Share this article:

जळगाव : मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत पहिल्या टप्प्यात २१० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना नवी दृष्टी मिळाली आहे. दृष्टी मिळालेल्या अबालवृध्दांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन आणि पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

फडणवीस यांनी १५ ऑगस्ट २०१९पर्यंत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प केला असून, त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यावर सोपविली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी महाजन यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरातंर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाची सुरुवात येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून केली. या अभियानातंर्गत पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक रुग्ण तपासणीसाठी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करून तातडीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या २१० रुग्णांवर नुकतीच शस्त्रक्रिया केली. यासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टॉफ यांचेही सहकार्य लाभले.

शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांना घरी पाठविण्याचा छोटेखानी कार्यक्रम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला. या वेळी आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी किशोर राजे-निंबाळकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह या शस्त्रक्रिया शिबिरासाठी मुंबई येथून आलेले वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. लहाने यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधताना शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी घ्यावयाची काळजी, आहार, औषधोपचार याबाबत मार्गदर्शन केले. पुढील टप्प्यातील शस्त्रक्रिया तीन डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया झालेल्यांनी पुन्हा तपासणीसाठी दोन डिसेंबरला उपस्थित रहावे; तसेच आवश्यकता भासल्यास या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचेही डॉ. लहाने यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पितांबर भावसार यांनी केले. अरविंद देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा समान्य रुगणालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search