Next
गणेशोत्सवासाठी परदेशी पर्यटकांकरता गिरगाव चौपाटीवर विशेष सुविधा
एमटीडीसी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, September 05, 2018 | 05:11 PM
15 0 0
Share this article:

  

मुंबई : परदेशी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या दिमाखदार गणेशोत्सवाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे खास व्यवस्था करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवात परदेशी पर्यटकांना सहभागी होता यावे, यासाठी गिरगाव चौपाटीवर तीनशेहून अधिक व्यक्ती सामावून घेण्याची क्षमता असलेला मंच उभारण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे यंदा आणखी सुविधांचा यात समावेश करण्यात आला आहे. या वर्षी ऑनलाइन नोंदणी सुविधा, शुद्ध पेयजल, मोबाइल स्वच्छतागृहे, बससेवा आणि अल्पोपहारासारख्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या द्वारे गणेशोत्सव हा एक आंतरराष्ट्रीय सोहळा म्हणून प्रस्थापित करण्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. या निमित्ताने पर्यटकांना १२६ वर्षांचा वारसा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा अनुभव घेता येईल आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा आणि परंपरांचा अभ्यास करता येईल.


कामाची पाहणी करताना पर्यटन मंत्री जयकुमार रावल व पर्यटन खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम आदी अधिकारीयाबाबत बोलताना महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, ‘महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन परदेशी पर्यटकांना घडवण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. परदेशी पर्यटकांना गणपती बाप्पाचे दर्शन घेता यावे यासाठी खास मंच उभारण्यात येणार असून, त्यांना गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या गणेशमूर्ती पाहता येतील आणि या सोहळ्याचे भव्य स्वरूप अनुभवता येईल.’

महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम म्हणाले, ‘या उत्सवाला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देणे, हा आमचा उद्देश आहे. म्हणून आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नोंदणी सुविधेच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करत आहोत. या उत्सवासाठी जगभरातील पर्यटक महाराष्ट्रात आकर्षित होतील, असा मला विश्वास आहे.’

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे म्हणाले, ‘गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध संस्कृती आणि समाजातील व्यक्ती एकत्र येतात. दरवर्षी एमटीडीसीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या गणेश दर्शन सहलीचा अनुभव घेण्यासाठी विविध देशांतील पर्यटक येतात. परदेशी पर्यटकांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांना राज्यातील या लोकप्रिय उत्सवाचा अनुभव घेण्याची संधी देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवताना आम्हाला खूप आनंद होत आहे.’

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search