Next
महापंडित राहुल सांकृत्यायन
BOI
Sunday, April 28, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

शाळेत कुठलेही औपचारिक शिक्षण न घेताही आपल्या अचाट विद्वत्तेने आणि कार्याने ‘महापंडित’ ही पदवी मिळालेली व्यक्ती म्हणजे राहुल सांकृत्यायन. प्रचंड प्रवास आणि अफाट साहित्यनिर्मिती ही त्यांची वैशिष्ट्ये त्यांनी १४० पुस्तके लिहिली आणि ३० भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. नऊ एप्रिल हा त्यांचा जन्मदिन, तर १४ एप्रिल ही पुण्यतिथी. त्या निमित्ताने ‘किमया’ सदरात ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर यांनी राहुल सांकृत्यायन यांच्यावर लिहिलेला हा लेख...
........
सन १९५८-५९मधली गोष्ट. मी आठवीत होतो. माझा एक मामा (कृष्णाजी गं. खेर) त्या वेळी पारनेर (जि. नगर) येथे सब रजिस्ट्रार होता. सुट्टीच्या दिवसात तेथे गेलो असताना, तिथल्या तालुका वाचनालयातून पुस्तके वाचायला आणत असे (स्थापना १९३३). तिथून एकदा राहुल सांकृत्यायन नावाच्या एका लेखकाचे ‘व्होल्गा ते गंगा’ हे मराठी पुस्तक आणले. दोन दिवसांत ते वाचले आणि झपाटून गेलो. इ. स. पूर्व ६००० ते इ. स. १९४२पर्यंतचे मानवी समाजाचे, राजकीय, आर्थिक आणि ऐतिहासिक चित्रण त्यात २० गोष्टींच्या द्वारे केलेले आहे. नाना देश त्यात समाविष्ट आहेत. भाषा, रीतिरिवाज, संस्कृती, साहित्य यात होत गेलेले बदल कथांमधून आपल्याला समजतात, विचारांना चालना देतात. रामायण-महाभारत सोडले, तर इतके प्रभावी पुस्तक त्या वेळेपर्यंत माझ्या वाचनात आले नव्हते. सांकृत्यायन यांची अन्य पुस्तकेही शोधून वाचायचीच, असा निश्चय मी त्या वेळी केला.

राहुल सांकृत्यायन यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कार्य, यांचा थोडक्यात आढावा घेणे ही फारच अवघड गोष्ट आहे. हिंदी भाषेत त्यांच्या आत्मचरित्राचे पाच खंड आहेत. त्यांचे मूळ नाव केदारनाथ पांडे तथा दामोदर स्वामी. त्यांना राहुलबाबाही म्हणत. १९३० साली लंकेत बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर राहुल सांकृत्यायन असे नाव त्यांनी धारण केले. उत्तर प्रदेशात आझमगड जिल्ह्यातील पन्दहा नावाच्या गावात नऊ एप्रिल १८९३ला त्यांचा जन्म झाला. कर्मभूमी मात्र बिहार होती. त्यांनी अफाट साहित्यनिर्मिती केली, प्रचंड प्रवास केला. तिबेट आणि रशियातील त्यांचे वास्तव्य लेखन-संशोधनदृष्ट्या महत्त्वाचे ठरले. त्यांना यात्रा-साहित्याचे जनक मानले जाते. विश्व-दर्शनशास्त्र आणि बौद्ध धर्मावरील त्यांचे निबंध जगविख्यात आहेत. सन १९५८मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि १९६३ मध्ये पद्मभूषण असे श्रेष्ठ सन्मान त्यांनी प्राप्त केले. १४ एप्रिल १९६३ रोजी त्यांचे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये निधन झाले. २०१८मध्ये त्यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी झाली. वडिलांचे गोत्र सांकृत्य असल्याने सांकृत्यायन असे उपनाम त्यांनी घेतले होते.

त्यांचे साहित्यिक योगदान असे आहे. ‘मेरी जीवनयात्रा’ या नावाने त्यांचे पाच खंडांमधील आत्मकथन आहे. सतमीके बच्चे, वोल्गा ते गंगा, बहुरंगी वसुंधरा, कनैला की कथा हे कथासंग्रह आहेत. बाईसवी सदी, सिंह सेनापती, मधुर स्वप्न, दिवोदास आदी नऊ कादंबऱ्या आणि तीन अनुवाद त्यांनी केलेले आहेत. चरित्रलेखनात स्टॅलिन, सरदार पृथ्वीसिंह, कार्ल मार्क्स, माओत्सेतुंग इत्यादी १६ ग्रंथ आहेत. त्यांचे यात्रासाहित्य विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल. लंका, जपान, इराण, किन्नर देश, लडाख, तिबेट अशी १० देशांची प्रवासवर्णने त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी तिबेटमध्ये सव्वा वर्ष आणि रशियात २५ महिने मुक्काम केला होता. त्यामुळे त्यांचे वर्णन आणि तिथे केलेले काम महत्त्वाचे ठरते. ऋग्वेदिक आर्य, दर्शन-दिग्दर्शन, मध्य आशियाचा इतिहास असे  त्यांचे निबंध जगभरात गाजले. तीस भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. प्रखर राष्ट्रभक्त, भारतविद्, इतिहासकार, दर्शनशास्त्री आणि भाषाज्ञानी म्हणून ते मान्यता पावले.

तरुण वयात त्यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असे. स्वातंत्र्यासाठी केलेल्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना दीर्घ काळ तुरुंगवासही भोगावा लागला. बक्सर तुरुंगात सहा महिने घालवल्यावर ते जिल्हा काँग्रेसचे मंत्री झाले. नंतर दीड महिना नेपाळमध्ये जाऊन राहिले. पुढे हजारीबाग तुरुंगात काही काळ काढला. राजकारणाचा कंटाळा आला, म्हणून त्यांनी हिमालयात वास्तव्य केले. लंकेत त्यांनी १९ महिने भरपूर प्रवास केला (१९२७). तशा त्यांच्या लंका यात्रा बऱ्याच वेळा झाल्या. १९३२-३३मध्ये इंग्लंड व युरोपची सफर घडली. लडाख आणि तिबेटला ते दोन-दोनदा गेले. पुढे तिबेटला आणखी दोन वेळा गेले. जपान, कोरिया, मांचुरिया, रशिया (दोनदा), इराण या देशांच्या यात्रा १९३८पर्यंत झाल्या. नंतर किसान आंदोलनात त्यांचा सहा वर्षे सहभाग राहिला. त्यात सत्याग्रह आणि उपोषण ही ‘शस्त्रे’ होती. ते साम्यवादाचे समर्थक होते. कम्युनिस्ट पार्टीचे सदस्यही बनले. सन १९४०-४२दरम्यान पुन्हा २० महिन्यांचा तुरुंगवास घडला. नंतर रशिया, चीन आणि लंकेच्या यात्रा झाल्या. प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतींचा अभ्यास, तसेच देशादेशांमध्ये प्रत्यक्ष हिंडून तिथली माहिती घेणे हाच त्यांचा ध्यास होता. त्यांचे साहित्य त्यामुळेच सकस आणि परिपूर्ण झाले. त्यांच्या एकूण पुस्तकांची संख्या १४० आहे. शाळेत कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांना ‘महापंडित’ ही पदवी मिळाली. रशियन विद्यापीठात त्यांनी ‘इंडॉलॉजी’ (भारतीय विद्या) या विषयाचे अध्यापन केले. लंकेतही त्यांना प्राध्यापक म्हणून सन्मानाने बोलावण्यात आले. अशा महान व्यक्ती हयात असताना त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जात नाही, किंबहुना उपेक्षाच केली जाते. तीच गोष्ट राहुल सांकृत्यायन यांच्या बाबतीत घडली. त्यांचे जीवन म्हणजे सत्याचा अखंड शोध, नित्यनूतन ज्ञानग्रहण आणि त्याग अशी एक यात्राच होती.

बनारस हिंदू विद्यापीठ येथील अर्धपुतळात्या काळात लहान वयातच लग्न लावून देत असत. राहुल यांच्या बाबतीत तेच घडले. ते न आवडल्याने घरून पळून जाऊन ते एका मठात साधू बनून राहिले. त्यांनी आपले घर सोडले; पण साऱ्या जगालाच आपले घर बनवले. जिथे गेले तिथली भाषा ते शिकले. नवनवीन जितके ग्रहण केले, तितकेच भरभरून जगाला साहित्यरूपाने दिले. अनुभव हाच त्यांचा गुरू ठरला. त्यांना हिंदी, संस्कृत, पाली, उर्दूसह बहुतेक भारतीय भाषांचे ज्ञान होते. सिंहली, फ्रेंच, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषाही उत्तम येत होत्या. तसेच अनेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास होता.

राहुल यांचे एकूण तीन विवाह झाले. लहानपणची पहिली पत्नी संतोषीदेवी यांची साधी भेटही झाली नाही. तिला ४०व्या वर्षी फक्त एकदाच पाहिले, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. १९३७-३८मध्ये लेनिनग्राड विद्यापीठात शिकवत असताना लोला येलेना यांच्याशी त्यांची भेट झाली. पुढे प्रेम आणि लग्नही झाले. नंतर थोरला मुलगा ‘इगोर’ याचा जन्म झाला. ते भारतात परतले, तेव्हा पत्नी आणि मुलगा तिकडेच राहिले. तिसरे लग्न डॉ. कमला यांच्याशी झाले. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगी आणि दोन मुलगे झाले. राहुल यांना ७० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांची काही पुस्तके अप्रकाशित राहिली.

सांकृत्यायन यांचे सर्वांत महत्त्वाचे, अनमोल कार्य म्हणजे तिबेट आणि चीनच्या प्रवासात मिळालेले आपलेच हजारो भारतीय ग्रंथ त्यांनी प्राप्त केले. ज्यांच्या प्रती उपलब्ध नव्हत्या, ते ग्रंथ लिहून काढले आणि भारतात आणले. तिबेटहून तर शेकडो याक प्राण्यांच्या पाठीवरून, डोंगर-पर्वतांमधून दुस्तर मार्ग काढत आपले ग्रंथधन देशाला अर्पण केले. पुढे त्यांचे संपादन, प्रकाशन झाले. सध्या ते सगळे ग्रंथ पाटणा येथील सुप्रसिद्ध ग्रंथालयात सुरक्षित आहेत. त्यामुळेच भारताची ज्ञान-परंपरा साऱ्या जगाला समजली. खऱ्या अर्थाने राहुलजी ‘भारतरत्न’ ठरले. त्यांचे वक्तृत्व अद्भुत होते. शब्दसामर्थ्य आणि प्रवाही अभिव्यक्तीमुळे श्रोते संमोहित होत असत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९९३ साली एक रुपयाचे टपाल तिकीट काढण्यात आले. पाटण्यात ‘राहुल सांकृत्यायन साहित्य संस्थान’ स्थापन झाले. तिथे त्यांच्याशी संबंधित सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. प्रसिद्ध साहित्यिक प्रभाकर माचवे यांनी हिंदीत लिहिलेले सांकृत्यायन यांचे चरित्र १९७८ साली प्रसिद्ध झाले. त्याचे पुढे इंग्रजी, रशियन इत्यादी अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. चीनमध्येही त्यांची पुस्तके लोकप्रिय आहेत. ‘राहुल का संघर्ष’ नावाच्या एका पुस्तकात श्रीनिवास शर्मा यांनी सांकृत्यायन यांचे १८ निबंध संकलित केले आहेत. त्यातून त्यांच्या अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश पडला आहे.

आपल्या अखंड प्रवासाबद्दल सांकृत्यायन म्हणतात :

‘जगातील सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हणजे भटकंती. त्यानेच व्यक्ती आणि समाजाचे हित झालेले आहे. प्राकृतिक मूळ पुरुष हा ठिकठिकाणी भटकणाराच होता. डार्विन जागोजाग फिरला, तेव्हाच त्याचा मानववंशाच्या विकासासंबंधीचा सिद्धांत तयार झाला, तीनशे वर्षांपूर्वी निर्जन असलेला ऑस्ट्रेलिया खंड, जहाजातून भटकणाऱ्या लोकांनी उजेडात आणला. तीच गोष्ट अमेरिकेची! आपल्या संस्कृतीचा मोठा गर्व असलेल्या चीन किंवा भारताने तिथे आपले झेंडे नाही रोवले!’

त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. अशी नवी दृष्टी देणारे महापंडित वेळोवेळी जन्माला येतच असतात. राहुलजी भारतीय होते, ही खरोखरच गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

(राहुल सांकृत्यायन यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 76 Days ago
Has any of his writings been translated into Marathi ?
0
0

Select Language
Share Link
 
Search