Next
छोट्या मुलांना नको दुरावा!
BOI
Saturday, August 04, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

न्यूक्लिअर फॅमिलीज अर्थात छोटी कुटुंबे ही आत्ताच्या युगाची वस्तुस्थिती आहे. त्याची खरेच गरज आहे की नाही किंवा ती चांगली की वाईट, हे स्वतंत्र चर्चेचे मुद्दे आहेत; मात्र छोट्या मुलांना त्याची अगदी लहानपणापासून सवय नसेल आणि नंतर छोट्या कुटुंबात राहायची वेळ आली, तर आवडीच्या, सवयीच्या माणसांपासून दुरावण्याची भीती त्यांच्या मनात बसते. अशी भीती असेल, तर त्यांची कळी सहजासहजी खुलत नाही. ‘मनी मानसी’ या सदरात या वेळी पाहू या, आवडत्या माणसांपासून वेगळे होण्याबद्दल मुलांच्या मनात असलेल्या भीतीबद्दल...
...........
साडेचार वर्षांच्या विनयला घेऊन त्याचे आई-बाबा भेटायला आले होते. पहिल्या भेटीच्या वेळी त्यांनी विनयला बरोबर आणले नव्हते. ते दोघेच प्रथम भेटायला आले होते. नंतरच्या भेटीत ते विनयलाही घेऊन आले. विनयचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. वर्षभरापूर्वीच त्यांची पुण्यात बदली झाली होती. सुरुवातीला ते एकटेच इकडे आले. दोन महिन्यांत सर्व स्थिरस्थावर झाल्यावर, राहण्यासाठी घराची व्यवस्था झाल्यावर ते पत्नी व मुलाला घेऊन पुण्यात राहायला आले. विनयची आई घरीच असायची. ती पूर्वी नोकरी करत होती. परंतु बदली झाल्यामुळे तिने नोकरी सोडली. 

पुण्यात आल्यावर सर्व नीट मार्गी लागल्यावर आईने पुन्हा नोकरी करण्याचा विचार केला. म्हणून त्यांनी विनयला पाळणाघरात ठेवायला सुरुवात केली आणि नोकरीसाठी शोध सुरू केला; पण दोन महिने होऊन गेले, तरी विनय काही पाळणाघरात रुळेना. तो तिथे खूप रडायचा. दिवसभर काहीच खायचा नाही, खेळायचा नाही किंवा झोपायचा नाही. पाळणाघरात सोडल्यापासून ते घरी घेऊन जाईपर्यंत तो फक्त रडत राहायचा. याचा परिणाम असा झाला, की या दोनअडीच महिन्यांत तो दोन-तीन वेळा खूपच आजारी पडला. शेवटी आईने एवढ्यात नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला पाळणाघरात ठेवणे बंद केले. तरीही विनयचे रडणे चालूच होते. त्याचे खाणे-खेळणे या सगळ्याच गोष्टी कमी झाल्या होत्या. वजनही खूपच कमी व्हायला लागले होते. डॉक्टर, औषधे सगळे केले; पण कशाचाच उपयोग होईना. म्हणून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काकूंनी त्याला समुपदेशनासाठी घेऊन जाण्याबाबत त्यांना सुचवले. म्हणून ते भेटायला आले. 

फोटो : प्रातिनिधिकत्यांच्याशी संवाद साधताना असे लक्षात आले, की ते मूळचे सातारा येथे राहणारे होते. तिथे ते एकत्र कुटुंबात राहत होते. तेथे मुलाचे आजी-आजोबा, काका-काकू, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा व यांचे कुटुंब असे सर्व एकत्र राहत होते. आजी-आजोबा आणि चुलतभाऊ हे त्याचे खूप लाडके होते. त्याला सतत त्यांचा सहवास हवा असायचा. त्यामुळे पुण्यात राहायला आले तरीसुद्धा रोज न चुकता घरी फोन व्हायचा. आजी-आजोबा, दादा यांच्याशी विनय खूप गप्पा मारायचा. अधूनमधून सुट्टी मिळाली, की ते साताऱ्याला जायचे. या माहितीतच त्याची समस्या लपलेली होती; पण ती त्या दोघांच्याही लक्षात येत नव्हती. त्यामुळे पुढील एक-दोन सत्रे विनयसोबत संवाद साधला. त्याला चित्रे काढायला दिली. काही प्रमाणात ‘प्ले थेरपी’चा वापर केला आणि त्यातून त्याची समस्या अधिक स्पष्ट झाली. 

अगदी तान्हा असल्यापासून तो त्याच्या एकत्र कुटुंबातच वाढला होता. त्याला सतत घरातील लाडक्या, आवडत्या माणसांमध्ये राहायचीच सवय होती; पण वडिलांची बदली झाली आणि फक्त विनयचेच कुटुंब पुण्यात राहायला आले. त्यामुळे त्याला खूप एकटेपणा जाणवायला लागला. आपल्या इतर आवडत्या व्यक्तींपासून दूर राहणे त्याच्या छोट्या वयाला खूप अवघड जात होते. त्याच्या मनात विभक्त होण्याची भीती म्हणजेच मानसशास्त्रात ज्याला ‘सेपरेशन अँक्झायटी’ म्हणतात, ती वाढली होती. या नवीन बदलाशी जुळवून घेणे त्याच्या वयाला खूपच त्रासदायक ठरत होते. त्याचमुळे तो सारखा आजारी पडत होता. 

या समस्येची जाणीव त्याच्या आई-वडिलांना करून दिल्यानंतर कारण व परिणाम त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्याला घेऊन पुन्हा साताऱ्याला, मूळ घरी जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आई त्याला घेऊन तिकडे गेली. थोडे प्रयत्न करून काही महिन्यांतच त्याच्या बाबांनीही पुन्हा तिकडेच बदली करून घेतली. तिकडे गेल्यावर महिन्याभरातच विनयची कोमेजलेली कळी पुन्हा खुलली आणि तो पूर्वीसारखा हसरा झाला. त्याची दुखणी दूर पळून गेली. तो आता छान असल्याचे आईने आवर्जून फोन करून कळवले.

(केसमधील नावे बदलली आहेत.)

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search